चला जाऊ गड -किल्ल्यांवर (अर्नाळा जलदुर्ग, जि. पालघर, ता. वसई )

*चला जाऊया गड-किल्ल्यांवर*
(*अर्नाळा जलदुर्ग*,जि.पालघर) 
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी 

किल्ल्याभोवती पाणीचं पाणी
 अथांग पाणी,नजरेत पाणी!

भुंग दुरुनी वादळ कानी
समुद्र दाता आहे दानी!
 
वारा ही ढोल वाजवितो
नावाडी कधी शब्द बडवितो!

पाण्यावरीं बोट नाचते
त्या दूरवर घंटा वाजते!

कान कधी तृप्त होतांत
डोळेही धुंद होतात!

समुद्रातूनी होतं मंथन 
आतून बाहेरून सारे चिंतन!

पिकवितो हा सागर मासळी
घेते ती किनाऱ्यावरीं उसळी!

देश-वेष सारं सारं वेगळं
नयनी प्यावे दिव्य सगळं!

दूर बेटावरून बोट निघते
स्वतःस ती समुद्रार्पित होतें! 

           समुद्र,नाव,मासळी,मानसे. सर्वचं आगळे वेगळे दिसतं!आपण नजरेत भरून घेत बघत बसायचं!..🚩

        समुद्राचा माथा असतो दणकट 
चालती बोटी डोक्यावर फटफट!

बेट एकटं दिसतं दूरवर
भरती ओहटी नाचती सुरवरं!

जिकडे तिकडे बोटीच बोटी
कधी मासळी कधी ओहोटी!

काठ किनाऱ्याला येते भरती
बोटी खोलवर मासळी सरती!

दिसे उघडा नागडा किनारा
दुरुनी दिसतो दिपमनोरा!

   सारं जगणं माणसं पळती 
सुकट बोंबील उन्हात वाळती!

    असं असं आगळं वेगळं ठिकाण आहे समुद्रसानिध्य अर्नाळा गावं, *अर्नाळा किल्ल्याचं*🚩

            *अर्नाळा* किल्ला कुठे आहे बरं? तर पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात अर्नाळा गावासमोर हा किल्ला विसावला आहे.वसई पासून अवघ्या १२ किलोमीटर लांब अन विरार बसस्टॅंडपासून अवघ्या ६-७ किलोमीटर अंतरावर अर्नाळा गाव आहे.अर्नाळ्याचं निसर्गसौंदर्य अतिशय विलोभनीय असून नेमकं अन, ठळकपणे ते सारं दृश्य डोळ्यात भरतं!... समुद्रकिनारी लाकडी सांगाड्यावर टांगलेल्या मासळी,सुकट बोंबीलचा *वेगळाचं घम घमाट गंध* घेत चालत पुढे गेलं की समुद्राचं अथांग रूप नजरेस पडतं.सागराकडे दूरवर नजर टाकल्यावर एका बेटावर कित्येक शतकं आपल्याचं नादात एकांती उभा अर्नाळा किल्ला दिसतो!हा किल्ला इतिहासात नाव कोरलेल्या निवडक किल्ल्यांपैकी एक आहे. अनेक तोफा, तलवारी, भाले यांचा धडामधूम, खणखनाट या किल्ल्याने सहन केला आहे.अनेक वार आपल्या तटबंदीरूपी पाठीवर घेत सहन केला आहे!

                    आम्ही किनाऱ्यालगत बांधलेल्या *जेट्टीवर* चढून समुद्रात उभ्या असलेल्या बोटीवर चंढलो. प्रत्येकी २०-२० रुपये बोटवाल्याला दिल्यावर बोट किल्ल्याकडे निघाली होती.आम्ही सहलीस आल्याने आयोजकांनी पैसे भरले होतें. डिझेल इंजिनचा आवाज लोकांना अन बोटीला साद घालीत होता. बोटीवरून अवघ्या १५ ते २० मिनिटात किल्ल्याजवळ जाऊन पोहचलो होतो.अर्नाळा किल्ला साधारणत: ७०० चौरस मिटर क्षेत्रात पसरलेला आहे.किल्ला भक्कम तटबंदीच्या आत अजूनही ताठ मानेने उभा आहे.सन १५१६ पर्यंत गुजरातच्या बेगडा सुलतानाने राज्य केलं होतं.त्यानंतर पोर्तुगीजांच्या हाती किल्ला गेला होता.सन १७३८पर्यंत त्यांनी राज्य केलं होतं.वसईचा किल्ला चिमाजी आप्पांच्या शूर सैनिकांनी शौर्य गाजवीत जिंकल्यावर होता. वीर धर्माचं पालन करीत मराठयानी अर्नाळा किल्ला देखील जिंकला होता.सन १८१८ पर्यंत इंग्रजांनी सारा हिंदुस्थान गिळंकृत करतांना हा किल्ला देखील ताब्यात घेतला होता.

                अर्नाळा किल्ला घेऊन अनेक पिढ्यांना आपल्या अंगा खांद्यावर खेळवत उभा आहे. तटबंदीची उंची साधारण ३०ते ३५ फूट असावी.अन रुंदी ९ते १० फूट असावी.गुजरातचा सुलतान महमूद बेगडापासून ते पोर्तुगीज,मराठा,इंग्रज अन आता स्वतंत्र भारतात स्वातंत्र्य उपभोगणारा किल्ला,अर्नाळा गावापासून समोर समुद्रातील बेटावर कित्येक शतकं उभा आहे.

           अर्नाळा किल्ला पुण्यापासून २०० किलोमीटर लांब असून मुंबई पासून अवघ्या ४५ किलोमीटर अंतरावर आहे.हा किल्ला गुजरात रोडला पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात आहे.हा जलदुर्ग समुद्रातील अर्नाळा बेटावर कित्येक शतकं उभा आहे.अर्नाळा जलदुर्ग अतिशय सुरेख असून चौकोनी आकारातील तटबंदीतं बंदिस्त आहे. सभोवती नजरेच्या टप्प्यात अथांग पाणी दिसतं.सागरातील पाण्याचें वळणदार तरंग मन मोहून टाकतं.किनाऱ्यावरुन समुद्राच्या अथांगतेवर मात करीत किल्ल्यावर ये जा करणाऱ्या अनंत बोटी दिसत होत्या.कित्येक शतक उन, वारा, पावसाचा प्रचंड तडाका सहन करीत  काळ्याशार पाषानातील भक्कम बुरुज अन तटबंदी अजूनही उत्तम अवस्थेत उभ्या दिसतात.मुख्य प्रवेशद्वाराचं बांधकामशैली अफलातून असून वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असावा.अर्नाळा किल्ला भिन्न राज्यकर्त्यांची ओळख किल्ला करून देत असतो.हत्ती अन ड्रॅगन सारख्या प्राण्यांचें दगडात कोरलेले शिल्प महाद्वारावर दिसतात.महाद्वारातं महाराष्ट्राचे आराध्य दैवत,मराठा मावळ्यांचें शक्तीस्थान असणारे छत्रपती शिवरायांचा विशाल आश्वारूढ पुतळा प्रत्येक साहसी ट्रेकरला ऊर्जा देत आहे.

                     आत प्रवेश केल्यावर भक्कम तटबंदीच्या आत अनेक वास्तू दिसतात.तटबंदीच्यां जाडजूड भिंतीत सैनिकांसाठी देवळ्या बांधलेल्या दिसतात.त्यात विशेष गुप्त खोल्या देखील दिसतात.उंच तटबंदीवर चढण्यासाठी आतून  नव्या बांधकालाही लाजवतीत अशा दगडाच्या उत्तम पायऱ्या आहेत.शत्रू लांब पल्ल्यावरून दिसण्यासाठी बुरुजातं अनेक जंग्या कोरलेल्या आहेत.अर्नाळा किल्ल्याला साधारणत: दहा बुरुज असतील. त्यातील गणेश बुरुज हा सर्वात मोठा बुरुज आहे. त्यातूनअनेक जंग्या कोरलेल्या आहेत. शत्रूची हालचाल टिपण्यासाठी त्या लहान लहान झरोक्याचं बांधकाम केलं असावं. बुरुजाची थोडीफर पडझड झालेली दिसते.किल्ल्याच्या अखंड तटबंदीवरुन अर्नाळा किल्ल्याला पूर्ण फेरी मारता येते.आम्ही चौकोनी तटबंदीवरून एक पूर्ण फेरी मारून आलो होतो.दगडी तटबंदीची रुंदी साधारण ८ ते १० फुटाची असेल.खरंच कमालीची उत्सुकता होती.अथांग समुद्रात एक बेट आहे अन त्यावर एक किल्ला म्हणजे आश्चर्य आहे. समुद्रात अतिविशाल दगडातील किल्ला कसा बांधला असावा.हा चमत्कार बुद्धीच्या पलीकडे वाटतो. किल्ल्याच्या आत भव्य पंचलिगेंश्वर महादेवाचं मंदिर आहे. एक दर्गा देखील बांधलेला दिसतो.आम्ही महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं.

                  इतिहास काळाची एक एक पानं चाळतांना जाणवतं,अनेक पिढ्या मागे गेल्या असतील!उन वादळ-वारा,पावसाला सामोरे जात समुद्र बेटावरील किल्ला आपलं अस्तित्व ठेवून उभा आहे.बेटावर किल्ल्याबाहेरील जागेत एक गाव वसलेलं आहे. एक आश्चर्य डोळ्यात भरून घेत होतो. स्थानिक नागरिकांचा मासेमारी हा मुख्य व्यवसाय असावा तेथील बांधव अगदी आनंदाने, सुखाने, समाधानाने एकत्र राहात आहेत.असा हा इतिहाससाक्षी किल्ला पाहण्याचं भाग्य लाभलं होतं ते *चला जाऊया गड-किल्ल्यांवर* मोहिमेचे प्रमुख आदरणीय वसंतराव बागूल सरांमुळे. जलदुर्ग पाहून साहस काय असतं याचं भान आलं होतं. छत्रपती शिवरायांचा जय जयकार करीत. अनेक प्रश्नाची उत्तर मिळवीत परतीच्या प्रवासाला लागलो होतो.
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी 
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-३० मे २०२६
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol