कानिफनाथ गड कष्टाचा देव भाग -४४
*कानिफनाथ गड कष्टाचा देव*
(भाग-४४)
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी
नेहमीचंच ठिकाण तें
दिसती डोंगर दऱ्या
चालतांना दम लागतो
अमुच्या अनुभूती खऱ्या!🌹
दगड-धोंडे आडवे उभे
असते ठेचकाळण्याची भीती
पहाट अंधारी ऊर्जेतून
वाढवीत असतें गती!🌹
वेडीवाकडे वळणं येती
चढ अंगावरती घेतो
पहाट गारवा सखा सोबती
आम्हा शिखरावरती नेतो!🌹
शिखर दिसतं स्वर्गासमान
आम्ही शरण त्यांसी जातो
श्रमघामाचं जिंकणं असत
श्रद्धेला डोळे भरुनि पाहतो!🌹
धमनीत श्वास भरुनि
जिंकत जावे डोंगर
साहस अमृत बनूनी
होतं संजीवनी सागर..!🌹
आत्मविश्वासातून साहसाची मशाल पेटवायची असते.मशाल आत्मभान देत असते.उजेड देत असते.मनात जिंकण्याची उर्मी जन्माला घालीत असते.अंधारावर विजय मिळविणारी मशाल नेतृत्व देत असते.कधी लढ म्हणून सांगत असते.मशाल समूहाची प्रतिनिधी असते.तशीच मशाल काळजाची पेटवायची असते. काळजात पेटलेली मशाल अनेक दिव्य पार करण्यास समर्थ असते. माणसाच्या मनात जोवर उद्दिष्ट उतरत नाही तोपर्यंत व्यक्ती दिशाहीन असतें. काही साध्य करायचं असल्यास काळजात मशालीने पेट घेतला पाहिजे.
आमच्या देहाच्या अंतरंगातील काळजात कानिफनाथ ट्रेकिंगची धगधगती मशाल गेल्या वर्षांपासून पेटलेली आहे.दर रविवारी कानिफनाथ गडावर गेल्याशिवाय मन समाधानी होत नसतं. त्याचे फायदे पाहता दर रविवारी पहाटे आमची पावलं कानिफनाथ गडाकडे ओढ घेऊ लागतात.दम-घामाचा ट्रेक सुदृढ आरोग्याची गुरुकिली असते.आम्ही गुरकिल्ली हस्तगत करून भल्या पहाटे निघतो. अंधारावर स्वार होऊन उजेडाकडे चालणं असतं. नेहमीप्रमाणे आम्ही देखील रविवार दिनांक १० मे २०२६ रोजी भल्या पहाटे कानिफनाथ ट्रेकिंगला गेलो होतो.
आम्ही कानिफनाथ गडावर होळकरवाडीमार्गे निघालो होतो. पहाट होती. सभोवती अंधाराचं अधिराज्य होतं.कानिफनाथ गडाच्या पायथ्यापासून सध्या ओबडधोबड दगडंगोटे पांघरलेल्या चढावरून निघालो होतो.अंधारात दगड गोट्यावरून पाय घसरण्याची भीती असते.चालणे व्रत घेतल्यामुळे पावलंही दगडांशी झटत नाहीत. त्यांना टाळून चढाची ओढ पावलांना लागलेली असते.आम्ही देखील वेग वाढवीत वेडीवाकडी वळणं पार करीत कानिफनाथ गडाकडे निघालो होतो.काहीजन मागे होती, काही पुढे चालत होती.अंधारात सुनसान चढावर ट्रेकिंग करणाऱ्यांची साथ होती.डाव्या उजव्या कडेला बोडके जंगलं आहे. डोंगर, छोट्या मोठ्या दऱ्या आहेत.फक्त भीती वाटते ती एखाद्या हिंस्र श्वापदांची. आज पावेतो तरी आढळले नाहीत. पण भक्षाच्या मागावर हें प्राणी मनुष्य वस्तीत घुसखोरी करू लागली आहेत. आम्ही चालत होतो. धमणीची गती वाढली होती.सध्या उन्हाळा असल्याने घाम विना आमंत्रणाचा अंगाशी खेळत होता.
गुडघे परीक्षेला बसल्यागत पळत होते.त्यांचं वंगण अजूनही संपलेले नसल्याने साहसी चढाईशी लढाई सुरु होती.श्वासांची गती वाढलेली होती.जणू लोहाराचा भाता सूर होता. चिवट झुंज जिंकते तेव्हा आनंद गगणात मावत नसतो.आम्ही मुकाबला करीत कानिफनाथ गडाच्या शिखरावर पोहचतं होतो. पूर्वेचा सुंदर तांबूस गोळा पृथ्वीवर पाय ठेवीत वर येत होता.कोवळा असल्याने किती नयन मनोहर दिसतं सांगू? उघड्या डोळ्यांनी पाहात पूर्वेच्या रविदादास नतमस्तक झालो होतो. कानिफनाथ मंदिरात जाऊन श्री कानिफनाथ महाराजांचं दर्शन घेतलं. आवारात बाहेर उंच हत्तीच्या कानातून कानिफनाथ महाराजांचं जन्मशिल्प पाहून नमस्कार केला. हें प्राचीन चमत्कार अचंबित करीत असतात. ऐकून, वाचून नवल वाटत असतं.मंदिर डोंगराच्या उंच शिखरावर असल्याने शिखराभोवती झाडांनी गर्दी केलेली दिसतं होती. त्यात नेमके दोन-तीन गुलमोहराची झाडं नजरेत भरत होती!आश्चर्य म्हणजे त्या गुलमोहराच्या रक्त चंदन, तांबूस लाल फुलं उगवत्या सूर्यदेवाच्या रंगांत रंगल्या होत्या.
कष्टातून मिळणार फळ अवीट गोड असतं. देहाला आपलेसे करतं. देह आतून ताज्या कमळाच्या फुलागत उमलू लागतो. शरीर हलकं फुलकं उल्हसित वाटू लागतं.आम्ही कष्टाने कानिफनाथ गड चढून गेलो होतो. त्याचं समाधान काही ओर होतं. कष्टाचा देव पावला होता.देवदर्शन होऊन खूप समाधानाने परतीच्या प्रवासाला लागलो होतो.हळूहळू मार्गस्थ झालो होतो.शरीर तरंणंबांड वाटत होतं.२१वर्षाच्या तरुणांगत मन उचंबळंत होतं. आम्हास कष्टाचा देव पावला होता. १० मेचां रविवार आठवड्यासाठी शरीर शुद्धी करून गेला होता.
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक -१५ मे २०२६
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment