मुलीगत तुम्हीही उडून जाणार
*मुलीगत तुम्हीही उडून जाणार*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*************************
...नानाभाऊ माळी
आपल्या घरात मुलं, नातवंड असतात. त्यांच्या आवाजाने घर भरून जातं. त्यांच्या खोड्या, दंगा, हुस्त्या, मस्त्या,लुटपुट मारामाऱ्यांनी घर सिनेमा थिएटर किंवा शाळा तरी वाटायला लागते. आपण ओरडत असतो. ते दुर्लक्ष करून धुमाकूळ घालीत असतात.असं हें भरलेलं गोकुळ आनंद देत असतं.मुलं कुठे गावाला गेलीत की घर खायला उठतं. कृष्ण कान्हा मोठा झाला तसा कर्तव्य पूर्तीसाठी गोकुळ सोडून गेल्यावर गोकुळातील सर्वचं कृष्णासाठी हंबरडा फोडून रडत होती. नंदराज, यशोदा मय्या, साऱ्या गवळणी, राधा, एवढंच काय कृष्णाचे सर्व सखे सोबती कृष्ण गोकुळ सोडून दूर जाण्याचा विरह सहन करू शकत नव्हती.इतकं प्रेम कृष्ण गोकुळ वासियांवर करीत राहिला.🌹
मुलगी माहेरी जन्म घेते.मोठी होते.लग्न होतं तसं माहेरचीं माया, मिळालेलं प्रेम, मातीत बालपण गेल्याने माहेरची माती सोडतांना मुलीला किती त्रास होतं असेल, दुःख होत असेल बरं? सर्व काही माहेरीचं ठेवून नवरी नव्या घरी जाते.सासरी संसार वेल फुलवत राहते.पण हृदयांतरी खोल बसलेली माहेरची ओढ कधी कमी होत असते का? जन्म देणारे आई-वडील, भाऊ- बहिणी, काका काकू, माहेरची सर्व माणसं माहेरपणाची आठवण देत असतात.हें माहेरपण एकदा सुटलं की मागे फिरणं नसतं.ही स्त्री जीवनाची पारंपरिक आदर्श आचारसंहिता म्हणावी का?मुलगी आयुष्यभर कसोशीने वचन पाळत असते.....🌹
काही दिवसांपासून दोन पाहुणे आमच्या दारी आले आहेत. बाल्कनीत राहायला आले आहेत. आमच्या छोट्याशा बाल्कनीत एक कुंडी ठेवली आहे.त्यात १० वर्षांपूर्वी मनीप्लांटचीं वेल लावली आहे.पहाता पाहता त्या वेलची वाढ एवढी झाली की बाल्कनीच्या डाव्या टोकापासून ते उजव्या टोकापर्यंत तब्ब्ल ३५ फूट लांब अंतर पार करून पलीकडे ती आता हळूहळू जमिनीकडे खाली उतरायला लागली आहे.मनिप्लांटला भरपूर हिरवीगार पानं असतात.वेल तशी नाजूक असते.पण उपाशी तापाशी असली,अर्थात चार-पाच दिवस पाणी नाही मिळालं तरी कुंडीतल्या मातीत मूळ्या रोवून जीवनसार सोशुन घेत हिरवीगार दिसत असते.
बाल्कनीतील ही वेल डाव्या बाजूने आतील छताला जाऊन पोहचली होती.तिच्या वाढत्या पसाऱ्यामुळे बाल्कनीच्या छताला असलेल्या लोखंडी कडयांना सुतळी दोरी बांधून दुसऱ्या टोकापर्यंत नेऊन घट्ट बांधली आहे.वेल हळूहळू सापासारखी सरपटत,सरकत,वाढतं बाल्कनीच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन पोहचली!कालांतराने पानं पिवळी होतात तशी गळून पडतात. माणसाचं देखील अशीच असतात नाही का?कुंडीतील मनिप्लांटच्या दोन-तीन एकत्रित ब्रॅंचेस(वेली) सापासारख्या एकमेकांना वेटोळे करून मार्गक्रमण करीत आहेत. त्यावर हिरवीगार पानं लदलदलेली दिसताहेत.दोरीवर सापसूळी मनिप्लांट पुढे सरकते आहे.
एके दिवशी मी पाहिलं, वेलीच्यां पानातील लदलदलेल्या पुष्पगुच्छात तपकीरी रंगाच्यां चिमणा-चिमणी जोडप्याने घरटं विणायला सुरुवात केली होती. या चिमण्या आपल्या नेहमीच्या चिमण्या नाहीयेत.जरा वेगळ्याचं आहेत.काळपट तपकीरी रंगाच्या या चिमण्या *हेचं ते दोन अनाहुत पाहुणे आपल्या गॅलरीत घरटं बांधून बस्तान ठेवलं आहे.* काही दिवस दोघेही जिद्दीने भुर्रभुर्र उडत होते.कुठूनतरी दूरवरून आपल्या चोचीतून एक एक बारीक नाजूक काटक्या आणून वेलीला गुंढाळतं राहिले.बरोब्बर जाळीसारखं विणकाम करीत राहिले.अथक परिश्रम घेत राहिले.त्यांचीं धावपळ,कष्ट डोळ्यांनी पाहात होतो.त्यांची जिद्द अन सातत्य पाहता पाहता अवघ्या तीन-चार दिवसातचं घरटं तयार झालं होतं.आधी गुपचूप येऊन घरटे बांधणारे हें जोडपं भुर्रभुर्र उडून घरट्यासं गुंफुन आकार देत राहिले.घरट्याची सुबकता,बारीक सारीक कलाकूसर पूर्ण झाली होती.घरटं सुंदर अन सुरेख दिसतं.ते पसरलेल्या पानांमध्ये कुणालाही सहजासहजी दिसत नाहीं.पक्षी देखील उत्तम कलाकार असतात हें आमच्या डोळ्यांनी पाहात होतो, अनुभवतं होतो.काही दिवस असेच निघून गेलेतं.चिमणा एकटाच इकडे तिकडे उडत,येरझाऱ्या घालत होता आनंदाची गोष्ट म्हणजे चिमणीनें घरट्यातं अंडी घातली होती.आता दोघेही पाळी पाळीने घरट्याचीं रखवाली करीत होते.
एके दिवशी एकदम चमत्कार दिसला.माहीत आहे, सांगू!!घरट्यातील अंड्यातून पिवळसर चोचिचे दोन पिलूं बाहेर आली होती.दोघेही दिसायला अतिशय सुंदर. हुभेहूब नेमके चिमणा-चिमणीवरच दिसत आहेत. दोघेही आपाआपल्या चोचित दूरवरून अन्न घेऊन येत आहेत. पिलांनी *ऑ केलेल्या पिवळसर नाजूक चोचित* हळूच अन्न टाकून हें जोडपं आळीपाळीने पुन्हा अन्न शोधण्याच्या मोहिमेवर पळापळ सुरु आहे.त्यातील एकजन घरट्याजवळच थांबतं असतं. धोका,असुरक्षितं जाणवलं, चाहूल लागली की त्यांचा कर्कश चिवचिवाट सुरु होतो.मांजरी पासून वाचविण्यासाठी जीवाच्या आकांताने, तळमळून प्रचंड कर्कश *चच्चचं -चच्चचं* असा जोरजोरात आवाज करून शत्रूला हुसकविण्याचा आटापिटा सुरु असतो.
पाच-सहा दिवसांपूर्वी एक मांजर समोरच्या बाल्कनीच्या भिंतीवर बसून घरट्याकडे एकटक पाहात होतं. दोघेही नाजूक इवले इवले पिलं पाहात होतं.भक्ष्यावर उडी घेण्याच्या तयारीतचं होतं.तिथं पिलांचे मम्मी-पप्पांची नियमित आवाज बदलून *चरच्चचं -चर्रर्रर्रच्च* असा आवाज करू लागली. मांजरीभोवती आवाज करीत उडू लागले.मी ते पाहिल्यावर मांजरीवर जाड वजनी रुमाल फेकून मारला तशी ती धापकन समोरच्या गॅलरीत जाऊन पडली अन पळत सुटली. चिमणा-चिमणी पुन्हा घरट्यात आपल्या उद्योगाला लागले होते.मी आमच्या हॉलमधील खिडकीतून बाल्कनीतं मनिप्लांटकडे बघत असतो.त्यांचा खेळ पाहात असतो.दोन पिलं आहेत,उडू उडू पाहताहेत.आताशी त्यांना घरटं लहान वाटू लागलं आहे. हें जोडपं त्यांना दटावून सांगत असतील *,'अजून नका उडू रें. खाली पडालं!'* आता तर घरट्याबाहेर येऊन वेलीवर बसायला देखील लागली आहेत.
पिलांचे मम्मी-पप्पा खाद्य घेऊन आल्यावर चोच उघडून बसताहेत बेटे!चिमणी-चिमणा दोघेही आजूबाजूला अन्न गोळा करीत उडत असतात.पिलं हलत्या घरट्यात मजेत चिंवचिवाट करताहेत.अजून मोजून काहीं दिवस असं गोड, सुंदर, मनभावन दृष्य पहायला मिळेल. एके दिवशी ते जोडपं आपल्या पिलांसामवेत घरटं सोडून उडून जातील.ओळखीने आमच्या खांद्यावर बसायला येणारें ते जोडपं विणलेलं घरटं एकटेच सोडून निघून जातील, सासरी गेलेल्या मुलीगत!घरटं खाली होऊन जाईल!
🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०२ मे २०२६
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment