चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)
चला जाऊया गड-किल्ल्यांवर
*लोहगड किल्ला*
(भाग-०२)
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*********************
... नानाभाऊ माळी
न थांबता प्रवास हा
चाललाय कुणीकडे
स्थळ वेळ काळ थेट
उभ्या छातीवर कडे!🚩
उंच उंच डोंगरावर
उभे डोलणारी झाडे
घेई अंगडाई सृष्टी ही
येथे शूर शिपाई खडे!🚩
उंच भू माथ्यावरी
पडती भिंतीस तडे
लढ म्हणता मावळे
चाले शस्र घेऊनि पुढे!🚩
लोहगड किल्ला उभा
लोह पाऊल तें पडे
सुरतचीं लूट सारी
खजिना लोहगड चढे!🚩
रविवार दिनांक ०२ जून २०२४ रोजी श्वास साहसात एकजीव झाले होतें!प्राण कंठात घेऊन शौर्याच्या ढालीवर तलवारीचे वार सहन करीत होतें!डोळे मावळे होऊन इंच इंच पुढे सरकत होतें!होय इतिहासातील पाने जीवंत झाली होती!शौर्याचं एक एक पान फडफडतं होतं!तलवारीचे खन्न खन्न आवाज कानी पडत होतें!तोफांचां बडीमार कानी येत होता!मी इतिहासातील युद्धभूमीवर होतो!चित्त रनांगणावर होतं!घनघोर युद्ध सुरु होतं!मावळे मायभूमीसाठी लढत होतें!शौर्य गाजवीत होतें!शत्रूला अस्मान दाखवीत होतें!पराक्रमाची शिकस्त सुरु होती!जीवन मरणाच्या भिन्न रेषा निकट येत होत्या!किल्ला रक्ताळला होता!घनघोर जंगलातून शिकस्त देत मावळे किल्ला सर करीत होतें!उंच उंच पर्वत विजय पताका फडकवीत होतें!किल्ला जिंकून ताब्यात घेतला होता!... मी... मी भानावर आलो होतो!....🚩
'चला जाऊया गड किल्ल्यांवर' या मोहिमेचें सरसेनापतीं आदरणीय वसंतराव बागुल सरांच्या आदेशानुसार आमची बस लोहगडाच्या दिशेने पळत होती!अंधारलेली प्रसन्न ताजी पहाट होती!५-३० वाजले होतें!पुण्यातील चंदन नगरहुन आम्ही निघालो होतो!सहप्रवासी शुद्ध प्राणवायुचा अनुभव घेत होतें!आम्ही लोहगड मोहिमेवर निघालो होतो!बस रस्त्याला गुंढाळीत निघाली होती!चंदननगर, शिवाजीनगर,पौड रोड,नेकलेस पॉईंट घोटावडे,पावनाडॅम पार करीत निघाली होती!पवना नदीच्या तिरावरून,डोंगर पायथ्याना स्पर्श करीत निघाली होती!डाव्या बाजूने पवनेचं खोरं, उंच उंच डोंगर,घनदाट जंगलातून रस्ता पार करीत बस लोहगडाच्या दिशेने पळत होती!
डोळ्यात सह्याद्रीचीं उंच उंच पण वेडीवाकडी पर्वतरांग बसेनाशी झाली होती!निसर्गाने मुक्तपणे उधळलेलं दान पाहात होतो!नजर जाईल तेथवर नजरेचे घोडे उधळत होतें!पवना नदीच्या खोऱ्यात हिरवी सृष्टी विसावलेली दिसत होती!तें अनमोल निसर्गदान नजरेला खेळवत होतं!नजरेचे बाण सुटत होतें!दृष्यावर मारा करून माघारी फिरत होतें!विलोभनीय दृश्यबाण हृदयाला आनंद झूल्यावर बसवीत होतें!आमची बस वेडीवाकडी वळणे घेत घाटमाथ्यातून पळत होती!हळूच पवना धरणाच्या पोटाशी येत, वळणदार घाटातून हिरवाईचा नजर अनुभवत आम्ही लोहगडाकडे निघालो होतो!🚩
पवना नदी अन इंद्रायणी नदीच्या खोऱ्यातून उभा सह्याद्री पर्वत आभाळाशी मैत्री करीत उंच उंच चढत होता!अचानक आमची बस अरुंद डांबरी रस्त्यावरील घाटावर चढू लागली होती!जंगलात अदृश्य व्हावी तशी झाडांनी पांघरून टाकले होतें!घाट उंच,वेडावाकडा होता!मध्येच संपूर्ण उभा डोंगर कापून रस्ता तयार केलेला दिसला!उभट अरुंद खिंडीतून रस्ता पुढे सरकत होता!बस चढावर असल्यामुळे दम लागल्यागत पहिल्या गियरवर घरर घरर करीत हिरवाईतून जंगलघाट रस्ता चढत होती!एक ठिकाणी तर रस्त्याच्या उजव्या अन डाव्या बाजूला दोन झाडं अशी उभी होती जिथे एकमेकांना त्यांच्या फांदया आलिंगण देत उभी होती!दोघं झाडं बसला घासण्याची भीती वाटत होती!बस ड्रायवरचीं कसरत यशस्वी झाली,आम्ही त्या विरुद्ध कडेला उभ्या प्रेमिक झाडांमधून पार पडलो होतो!
बसच्या काचांमधून दूरवर नजर टाकली असता!लोहगड उंच डोंगरावर काळी पाषाणी टोपी घालून उभा दिसला!लांबची लांब टोपी उंच डोंगराच्या डोक्यावर शोभून दिसतं होती!आम्ही बसमधूनचं डोंगरावर ताट छाती काढून उभा असलेला किल्ला पाहिला!लोहगड किल्ला झाडांच्या शृंगाराने विलोभनीय दिसतं होता!हळूहळू किल्ल्याच्या पायथ्याशी आलो!अंगावर अतिशय सुरेख गोंदणं कोरावं तशा पायऱ्या त्याच्या पायापासून डोक्यापर्यंत शृंगारून स्वागतास उभ्या होत्या!पायथ्याशी टूमदार, छोटंसं "घेरेवाडी" वसलेलं दिसलं!ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमची बस थांबली!🚩
बस मधून उतरताचं घेरेवाडी ग्रामपंचायत समोर आम्हाला छत्रपती शिवरायांचा अतिशय सुरेख, भारदस्त पुतळा दिसला!तेथे जाऊन डोकं ठेवलं!नमन केलं, "छत्रपती शिवराय!जय भवानी!हरहर महादेव"असा जयघोष केला!अंगात स्फूर्ती अन चैतन्य संचारलं होतं!आम्ही लोहगड किल्ला पहायला आलो होतो!शिवरायांच्यां महा कर्तृत्वाचा इतिहास हृदयात साठविण्यासाठी आलो होतो!एका हॉटेलमध्ये जाऊन प्रथम नास्ता केला!बरोबर सकाळी ९-३० ला किल्ला चढाईस सुरुवात झाली!किल्ला उंच होता!चढायला अवघड नव्हता!पायथ्यापासून आखीव रेखीव,विस्तृत अन मजबूत दगडी पायऱ्यांवरून वर चढत होतो!आजूबाजूला झाडांची सावली पायऱ्यांना सावली देत होती!🚩
काही पायऱ्या चढून गेल्यावर गणेश महाद्वार दिसलं!लाकडी,अतिशय भक्कम अनकुचींदार खिळे असलेला दरवाजा पाहून स्मित झाल्यासारखं वाटतं होतं!आजूबाजूचा संपूर्ण दगडी बुरुज लोहगडाची विशालता दाखवीत होता!नजरेत भरत होता!श्री.गणेशाची मूर्ती दगडी बुरुजात कोरलेली दिसतं होती!आम्ही पहिल्या गणेश महाद्वारातून प्रवेश करून पुढे निघालो!........
(लोहगडाविषयी पुढील भाग-०३मध्ये पून्हा भेटू..)
🚩🚩🚩👏🏼🚩🚩🚩🚩
***************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-०४ जून २०२४
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment