चला जाऊया गड-किल्ल्यांवर (वसईचा किल्ला भाग -०२
*चला जाऊया गड-किल्ल्यांवर*
(*वसई किल्ला,* जिल्हा पालघर)
(*भाग-०२*)
🚩🚩🚩🚩🪷🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी
आपल्या मनात कुतूहल,उत्सुकता दाटून आलेली असते.आपल्याला सतत निसर्ग आव्हानं देत असतो. आपणही त्यात कमी म्हणून की काय निसर्गावर मात करीत,आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करायचा प्रयत्न करीत असतो.निसर्गाचा समतोल बिघडवत निसर्गाचा ऱ्हास करीत असतो. निसर्गाचा अगम्य स्वभाव जिज्ञासेपोटी जाणून घेत असतो. निसर्गाच्या कुशीत वेरूळ, अजिंठा, अनंत किल्ले गढ्या प्राचीन निर्मितीच्या खाणाखुणा घेऊन उभ्या आहेत.मतं मतांतंरामुळेचं काहीजन ,'गढी,किल्ले, जलदुर्ग या शापित वास्तू आहेत!'असं मानतात. तर,'किल्ले हें शौर्यस्थळं आहेत!विजय स्थळं आहेत.विरश्रीची गौरव स्थळं आहेत.ऊर्जा, शक्ती, हिम्मत, ताकद, प्रोत्साहन, महत्वाकांक्षा देणारे गौरवी विजयस्थळं आहेत ' अशी दुसरीं मतं देखील आहेत.मत मतांतर असणारंच.शापित यासाठी बोललं जातं की त्या,' वास्तूंमध्ये रक्ताचे पाट वाहिले आहेत.राज्य अस्तित्वाच्या लढाईत कित्येक सैनिकांचां,राजसत्तेतील घराण्यांनां मृत्यू ओढवला होता!' पण हें स्थळं आम्हास राजनिष्ठा, देशप्रेमाची शौर्यगाथा स्फूरण देत असतात.काळ वर्षं गिळत पळत असतो.प्राचीन वास्तू शौर्याचा इतिहास घेऊन उभ्या असतात.प्राचीन भग्न वास्तू सतत मानवी मनाला कुतूहल घेऊन जिज्ञासेपोटी आकर्षून घेत असतात. मनाला अगम्य ओढ निर्माण करीत असतात.आम्ही अशाचं ऐतिहासिक किल्ल्यांवर गेलो होतो.होय,रविवार दिनांक १७ मे २०२६ रोजी आम्ही 'चला जाऊया गड-किल्ल्यांवर' मोहिमेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील *वसई* अन *अर्नाळा* किल्ल्यावर गेलो होतो.... 🚩
*वसईचा किल्ला*
*******************
वसईचा किल्ला पुण्याहून साधारण २१० किलोमीटर लांब अंतरावर असून,मुंबईच्या उत्तरेला गुजरातच्या दिशेने ५० किलोमीटर लांब अंतरावर आहे.पूर्वी ठाणे जिल्ह्यात असलेला किल्ला आता पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्यातील वसई शहरात आहे.किल्ल्याच्या तीनही बाजूनीं समुद्रखाडी अन दलदल असून चौथ्या बाजूसं वसई शहर आहे. किल्ल्याला दोन दरवाजे आहेत.एक खाडीकडे असून दुसरा वसई शहराकडे आहे. खाडीच्या दलदलीत,खारफू्टींच्या घनदाट जंगलात असलेला,एकांती उंच भिंतीच्या तटबंदीनीं वेढलेला हा किल्ला ११० चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेला असून अजब, गजब,गुमनाम भूतभीती दाखवत उभा आहे.🚩
कित्येक शतकं मागे निघून गेली असतील,किल्ल्याच्या भिंतींवर छत नाहीये.काहीं जाडजूड भिंतीतचं काही छुप्या खोल्या देखील बांधलेल्या दिसतात.पाच तें दहा फूट दगड-चुन्यातील जाडजूड,३० ते ३५ फूट उंच भिंती आकाशाकडे तोंड करून, 'ऑ' करून,तोंड वासून उभ्या आहेत.किल्ल्याआत फिरतांना तेथील दृश्य सगळंच गुपित,गुमनाम, अगम्य, अनामिक वाटतं असतं.संध्याकाळी जे पाहायला जात असतील त्यांना तेथील दृश्य भितियुक्त वाटत असेल.किल्ल्याचे बुरुज,तटबंधी अजूनही सूस्थितीत शाबूत आहेत.हा किल्ला भुईकोट आहे,का जलदुर्ग याचा प्रश्नचं आहे. तरीही 'समुद्र किनाऱ्यावरील भुईकोट किल्ला' असं म्हणायला हरकत नसावी.त्याचं बांधकाम पाहून आश्चर्य देखील वाटतं. ते अरबी-पाश्चात्य (पोर्तुगीज) वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. किल्ला आपल्याचं नादात गुमसुम उभा असून त्याच्याचं वृद्धत्वाची ओढ लागल्यासारखा दिवस घटिका मोजीत उभा आहे.वसई किल्ल्याला खंत वाटत असावी की,'भुई मज कुशीत घेईल कधी?'हा किल्ला अंतरी उध्वस्तपण, दुःख भोगत उभा दिसतो.बऱ्याच ठिकाणी..भिंती सापळा लटकावा तशा उभ्या दिसतात.कुठेतरी बुरुजाचा दगडं निखळतांना भिंतीत अडकून पडला आहे असं दृश्य दिसतं.. कित्येक शतकं उन, वारा, पावसाचा मार झेलत उभा आहे. जाडजूड भिंती गल्लीतगात्र होत मुकसाक्षी बनून उत्तरायुष्य ढकलीत उभ्या दिसतात.वैभव काळ भोगलेला वसईचा किल्ला मुळात १२व्या शतकातील भोगाळ राजांनी बांधलेली गढी असावी.कालांतराने गुजरातच्या बहाद्दूर शहा मलिक सुलतानाने गढी जिंकून किल्ल्याच नवं रुपडं देऊ केलं असावं. समुद्रकिनारी दलदलीत उभा असल्याने समुद्रातून दूरवर परदेशात नावेने व्यापारास अनुकूल असलेला हा किल्ला बांधला असावा.काळाच चाक फिरत राहतं.🚩
गोव्यात बस्तान घट्ट रोवून असलेले पोर्तुगीज हातपाय पसरू पाहात होते.मुघलांशी लढण्यासाठी गुजरातच्या मलिक दुकान सुलतानाला पोर्तुगीजांनी मदत केली होती.उपकारीं ऋण म्हणून सुलतानाने वसईचां किल्ला इ.स १५३६ साली पोर्तुगीजांना भेट दिला होता.पोर्तुगीजांना ही महासंधी चालून आली होती.संधीच सोनं करीत पोर्तुगीजांनी किल्ल्याचा संपूर्ण कायापालट केला होता. पश्चात्य अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून नवीन पद्धतीच बांधकाम सुरु केलं होतं. किल्ल्यात बालेकिल्ला,तीन चर्च,बाजार पेठ, भक्कम बुरुज, दोन महाद्वार, तुरुंग, कोर्ट,बांधलं असावं. बालेकिल्ल्या सभोवती साधारण ०३ किलोमीटर लांब तटबंदी असून ११० चौरस किलोमीटरमध्ये किल्ल्याचं क्षेत्रफळ विस्तारल आहे. १६ व्या शतकातील नगर व्यवस्थापन वाखानण्याजोगे आहे.एक युरोपीयन शहर स्वतंत्र अस्तित्व ठेवून किल्ल्यात सुखासीन जगत होतं.पलीकडे इंग्रज होतेचं. त्यांचे अन पोर्तुगीजांचे व्यापारी खटके उडत होते.तरीही टोकाला कोणीही जात नव्हते.🚩
इकडे मराठेशाहीचा भगवा ध्वज फडकत असतांना पेशव्याचं लक्ष वसई किल्ल्याकडे गेलं पोर्तुगीजांना हुसकावून लावण्यासाठी इ.स १७३७ मध्ये चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली किल्ल्यावर प्रचंड आक्रमण केले. आतून पोर्तुगीजांनी तोफांचा मारा सुरु ठेवल्याने किल्ला जिंकता येतं नव्हता.कित्येक महिने मराठ्यांनी किल्ल्याला वेढा दिला होता. तरीही किल्ला हाती येतं नव्हता. शेवटी आपल्या सैन्यासमोर चिमाजी आप्पा गरजले होत,'तोफेतोंडी माझे धड ठेवा नाही तर किल्ला तरी जिंका!' शूर मराठे किल्ल्याच्या तटबंदी खालून खंदक खोदून आत जाऊन पोहचले. पेशव्यांचे अनेक सरदार या मोहिमेत सहभागी झाले होते.तुंबळ युद्ध झालं.रणसंग्रामातं पोर्तुगीजांचा दारुण पराभव झाला होता. २७ महिने निकरानें लढाई देत वसई किल्ला इ. स १७३९ मध्ये मराठ्यांच्या अधीपत्याखाली आला होता.किल्ल्यात डागडुजी करून अनेक परिवर्तन घडवून आणले होते. आत वज्रेश्वरी देवीचं भव्य मंदिर देखील बांधलं होतं.इ.स १७३९ ते १८१८ पर्यंत वसई किल्ला पेशवाईचा अविभाज्य भाग होता.
इंग्रजांनी इ. स १८१८ मध्ये इंग्रजांनी पेशवाईचां पराभव करून किल्ला ताब्यात घेतला होता.काही काळा नंतर इंग्रजांनी हा किल्ला लिटिल हूड नावाच्या व्यक्तीस साखर कारखान्यासाठी दिला होता.पुढे कारखाना तोट्यात गेल्याने भरपाई काढण्यासाठी लिटिल हूडने किल्ल्यांच्या वास्तुचं छत उस्कटून काढले.त्यातील मौल्यवान वस्तू, किल्ल्याचा दगड विकून कर्जातून सुटका करून घेतली होती. किल्ला बोडका झाला होता.वैभव खंडर झालं होतं.उंच भीती भुतासारख्या उभ्या राहून भीती दाखवत किल्ला आपलं अस्तित्व ठेवून उभा होता. गौरवशाली परंपरा लाभलेला वसई किल्ला आपल्या अस्तित्वाची लढाई देत उभा आहे. 🚩
आम्ही किल्ला पाहात होतो.त्यातील वास्तू पाहून भीत होतो. भितियुक्त शांती घेऊन किल्ला उभा आहे.किला डरावना जैसा लगता हैं!एक ऐतिहासिक किला अकेला ही अस्तित्व की लढाई लढ रहा हैं!🚩
(अर्नाळा किल्ल्याविषयीं भाग-०३ मध्ये पाहू)
🚩🚩🚩🚩💐🚩🚩🚩🚩
*****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे -४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक -२२ मे २०२६
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment