शिवनेरी किल्ला शक्तीस्थळ (आदेश सह्याद्री ट्रेकिंग ग्रुप )
*शिवनेरी किल्ला शक्तीस्थळ*
🚩🚩🚩🙏🚩🚩🚩
(आदेश' सह्याद्री ट्रेकर्स,हडपसर)
***************************
... नानाभाऊ माळी
तो काळ अत्याचारी राजसत्तेचा होता.अस्मानी सुलतानीचां होता!रयत जुलूम सहन करीत जगत होती.आया बहिणींची आब्रू लुटली जात होती.रक्षणास एखादा दैवी अवतार येईल या आशेवर लोकं जगत होती.एखादी विलक्षण शक्ती धावून येईल या आशेवर जगत होती. कुतूबशाही, आदिलशाही, निजामशाही, मोघलशाहीने सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यात आहाकार माजवीला होता.उच्छाद मांडला होता.🚩
जेव्हा जेव्हा धर्मावर प्रचंड संकट येतं तेव्हा दैवी अवताराचां जन्म होतं असतो.शिवनेरी किल्ल्यावर माँसाहेब जिजाऊंच्या पोटी आशाचं एका तेजस्वी सपुत्राचा जन्म झाला होता. पूर्व क्षितिजावर तेजस्वी सूर्य वर येत होता.शांत, शीतल, प्रसन्नता किल्ल्यावरील हिरवाईतं एकरूप झाली होती. शिवनेरी किल्ल्यावर सूर्यासम तेजस्वी सुपुत्र जन्माला आला होता. माता, पिता अन रयतेची वेदना, दुःखाचे मळभ काही अंशी कमी झाले होतें.चौफेर उंच किल्ल्यावर पुत्रजन्मानंद साजरा होत होता. किल्ल्यावर आनंदी आनंद विलसत होता. शिवनेरी किल्ल्यावरील संपूर्ण दगडी हवेली सजली होती!शहाजी राजांना पुत्ररत्न प्राप्त झाले होतें. आगमन झालेल्या युगपुरुषासाठी महान आनंदी दिवस होता! *तो शुभदिवस होता १९ फेब्रुवारी १६३०!* 🚩
माझ्या डोळ्यासमोरुन सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट पुढे सरकत होता.मी...माझी इतिहासातील अत्यंत लढवय्या पानावरून नजर फिरत होती.सर्व सर्व आजचं घडतंय असं वाटत होतं.इतिहास ताजा वाटत होता ' *शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांचा जन्म झाला होता!* हे नाव आमच्या हृदयात कोरले गेल्यावर अंगातं रोमांच उठत होतें.अशा क्षणी कोणीही स्वतःस विसरेलं.आम्ही ज्या शक्तीने प्रेरित होऊन शिवनेरी किल्ल्यावर साहसी ट्रेक केला होता,ती दिव्यशक्ती प्रेरणा देत होती.आम्हाला ज्या दिव्य शक्तीने चेतविले आहे,त्या शक्ती दैवताचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.आमच्या हृदयात गौरव अन स्फूलिंग फुलतं होतं!मुखातून गर्वाने शब्द फुटत होतें *"छत्रपती शिवाजी महाराज की जय!"* आपल्या अंगात प्रचंड वीज चमकत ऊर्जा निर्माण होऊ लागते. पुन्हा एकमुखी जय जयकार सुरु होतो,*'शिवाजी महाराज की जय!जय भवानी!जय शिवाजी*' ही गर्जना आकाशाला भिडू लागते. पराक्रमी राजांचा इतिहास डोळ्यासमोरून तरळून जात होता.
ज्यांच्यामुळे आम्ही हिंदू म्हणून जन्मलो आहोत त्यांचे आमच्यावर कित्येक जन्माचं ऋण आहे.तें आयुष्यभर यवनांशी लढत राहिले. जिद्दीने सर्व शक्तिनीशी एक एक किल्ला जिंकत राहिले!हातोहात भगवा ध्वज देत राहिले.अभिमानाने सांगतो अशा जगदविख्यात राजाला कोटी कोटी नमन करतो.त्या पुनित दगडी हवेलीला नमन करतो. जन्मस्थळाला कोटी कोटी मुजरा. शिवनेरी किल्ल्यावरील *श्रीशिवाई देवीला* नमन करतो. ज्या लढवय्या महामातेने पौलादी युगपुरुषांस जन्म दिला त्या माँसाहेब जिजाऊंच्या चरणांवर सदोदित माथा टेकवावासा वाटतो " *छत्रपती शिवरायांचा* जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.होय आम्ही ४० मावळे, साहसी वीर, रविवार दिनांक ३१ मे २०२६ रोजी *हडपसर येथील आदेश सह्याद्री ट्रेकिंग* ग्रुप सोबत गेलो होतो. महाराजांच्या जन्माने पुनित झालेल्या भूमीचं दर्शन घेण्यासाठी, शिवनेरी किल्ल्यावर गेलो होतो. समुद्र सपाटीपासून साधारण ३००० फूट उंचावर असलेल्या गिरीदुर्गावर गेलो होतो. शिवनेरी किल्ला पुण्यापासून १०५ किलोमीटर लांबवर जुन्नर शहराला लागून आहे!
