येळकोट येळकोट जय मल्हार, आदेश सह्याद्री ट्रेकर्स

*यळकोट येळकोट जय मल्हार!*
*कडेपठार ते जेजुरी ट्रेक एक अनुभूती*
(आदेश सह्याद्री ट्रेकर्स ग्रुप,हडपसर)
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
***************************
... नानाभाऊ माळी

               माणूस सतत स्वतःची शारीरिक कुवतीची तपासणी करीत असतो. दोर तुटेल इतकं ओढू नये,ताणू नये.आपल्या  शरीराचं देखील तसंच असतं.शरीराला अतिकरू नये पण झेपेल इतकं तरी शरीराला काम द्यायला हवं.साहस आत्मविश्वास,मनाची तयारी ही शरीराची बलस्थानं असतात.आम्ही आमच्या बलस्थानांची तपासणी करून घ्यायला आज रविवार दिनांक १४ जून २०२६ रोजी पहाटे ५ वाजता दुचाकीने हडपसरहून ५१ किलोमीटर लांब असलेल्या खंडोबाच्या जेजुरीला अन जयमल्हारच्या कडेपठारला गेलो होतो.हा ट्रेक नवीन अनुभूती देणारा ठरला.त्याविषयी मनातले बोल 🚩

               ब्रह्मपहाट शुद्ध आचार विचारांना जन्म देत असते.शुद्ध विचारांना घेऊन हिंडत असते.शुद्ध प्राणवायू तिचा श्वास असतो, प्राण असतो. पहाट मोहक असते,प्रसन्न, उत्साही  असते.प्रत्येकाला आनंद, उल्हास भरत असते.जसं जसे उजाडत जातं, उठलेले गावं-शहरं वातावरण अशुद्ध करत सुटतांत. उजाडतानां वातावरणीय अशुद्धता शुद्धतेत मिसळू लागते.म्हणून अंधारलेल्या पहाटकुशीत बसून शुद्धता अनुभण्याची फुशारकी वेगळीचं असते.पहाटेच्या निसर्ग सानिध्यात आपलं आरोग्य सांभाळल्यासं दीर्घायुष्याचा लाभ होत असतो. *आदेश सह्याद्री ट्रेकर्स ग्रुप* हडपसरच्या वतीने कडेपाठार तें ते जेजुरीचा साहसी प्रवास आयोजित केला होता.आम्ही आपापल्या वाहनांनी,अर्थात दुचाकी वाहनांनी निघालो होतो. बरोब्बर पहाटे ५ वाजता हडपसरहून निघालो होतो. एकामागोमाग सर्वचं निघालो होतो. समोरून येणाऱ्या मोठया वाहनांचा तीव्र प्रकाशझोत आमच्या अंगावर, डोळ्यांवर येत होता.गाड्या भुर्रकण निघून जात होत्या.हळूहळू प्रसिद्ध दिवे घाट लागला होता.संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ज्या मार्गांवरून जाते तो दिवे घाट आला होता.पूर्वीचा अरुंद घाट आपली रुंदी वाढवत आता वळणदार, नागमोडी झाला आहे.निसर्गाचा अविस्मरणीय अविष्कार आहे.घाट-माथा अन झाडांनी व्यापला आहे.आम्ही १५ते १६ ट्रेकर्स एकमेकांच्या सोबतीने दुचाकीवरून निघालो होतो. 

                  सकाळचा अलौकिक आनंद घेत दुचाकी जेजुरी गडाकडे निघाल्या होत्या.दिवे घाट पार करून सासवड शहर आलं.ज्या संतांनी, महंतांनी, विचारवंतांनी सासवड शहर ओळखलं जातं अर्थात प्राचीन चांगांवटेंश्वर महादेव मंदिर, संगमेश्वर महादेव मंदिर, संत शिरोमणी सोपानदेव काका जे संत ज्ञानेश्वर महाराजांचे लहान बंधू आहेत त्यांची समाधी,पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांची पहिली राजधानी सासवड होती.तर अष्टपैलू व्यक्तिमत्व अन *कऱ्हेचं पाणी* म्हणून, *झेंडूची फुले* म्हणून पुस्तकं गाजली असे प्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार  राजकारणी प्रल्हाद केशव अत्रे सरांचं मुळगाव *सासवड* आलं होतं.🚩

               सासवडहून पूढे महादेव अवतार श्रीखंडोबा जेजुरीच्या दिशेने आम्ही निघालो होतो.खंडोबाच्या कडेपठार ते जयमल्हार जेजुरीकडे निघालो होतो.आम्ही सर्व सदस्य आमच्या उद्दिष्टाकडे निघालो होतो.सकाळी उगवत्या सूर्यदेवाच्या साक्षीने कडेपठाराच्या पायऱ्या चढत होतो.येथील मंदिर हे मूळ मंदिर असून.अनेक जणांचे कुलदैवत देखील आहे.उंच पर्वताच्या सभोवती बोडक्या वृक्षाचं जंगल होतं.त्यातून दगडी पायऱ्यांवरून कडेपठारकडे आमची चढाई सुरु होती.साधारण तीन किलोमीटर चढ चढत होतो. जागोजागी छोटीमोठी दुकानं मांडली होती.भंडाऱ्याच्या पिशव्या होत्या अजून खंडोबाच्या पूजेसाठी आवश्यक पूजेच्या वस्तू होत्या वेड्यावाकड्या उंच चढाईने दम लागत होता.थोडा घामही येत होता.चढतांना दम लागणे म्हणजे फुफुसांची परीक्षा पाहणे होतं. आम्ही सकाळी ७-४५ ला कडेपठारच्या उंच डोंगरावर प्राचीन श्रीमार्तंडभैरव,श्रीखंडोबा मंदिरापाशी पोहचलो होतो.प्राचीन अख्यायिकें नुसार राक्षसांचा वध करण्यासाठी मनी, मल्ल या राक्षसांचा वध करण्यासाठी श्रीमार्तंड भैरवाचा जन्म महादेवास घ्यावा लागला होता.

             प्राचीन काळ्या पाषाणात बांधलेलं मंदिर अन त्यासमोर तांबे पितळाच्या कासवाची विशाल प्रतिकृती दिसतं होती. त्यावर भाविक भक्त श्रद्धेनें भंडारा उधळीत होती.आम्ही सर्व भाविक ट्रेकर मनोभावे कडेपठार येथील प्राचीन मंदिराच्या कळसाला नमन करीत होतो.मुखी श्रद्धेनें  'जय मल्हारचा' उदघोष करीत कपाळी भंडारा लावला. दर्शन घेऊन कडेपठराहून जेजुरीच्या खंडोबा मंदिराकडे चालायला सुरुवात केली होती.अंतर साधारण चार किलोमीटर असावं.नैसर्गिक डोंगराचा चढ-उतार आमच्या पायांची, गुडघ्यांची परीक्षा घेत होता.आम्ही उंच पठारावर होतो.दूरवर नजर टाकल्यावर सह्याद्रीच्या अनेक रांगा दिसतं होत्या.उंच उंच पर्वत दिसतं होतें.

           दूरवर जेजुरीच्या खंडोबाचा कळस आम्हाला येण्यास सांगत असावा. आम्ही ८-३५ ला निघालो होतो. चालतांना खडकाळ उतार होता. सकाळीच उन्हाची तीव्रता जाणवतं होती.हलकसा वारा मनाला उत्साह देत होता. कधी कधी चढ उतार कठीण येत होतें.मनावर हृदय राज्य करतं तेव्हा आपण जिंकण्याच्या जवळ पोहचतो.आमचं हृदय जेजुरी निवासी श्रीखंडोबाच्या दर्शनासाठी व्याकुळ होतं. व्याकुळतेत ओढ होती. शरीराला कष्ट देण्याची तयारी होती. देवदर्शन कठीण असतं तसं हृदय तृप्तीचं साधनही असतं. हळूहळू आम्ही आमच्या साध्याजवळ पोहचलो होतो. कडेपठारहून चालत निघालो होतो. 

           आम्ही श्रीखंडोबा मंदिराच्या मागील पश्चिम महाद्वारातून प्रवेश केला अन भाविकांचा, भक्तजनांचा विशाल श्रद्धाळू सागर डोळ्यात मावत नव्हता. भक्तजन दर्शन रांगेने पुढे चालत होती.आज रविवार आहे. त्यात उद्या सोमवती अमावश्या असल्याने श्रद्धाळुंची भक्ती लाट आली होती.देवाला भाव अर्पण केला कि अंतंच्क्षुतून देवदर्शन होत असतं. आम्ही विशाल कासवावर उभे राहून भंडारा उधळीत होतो. संपूर्ण गड सोनेरी झाला होता.भंडाऱ्याने आम्ही लोखंड सोनेरी झालो होतो. भावभक्तीची ओढ विरहातून जन्म घेते.आम्हाला देवदर्शन झाले होतें. थकवा दूर पळून गेला होता.आमच्या मुखी सहजच 'येळकोट येळकोट जय मल्हार' अशी भक्तीसाथ उरातून बाहेर पडत होतें. 'आमचा कडेपठार ते जेजुरीगड' ट्रेक श्रीखंडोबाच्या कृपाशीर्वादाने पूर्ण झाला होता.
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी 
हडपसर,पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१४ जून २०२६
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol