प्रतिभास्पर्शी मित्र संजय धनगव्हाळ

*प्रतिभास्पर्शी मित्र संजय धनगव्हाळ*
🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
****************************
... नानाभाऊ माळी


            मैत्री कशी असावी?मित्र त्याच्या अंतःकरणाचे अबोल बोल मुखातून व्यक्त करणारा असावा, प्रसवणारा असावा.मैत्रीचं मूळ अन सुरुवात कशी होतें मग?मैत्री कधी बालपणाची असते.कधी शाळेतील असते.कधी पुढील शिक्षणातून होतें. कधी कुठेतरी भेटीत, गाडीत, एसटीत, प्रवासात कुठेही सार्वजनिक ठिकाणी भेटल्यावर होऊ शकते.कधी संबंधित ऑफिसमध्ये कामानिमित्त होतें.भेट होतें ओळख होतें. विचार जुळतात मैत्री होतें. पुढे मैत्री वृद्धिंगत होत जाते.कधी कुठल्यातरी समारंभात, कार्यक्रमानिमित्त ओळख होऊन मैत्रीत रूपांतर होतें.

               आता अलीकडे मैत्रीचा परीघ खूप विस्तारला आहे.मोबाईल, फेसबुक, व्हाट्सअप, इस्टाग्रामनें माणसं जवळ आणली आहेत. माणसं जोडली गेली तरीही या क्षेत्राने हृदय जिंकलं आहे का ?सोशल मेडियामुळे माणसं जवळ आली,जोडली गेली.आभासी मैत्रीत आंब्याचा, उसाचा, संत्रा,मोसंबी सारखा गोडवा असतो का मग?आपण जेवतोय,जिभेला चवचं नाही तसं आभासी माध्यम मैत्रीचं तर होत नाहीये ना?अशा ठिकाणी हृदय ओढ घेत असतं का?अशा आभासी दुनियेत अनेक माणसं जोडली गेली आहेत.व्हाट्सअपनें चॅटिंग होतंय. फेसबुकवर विविध पोस्ट टाकून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. अंतःकरण ते अंतःकरणाला ओलावा मिळतोय असं वाटत नाही.कृत्रिमता पदोपदी जाणवत राहते.मनात रुखरुख असतेच.यात प्रत्यक्षात बोलण्यातलं समाधान जे आमरस प्यायलासारखं  असतं,तृप्त ढेकर देणारं असतं.तसं सोशल मेडियातील बोलण्यातून, चॅटिंगमधून मैत्री जन्माला आली तरी गावठी गीर गायचं दूध पिण्याचं समाधान लाभतं नाही.जर्शी गाईचं दूध मुखी लावण्यासारखं वाटत असतं.🌹

      तरीही सोशल मेडियाने प्रचंड क्रांती केली आहे.जगातील माणसं जवळ आणली आहेत,जोडली आहेत. असेच आमचे एक जिवलग मित्र  कविसंमेलनात भेटले होतें. पुढे व्हाट्सअपमधून आमचा संपर्क वाढत गेला.आम्ही एका धाग्यात शिवले गेलो.जोडले गेललो.हे मित्र उत्तम साहित्यिक असल्यामुळे त्यांच्या कथा, कविता व्हाट्सअप, फेसबुकवर नेहमीचं वाचत असतो. यातून आमची मैत्री वृद्धिंगत होत गेली.चार-पाच वर्षं झाली असतील, त्यांच्या लेखणीची ताकद वेगळीचं आहे. त्यांच्या जादूई प्रतिभेला नमन करतो.माझ्या वाचक,श्रोता मनावर त्यांच्या साहित्यिक विचारांचा पक्का ठसा उमटला आहे.त्यांच्या लेखणीतून अनेक विषयांना स्पर्श होत असतो.त्यांच्या कथा-कविता मनाला भावतात.अत्यंत हृदयस्पर्शी वाटतात.त्यांतून समाजाचं उत्तम दर्शन होत असतं.खरं म्हणजे मी त्यांच्या साहित्यिक संकल्पना, गाभ्याचा फॅन झालो आहे.असे कवीमित्र प्रत्यक्षात भेटल्यावर किती आनंद होईल बरं!!!🌹

              पुण्यातल्या पत्रकार भवन शेजारी असलेल्या एस.एम.जोशी फौंडेशन सभागृहात *वैशाखी वादळ वारा कवी संमेलन* मृगनक्षत्राच्या प्रारंभी दिनांक ७ जून२०२६ रोजी संपन्न झालं. आयोजक होतें प्रसिद्ध *ग्रामीण कवी चंद्रकांतजी जोगदंड सर.* कविसंमेलनास अनेक मान्यवर अन महाराष्ट्रात नावलौकिक मिळविलेले कवी उपस्थित होतें.कविसंमेलनात कवीनी आपल्या रचना सादर केल्या होत्या.त्यात माझे कविमित्र *संजयजी धनगव्हाळ सर* देखील आले होतें.महाभारतातील दिव्यदृष्टी प्राप्त संजयासारखीचं प्रतिभादृष्टी संजयजी धनगव्हाळ सरांना प्राप्त असावी.आडनाव देखील *धन* *गव्हाळ* अर्थात धन गव्हाळ असं आहे. श्रीसरस्वतीची,श्रीलंक्ष्मीची कृपादृष्टी प्राप्त संजयजी प्रतिभा संपन्न आहेत.माणूस पैशाने श्रीमंत नसला तरी मनाने श्रीमंत असला की भौतिक सुखापेक्षा आत्मिकसुखी, आनंदी व्यक्ती श्रीमंत असते.तेथे सुदामा कृष्ण असा भेद राहात नाही. दोघेही लक्ष्मी-सरस्वती रूप आहेत.  आमचे कवी मित्र संजयजी विशाल हृदयी आहेत.त्यांच्या प्रतिभेची श्रीमंती पदोपदी अनुभवत होतो.

                        तिसऱ्या प्रहरी ०४ वाजता सुरु झालेल्या कविसंमेलनात संजयजी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले हे आयोजकांचं भाग्य होतं.रात्री उशिरा कविसंमेलन संपन्न झाले.सर्व कवी रसिक मित्रांचा हृदय हृदयाला स्पर्श करीत निरोप घेत एस एम जोशी सभागृहातून बाहेर पडलो.माझं महाभाग्य होतं की कवी संजयजी धनगव्हाळ सर रात्री मुक्कामी आपल्या घरी आले होतें.घरी साहित्यिक मंथन झालं.रात्र साहित्य संतासोबत होती. मनाची श्रीमंती घेऊन हिंडणारे धुळ्यातील संजयजी जातांना त्यांच्या प्रतिभा गाभ्यातून थोडं शब्दगोड मध आमच्या हृदयी देऊन गेलेत.मला जाणवत होतं, त्यांच्या प्रतिभा स्पर्शाने शब्द संस्काराने,शब्दधनाने मला हळूहळू संजयासारखी प्रतिभा दृष्टी येऊ लागली होती.हे माझं स्वप्न तर नव्हतं ना? अशी सदविचारी माणसं सतत दिव्य प्रकाश देत राहावो हिचं ईश्वराकडे प्रार्थना करीत.मित्र संजयजीनां निरोप दिला.
🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
****************************
... नानाभाऊ माळी 
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१६ जून २०२६
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol