कानिफनाथ ट्रेक कष्टाचा देव( भाग -४३)
*कानिफनाथ ट्रेक कष्टाचा देव*
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
**************************
... नानाभाऊ माळी
जग कसं असतं बघा ना... कधी आपण माणसांसोबत असतो.कधी माणसं आपल्यासोबत असतात. कधी आपण पुढे निघून जातो!कधी माणसं पुढे निघून जातात!कधी आपण मागे पडतो. कधी कधी चालतांना एकटेच चालावं लागतं. मागे पुढे कुणीही दिसत नसतं. कालपर्यंत ज्यांच्यासोबत चालत होतो ते दिसत नाहीत.तरीही त्यांचं अस्तित्व सोबत असल्याचा भास होत असतो. त्यांचा मानसिक आधार आपल्यासोबत असतो. कोणीही नसतील तर जीवनात एकटेच चालावं लागतं.प्रारंभी मन तयार होत नाही.अनाहुत भीती असते.पण आत्मिक शक्ती जागृत झाल्याने कोणत्याही कठीण, अवघड प्रसंगास तोंड देण्याची तयारी झालेली असते....शेवटी हें जग भूल भुल्लया आहे. माणसांचा गोतावळा आहे. बाजार, एक मेळा आहे.मोह,मायेचा बाजार आहे.प्रलोभनाचां सागर आहे. मत्सर कुटून कुटून भरून माया नगरीतं हेवेदावे आपोआप भेटतात. या प्रवासात प्रसंगानुरूप अनेक पात्रे येऊन भेटतात.भूमिका बजावून पडद्याआड निघून जातात.शेवटी वाट्यास आलेली भूमिका आपण एकटेच निभावत असतो.आपल्या देहात चालणारें श्वासोश्वास, प्राण आपल्यासोबत असतात.तोही निघून गेल्यावर हा उभा देह मातीमोल असतो. त्याचा काय उपयोग?त्यासं उचलण्यास कित्येक हात पुढे आलेले असतात.......🚩
झालं असं की आम्ही ट्रेकर काल एकमेकांना फोन करून आज दिनांक ०३ मे २०२६ रोजी नेहमीप्रमाणे पहाटे पाच वाजता कानिफनाथ ट्रेकिंगला निघालो होतो.ठरलेल्या ठिकाणी ट्रेकर सहकार्यांची वाट पाहात थांबलो होतो.आम्ही कानिफनाथला होळकरवाडी मार्गे जाणार होतो.पण सहकार्यांच्या मार्ग बदलामुळे माझा गोंधळ झाला.ते सर्व सासवड रस्त्याच्या वडकीनालामार्गे निघाले होते.पुन्हा येणारे काहीजन गावाला गेले होते.एकटाच राहिलो होतो. माघारी फिरणे रक्तात नव्हतं.छत्रपती शिवरायांचा मावळा बोलण्याचा अधिकार गमवाला असता. महाराजांवर अतोनात भक्ती असल्याने स्फूर्ती अंगात संचारली होती.मी पहाटे पाच वाजता दुचाकीला किक मारली अन एकटाच होळकरवाडी मार्गे निघालो होतो. होळकरवाडीचं जवळपास १० किलोमीटर अंतर असावं.🚩
पहाट अंधारात सुनसान रस्त्यावर हिरोहोंडा चालवत होतो. रस्त्याच्या मध्येच ड्रेनेज लाईन असल्याने.त्यावरील झाकणाच्या खोलगट भागावर गाडीचं चाक आदळत होतं. गतिरोधकांची गत तर विचारूच नका, एक एक किलोमीटर अंतरावर गतिरोधक आहेत.दुचाकी उंच उडी घेत, आदळत पुढे निघाली होती. संतुलन जाण्याची देखील भीती वाटत नव्हती. भीती वाटत होती मागे लागलेल्या मोकाट कुत्र्यांची.ते गाडीजवळ आले की ड्रायव्हिंगवर लक्ष केंद्रित करून पायांनी कुत्र्यांना लाथा मारल्यागत पाय हवेत उडवत होतो. ते ही भुंकत कंटाळून त्यांची हद्द संपली की माघारी फिरत होती. डांबरी रस्त्याची वेडीवाकडी वळणं पार करीत शेवटी होळकरवाडी पार करून कानिफनाथ पायथ्याशी येऊन पोहचलो होतो.🚩