शिवनेरी किल्ल्यास घनदाट जंगलाने वेढलेलं आहे.पायथ्यापासून किल्ल्याच्या शिखरावर पाहिले असता किल्ला उंच उंच आकाशाशी स्पर्धा करणारा वाटतो.पायथ्या पासून अतिशय नयन मनोहारी दिसतोचं दिसतो.कातळ छातीचा, भक्कम तटबदी अन बुरुज असलेला शिवनेरी किल्ल्याचं बांधकाम यादव कालीन १२ व्या शतकातील आहे. कालांतराने ज्या ज्या राजवटी आल्या त्यांनी पुनर्बांधनी केलेली दिसून येते.त्यांच्या ओळखी मागे ठेवून गेलेले आहेत.त्याकाळी सह्याद्री रांगेतील नाणेघाटात व्यापार सुरळीत चालावा म्हणून शिवनेरी टेहळणी किल्ला बांधला असावा. किल्ल्यावर चढण्यासाठी पायरीमार्ग अन साखळी मार्ग असे दोन मार्ग आहेत.हा किल्ला तसा चढाईसं कठीण नाही.साखळी मार्गाने थोडा कठीण वाटतो.आपण अवघ्या अर्ध्या तासात छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळी पोहचू शकतो.🚩
किल्ल्यावर भव्य *शिवाई देवीचं मंदिर* असून गडावर चढतांना एकूण सात प्रवेशद्वार आहेत. एक एक करून सात दरवाजे पार करून छत्रपती शिवरायांचं जन्मस्थळ दिसतं. महाद्वारापासून सुरुवात होतें. त्याला तीन कमानी आहेत. चुना दगडांनी बांधलेल्या भव्य कमानी वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे.होऊन गणेश द्वार,पिराचा दरवाजा, हत्ती दरवाजा, शिवाई देवी दरवाजा,मेनाचा दरवाजा, कुलूपबंद दरवाजा असे विविध दरवाजे वेगवेगळ्या राजवटीने बांधलेले आहेत.यादव, बहामी, मोघल, निजाम अशा राजवटींनी किल्ल्याचं बांधकाम केलेलं दिसतं.शिवनेरी किल्ला निजामाने छत्रपती शिवरायांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांना भेट दिला होता.🚩
किल्ल्यावर अंबरखाना अर्थात भव्य धान्यकोठार बांधलेलं आहे. अनेक खिडक्या त्यात दिसतात.हे काम निजाम राजवटीत बांधलेलं असावं. पूढे गेल्यावर पाण्याचे टाके आहेत. झरे आहेत त्यांचं नाव गंगा, यमुना असं आहे. वरती शिवकुंज असून
किल्ल्याच्या उंच, भव्य सपाटीवर दर्ग्यासारखे बांधकाम दिसतं. पुढे गेल्यावर ज्या अतिशय सुंदर दगडी वास्तूत छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला ती वास्तू पाहून डोकं आपोआप नतमस्तक झालं होतं. वास्तूत महाराजांची मूर्ती असून पाळणा देखील आहे.तेथून दुसऱ्या मजल्यावर चढून गेलो असता खिडकीतून लांबवरचा परिसर दिसतो.मागे नाणेघाटातील सह्याद्रीच्या अनेक डोंगर रांगा दिसतात.किल्ल्याच्या उत्तरेला टकमक टोक सुद्धा दिसतं. पायथ्यापासून उभट कडा दिसतो. गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी टकमक टोकाचा उपयोग केला जात असावा.शिवनेरी किल्ल्यावर महाराजांना नतमस्तक होण्यासाठी जायचं असेल तर हिवाळा,पावसाळा म्हणजे निसर्गाचा भिन्न अविष्कार अनुभवण्याची उत्तम संधी आहे.निसर्गाच्या कुशीत एक दिवस जावं.किल्ल्यावर चढाई करावी.छत्रपती शिवाजी राजांचा मावळा म्हणून चढाईची परीक्षा द्यायची.भूतकाळातील छत्रपतींचीं लढाई अन प्रचंड शौर्य डोळ्यासमोरून फिरू द्यायचं. छत्रपतींचां प्रताप अन रूप आठवावे.आपलं जगणं धन्य करून घ्यावं.आम्ही महाराजांना आमच्या अंतरी बसविन्या शिवनेरी किल्ल्यावर गेलो होतो. जन्माचं सार्थक झालं असं वाटतं!
*जय भवानी!जय छत्रपती शिवराय!*
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
*****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०५ जून २०२६
nanabhamali.blogspot.com
Comments
Post a Comment