जीवनमोती शोधण्या प्रवासी पळतो आहे!

जीवनमोती शोधण्या प्रवासी पळतो आहे
💐🙏🌹🙏💐🌹🙏💐
**************************
... नानाभाऊ माळी 

देह घेऊनि चाललो आहे
अजून ठिकाण भेटलं नाही
 शोध मनाचा सुरुचं आहे
अजूनीं मकान गाठलं नाही!🌹

डोक्यावरती केसं वाढली 
वाढलेली कधी नखें काढली 
वाढ बुद्धीची सुरूच आहे रें
छाटण्यासीं माणसे धाडली!🌹 

गाड्यांमागुनी गाड्या चालल्या 
रस्ते होतात सख्या सोबती
प्रवास हा अखंड सुरु रें
 उगाचं अंतरी श्वास राबती!🌹

रस्ता प्रवासातील सच्चा मित्र असतो!वेडीवाकडी वळणे घेत खेळवत असतो!डोळे चोळवत असतो!देह-मनाला पळवत असतो!माणूसही पळत असतो!वाहने पळत असतात!रस्ता सडाफटिंग असतो!संपता संपत नाही!त्यावर कित्येक येतात,जातात!हा आपला तसाच,आजगरासारखा सुस्त पहुडलेला असतो!मोटार-गाड्यांच्या दणक्यानीं कधी तरी उचकटतो!रस्ता आपुल्याचं मस्तीत असतो!गाड्या येत असतात!जात असतात!पळत असतात!कोणी वेगाने पळवतो!कोणी ओव्हरटेक घेत पुढे निघून जातो!मागचा कासव गतीने पळत असतो!उद्दिष्ट साध्याकडे पळत असतो!रस्ता झिजत नाही!झिजत असतात गाड्यांचे टायर!पळणं थांबत नसतं!पळण्यावर पोट असतं!पोट माणसाला पळवत असतं!प्रवास हा होत असतो!🌹

प्रवास सुरूच असतो!डाव्या-उजव्या बाजूला गावं दिसतातं!शेती दिसते!शेतातील पिकं खुणावीत असतात!मनमोहक दृश्य डोळे पीत असतात!उरात उतरत असतात!पळण्याचा वेग कमी जास्त होत असतो!गाड्या पळत असतात!आपला देह घेऊन गाड्या पळत असतात!माणूस थांबत नसतो, पळतच असतो!गाड्या पुढे पळतात!समोरून येणाऱ्या गाड्या देखील विरुद्ध दिशेनें पळत असतात!प्रवास हा होत असतो!🌹

रस्त्याच्या कडेची गावं भेटतात!माणसं भेटतात!आपल्याचं कार्यात मग्न दिसतात!रस्ता ओलांडून कधी अदृश्य होतात!शुक शूकाट होऊनि पुन्हा फुलूनी जातात!गावं रोज अजब भेटतात!डोळे मात्र थकूनी जातात! हृदयी दृश्य ठेऊनी निघून जातात!रस्ता वाहने हाकीत असतात!पिकं,झाडे मागे जातात!जीवन म्हणजे प्रवास आहे हो,दिवस मोजीत चालला आहे!रस्ता कधी डांबरी असतो!प्रवास देखील डांबरी होतो!रस्ता कधी सिमेंटचां येतो!नजरेला गुळगुळीत दिसत असतात!कच्ची माती कधी कधी दिसते!धूळ उडवीत श्वास रोखते!प्रवास हा होत असतो!🌹

प्रवासातील अनेक थांबे मानसाळलेली दिसत असतात!तुमची,आमची ओझी वाहूनी थांबे थांबत कधीच नसतात!माणुसही पळत असतो सुख-दुःखाचे ओझे घेऊनि!बस,एसटी, मोटरगाड्या माणसं घेऊन पळत असतात!स्वार्थी असतं पोट आपुले,पोटासाठी पळत असतो!ताटात भेटते भाजी पोळी, पंचक्वान्नासाठी पळत असतो!गाव सुटत,शहर भेटत!कधी पोटासाठी देश सुटतो!जमीन-जुमला,मोटार गाड्या स्वप्नासाठी पळत असतो!प्रवास हा पोटासाठी,नोटांसाठी पळत असतो!सुख-दुःखाचां आधार घेऊन माणूस नुसता पळत असतो!प्रवास हा होत असतो!🙏

प्रवासाच्या थकव्यानंतर सुखद हिरवळ भेटत असतें,नाती-गोती जगणं,मन-हृदयी साठवत असतें!हिरवळीचा रंग वेगळा,माणूस सारे विसरून जातो!साखरेचा पाक होऊनि नात्यात पूर्ण पसरुनी जातो!ओढ कुणाला चुकली आहे?प्रवासी होऊनि पळतो आहे!हसणे-रडणे सारे आपुले,तव्यावर स्वतःस तळतो आहे!जगण्याचा प्रवास होत आहे!🌹

उद्दिष्ट घेऊनि हृदयाशी मी देखील पळतो आहे!नाती-गोती,देव दर्शनासं माणसे शोधण्या पळतो आहे!गर्दीतील माणूस शोधण्या मीही रोज पळतो आहे!आनंद-दुःख डोळ्यात भरण्या,अनुभव घेऊनि पळतो आहे!प्रवासी होऊनि मलाच शोधण्या, गावोगावी पळतो आहे!घामातुनी फळ शोधण्या पायात भिंगरी,पळतो आहे! धुळीतुनीही जीवन शोधण्या रोज रोज पळतो आहे!कपड्यांतुनी मळलो जरी रस्त्यावरी पळतो आहे!प्रवास अपुला सुख दुःखाचा अश्रू सांडण्या पळतो आहे!खाच खळग्यातून मोती शोधण्या प्रवासी होऊनि पळतो आहे!🌹
     🙏🌹🙏🙏🌹🙏
************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-३० जानेवारी २०२४
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)