मी एकटाच होतो.दोन दिवस आधी बुद्धपौर्णिमा असल्याने आज पहाटे पश्चिमेला जाणारा चंद्र माझ्या सोबतीला होता.चंद्र जसा पांढरीशुभ्र ज्वारीच्या भाकरीसारखा गोल होता. का कापूस विणलेला ससा होता? सभोवती निरव शांतता होती.चंद्र सोबतीला होता.मी एकटाच कानिफनाथ गडा चढत होतो.दूरवर अंधारात कोणी दिसत नव्हतं. चंद्रप्रकाशात अंधुकशी डोंगर-दरी दिसतं होते.रस्ताही बऱ्यापैकी दिसत होता.गेल्या पाच महिन्यांपूर्वी उजव्या डोळ्याचं मोतीबिंदू ऑपरेशन झाल्याने डोळ्यास व्हिजीबीलिटी आली होती.मी एकटाच असल्यामुळे, चौफेर सामसूम होतं. चक्क चक्क भीतीची अनाहुत चाहूल मनाला स्पर्शून गेली होती.मग मनाला हृदयाने आदेश दिला होता. डोळ्यासमोर छत्रपती शिवराय दिसू लागल्यावर भीती भागम भाग करून दूर पळून गेली होती.हळूच खिशातून मोबाईल काढला,युट्युब चालू केलं. भक्तीगीतं ऐकत चढाई सुरु केली होती.साधारण ०३ किलोमीटर चालून गेलो असेल तेवढ्यात पाठीमागून *कानिफनाथ ट्रेकिंग अँड हेल्थ क्लबचे* अध्यक्ष *श्री. शाम कुंभार सर अन त्यांचें सहकारी श्री.वसंतराव जगताप सर* पाठीमागून दुचाकीवरून आले होते.त्यांनी आवाज दिला,'नानाभाऊ वाह, चलते रहो!' 🚩
देव कधी कधी किती परीक्षा घेतो बघा ना? भीती दाखवतो. भीती दाखवून आपला दरदरून घाम काढतो.अन अचानक दर्शन देत दुःख हरण करतो.आज असंच झालं.अंधारात मी भितभीत चालत होतो. अन पाठीमागून कानिफनाथ ट्रेकिंग अँड हेल्थ क्लबचे अध्यक्ष साक्षात समोर येत बोलते झाले होते. हा साक्षात्कारचं होता ना!त्यांनी पुढे जाऊन एका ठिकाणी गाडी लावली. आम्ही सर्व सोबतीने चालत निघालो होतो.नेहमीच्या ओळखीच्या खाणाखुणा भेटतं होत्या.पूर्वेला उजेडाची चाहूल लागली होती. उन्हाळ्यात दिवस मोठा असल्याने पूर्वेला सूर्यदेव दर्शन देत होता. आम्ही सकाळप्रहरी हलक्याशा, आल्हाददायक अंगाशी लगट करणाऱ्या हवेचा आनंद घेत कानिफनाथ गडावर कधी पोहचलो ते कळले देखील नाही.प्रत्येकदा कानिफनाथ ट्रेकमध्ये मी अज्ञानी बाळ शिकत असतो. निसर्ग भरभरून देत असतो.आपण विनम्र होऊन ते दान स्वीकारतं राहावं. आनंद देत घेत राहावा.उन्हाळा असूनही सकाळ प्रसन्न होती. कानिफनाथ मंदिरांत जाऊन देव दर्शन घेतलं.श्रद्धा पूजनीय होती. दैवी होती.चंदनासारखी सुहासिक होती.चित्त श्रद्धेसं अर्पण करून श्रद्धेला शरण गेलो होतो.आजचा ट्रेक यशस्वी झाला होता.आनंद अनुभूती देणारा होता.
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०३ मे २०२६
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment