पंढरपुरी श्रीविठ्ठलरूपात एक झालो

*पंढरपूरी श्रीविठ्ठलरूपात एक झालो*
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी

            आपल्याला तहान लागली की पाणी पीतो. भूक लागली की जेवण करतो!मन, बुद्धी, हृदय हे देखील व्याकुळ होत असतात. त्यांनाही भूक असते. व्याकुळता असते. समाधानाची ओढ असते. माणूस जसंजसा श्रद्धाळू होत जातो तसा श्रद्धा दैवताद्वारी आपलं हृदय अर्पण करण्यास आतुर होत असतो. व्याकुळ असतो.आराध्य दैवताच दर्शन झाल्याशिवाय चैन पडत नसते.सतत हुरहूर लागून असते, बेचैनी सतत वाढत राहते. आराध्याशी मन एकवटलेलं असतं. समस्त महाराष्ट्राचं आराध्य दैवत *श्रीविठ्ठल आहे,पांडुरंग आहे!* भक्त भक्तीत व्याकुळ होतो. दर्शनाची आसं कष्ट देत असते.विठ्ठल भाव भक्तीचा भुकेला असतो,असं मानलं जातं.महाराष्ट्रातून काही लाख वारकरी पंढरपूरला जातात.एका मागोमाग दिंड्या चालत असतात. वारकरी श्रीविठ्ठलाचं गोड नाम घेऊन, धावा करीत, *रामकृष्ण हरीचा* गजर करीत,जय जयकार करीत पंढरपूरच्या दिशेने चालत असतात,पळत असतात.भजनात तल्लीन होऊन वारकरी दिंड्यासोबत पळत असतात.सोबतीला विठ्ठल नामामुखे  *माऊली ज्ञानोबा-जगद्गुरू तुकारामांचें* अभंग गात,टाळ मृदूंग वाजवीत, देव भक्तीभाव हृदयी ठेवून वारकरी मैलोंमैल पळत असतांत.घराची कसलीही ओढ नाही. विठू माउलीचं दर्शन व्हावं हिचं आसं मनात असते.... 🚩

                महिन्याभरापासून जेष्ठ अधिक मास सुरु आहे.जेष्ठ मासात फक्त देवकार्य पार पाडली जातात असं म्हणतात. पवित्र देवगंगा नदी, यमुना नदी, इंद्रायणी अन चंद्रभागेत डुबकी लावून जन्मोजन्मीचं पूण्य आताच या अधिक मासात,पदरात पाडून घेण्यासाठी माणसं भक्तीभावाने देवद्वारी दर्शनाला जातं आहेत. देवळात,पवित्र नद्यामध्ये भक्तीची प्रचंड लाट उसळली आहे.माणसं दानधर्म करून पुण्याचा संचय करीत आहेत.श्रद्धेनें  देवकार्यात व्यस्त आहेत.साठीनंतर माणसाची वाटचाल सर्वोच्च शिखराकडून उताराला सुरु होतें.वृद्धत्वाकडे सुरु होतें.मस्त मजेत बोनस आयुष्य जगावंसं वाटतं.मनाचा कल देव देवदर्शनाकडे कल झूकू लागतो.... आम्ही देखील वृद्धत्वाच्या वाटेवरील प्रवासी आहोत.मागे काही महिन्यांपूर्वी पंढरपूरला जावंसं वाटत होतं.साक्षात पंढरपूर निवासी श्रीविठ्ठलानें अधिकमासात बोलवण पाठवलं असावं. कोणी साठीपार तें कोणी ८० पार व्यक्ती होत्या.

               मंगळवार दिनांक ०८ जून २०२६ रोजी,८० व्या वर्षांत पदार्पण केलेले. थोर विचारवंत,पुणे जिल्हा जेष्ठ नागरिक संघ समन्वय समितीचे उपाध्यक्ष अन हडपसर, तरवडे वस्तीच्या शतायू जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष आदरणीय एम.एन कोंढाळकर भाऊसाहेबांचा फोन आला होता,'नानाभाऊ आम्ही उद्या सकाळी ०६ वाजता रामभाऊ तरवडे यांच्या कारनें पंढरपूरला जाणार आहोत.सोबत ज्ञानेश्वर माऊली देखील आहेत.तुम्हाला यायचं असेल तर स्वागतचं आहे!"श्रीहरी विठ्ठलाच्या मनात असावं!अधिक मासानिमित्त पंढरपूर निवासी भगवंताने बोलावून घेतलं असावं. योगायोग अन भाग्य असतं. *भाऊंनी विचारावं अन मी लगेचं हो म्हणावं!* ०९ तारखेला प्रातसकाळी प्रयाण देखील केलं. जातांना शिखर शिंगणापूरला महादेवाचं दर्शन घेतलं. देव मनामनात,कणाकणात असतो.जशी श्रद्धा तसं दर्शन असतं. आम्ही प्राचीन मंदिरात होतो. शिखर शिंगणापूर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.प्राचीन वास्तुकलेच निरखून दर्शन घेत असतांना अंतरी श्रद्धा अवतरली होती. देव भाव, हृदय एकरूप झाले होतें.🚩

                 शिखर शिंगणापूरहून पंढरपूरला निघालो आदल्यादिवशी पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र छोटी मोठी डबकी भरली होती. आमची कार पळत होती.श्रीहरी विठ्ठलानें प्रिय भक्तांना जणू स्वप्नी येऊन बोलावून घेतलं असावं. पंढरपूरात पोहचलो अन चंद्रभागेतीरी एक एक पावलं टाकत चालत होतो.विशाल नदीच्या पात्रात पाण्याची छोटीशी धार वेडीवाकडी वाहातांना दिसली.त्यात  डुबकी मारण्यासाठी सर्वत्र भक्तजन दिसतं होतें.वाळूमुळे उन देखील तापलं असावं.चटका बसणार उन सहन करीत आम्ही नदीपात्रात हातपाय धुतले.अधिकमासाचं पुण्य पदरी पाडण्यासाठी हरीचे भक्त श्रीहरी विठ्ठलाच्या दर्शनास आले होतें.जवळपास दोन लाखाहून अधिक भक्तजन दर्शनास आले असावेत. नदीतील भक्त पुंडलिकाच्या समाधी मंदिराकडे हात जोडून दर्शन घेतलं.

            नदीपात्रातून पायऱ्या चढून हृदयाला ओढ लावणाऱ्या, व्याकुळ करणाऱ्या श्रीविठ्ठलाच्या दर्शनाला निघालो होतो.व्याकुळतेची ओढ तडफडायला लावते.भक्तीची ओढ डोळ्यातून अश्रुंचा बांध फोडते. विठ्ठलनामाची विरहणी होऊन विशाल रूपात एकरूप व्हावंसं वाटतं.भक्तीची ओढ जन्म मरणाची शृंखला तोडण्यास आळवणी करीत असतें, विनवणी करीत असते.आम्ही चंद्रभागेच्या एकेक पायऱ्या चढून पुढे चाललो होतो.दुरूनच विठ्ठलाचां कळस दिसतं होता. भक्तीभावांनें हात जोडले गेले होतें. एक एक पावलं पुढे पडत होती.जगद्गुरू संत नामदेवांच्या पायरीवर डोकं ठेवलं. साक्षात आपल्या हाताने विठ्ठलाला जेऊ घालणारे प्रिय भक्त नामदेव महाराज दिसत होतें.पायरीच दर्शन घेऊन संत चोखोबांच्या समाधीचं दर्शन घेतलं.पंढरपूरचं हरीअमृत हृदयी उतरत होतं.देवदर्शन आनंद देत होतं.चौऱ्यांएशी योनीचा फेरा पूर्ण होऊन जणू हरीविमानात बसून कैलासाचा प्रवास आरंभीला होता असा आत्मिक आनंद होत होता. श्रीविठ्ठल दर्शन झालं होतं.
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
*****************************
... नानाभाऊ माळी 
हडपसर, पुणे -४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१२ जून २०२६
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol