अखंड हरीनाम कीर्तन सप्ताहचें हरी अमृत
*अखंड हरीनाम सप्ताहचें हरी अमृत*
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
***************************
... नानाभाऊ माळी
*भजन-कीर्तन* अंतर्मनाला भावणारं अमृत असतं.हळूहळू हृदयांतरी झिरपत,दुःखी कष्टी मनासाठी गुणकारी औषध होऊन बसतं.मनात ओढून,ताणून,दाबून ठेवलेला नकोसा कचरा काढणारा *सगुण-निर्गुण* भक्तीमार्ग माणसाच्या जीवनात सुखव्याप्तीचं दार उघडीत असतं.भजन,कीर्तनातून मनाची शुद्धी होऊ लागते.कष्ट,वेदना, हताश मनाला उभारी देणारा ज्ञानमार्ग आहे.दुःखी मन हलकं होऊ लागतं.चित्तवृत्ती श्रद्धेतं न्हाऊ निघते *विठ्ठल नाम* प्राचीन काळापासून हृदया हृदयात उतरलेलं अढळ श्रद्धाअमृत आहे.*'राम कृष्ण हरीचा जप* आदर्श मार्ग दाखवत असतो.श्रीविठ्ठलाच्या चरणी चित्त अर्पित होऊ लागतं.स्वतःस श्रीविठ्ठलाचा दास संबोधणारा परम भक्त भक्तीतून शरण जात शुद्धाचारी होऊ लागतो.सर्व संतांनी श्रीविठ्ठल नामाचा जयघोष करीत,जागर करीत समाज जागृती केलेली आहे. समाजमनाला डोळस करीत दिशा दाखवली आहे.भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून आदर्श चारित्र्य घडविण्याचा महासंकल्प संत महतांनी घेतला.तेचं महान कार्य भक्ती मार्गांवरील संतांनी सुरु ठेवला आहे.
संत-महात्मे मुळातच मानवी मनाला संयम शिकवीत असतात.मनाचा तोल संयमीत करण्याचं बळ देत असतात.मानवी मनाला सतवृत्तीचा ध्यास लावीत असतात.नकारात्मक भूमेकेतून सकारात्मकतेकडे वाटचालीस *हरी इंधन* पुरवीत असतात.हरीनाम भजतांना वैकुंठीचा राणा श्रीविठ्ठल डोळ्यासमोर दिसू लागतों.मना मनातील किल्मीश निघून जाऊ लागतो.ब्रम्हानंदी टाळी लागणे सुरु होतं.मनातला दडलेला अशुद्ध कचरा बाहेर पडू लागतो. *पंढरपूरचें हरीमुख* दिसू लागतं. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकोबारायांनी कर्मातून शास्वत सिद्धीमार्ग सांगितला आहे. *कर्मसिद्धीतून भक्तीचा गोडवा* मनामनात रिचवत अमृतसार होऊन जातो 💐..........
माणसाला काही प्रसंग निमित्त घेऊन सोबतीला येतात. ज्याच्यामुळे मन भक्तीसागराकडे ओढ घेऊ लागतं.आमचही असंच झालं.निमित्त होत *नातूच्या जावळाचं*. ते निमित्त सुवर्ण संधी होऊन आम्हास आमंत्रण देऊन गेलं. *अखंड हरीनाम सप्ताहला* जाण्याचा दुर्लभ अमृतयोग जुळून आला होता!! ०१ व ०२ एप्रिल २०२६ चें दोघेही दिवस आमच्या दृष्टीने सौभाग्यशाली होते.हरी भक्तीत डुंबण्याचें दिवस होते.भक्तीआविष्काराचा स्पर्श हृदयी होऊन गेला होता.धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील छोटंसं *म्हसाळे* गावं आहे.हायवे रस्त्यावरचं लामकांनी पासून अवघ्या सात किलोमीटरवर अंतरावर आहे. म्हसाळे गाव जवळपास ५००० लोकसंख्येच असून पूर्वी गावात मातीच्या धाब्याची घर होती.बदल घडत असतो.गावं विकास प्रक्रियेतून जात असतात.आता सिमेंट काँक्रिटची घर बांधली जाऊ लागली आहेत.पूर्वी शेणाने घर सारवायचे. आता शेणही मिळत नाही!आता घरात चमचमणाऱ्या गुळगुळीत टाईल्स दिसू लागल्या आहेत.घरं आखीव, रेखीव,डेकोरेटिव्ह व्हायला लागली आहेत.वेगवेगळ्या डिझाईनच्या टाईल्स घरात आल्या आहेत.चांगल्यासोबत दोषही संगतीला येतात.पाय घसरून पडण्याची भीतीही असते.विकास गंगेतल्या प्रवाहात बदलणारं माझ मामाचं गाव उंच लिंबाच्या झाडांनीं वेढलेल्या सुंदर गाव आहे. बालपणापासून हृदयात वसलेलं आहे.या टूमदार गावी जन्मापासून कित्येक वेळा जात येत राहिलो आहे.
तर.....०१ एप्रिल रोजी सूर्य मावळतीला निघाला होता.आम्ही उभयता पती-पत्नी धुळ्याहून दुचाकीने ५२ किलोमीटर लांब,अंतरावर असलेल्या *म्हसाळ्याला* पोहचलो होतो. माझा जन्म मामांच्या गावी म्हसाळ्यालाचं झाला असल्याने ती माती सतत पाय ओढीत बोलवत असते. सत्कर्मी, सदाचारी, सद्गुणी माणसाचं गाव सदविचार पेहरीत आहे.चांगुलपणा शिकवीत असतं.अखंड हरीनाम सप्ताह त्याचंच द्योतक आहे.पवित्र भूमीतील भक्तजनांनी,तरुण मंडळाने,गावकीने २६ मार्च २०२६ रोजी श्रीराम जन्मोत्सव आयोजित होत असतांना *रामनवमी* पासून तें ०२ एप्रिल २०२६ *हनुमान जयंती* पर्यंत सालाबादप्रमाणे *अखंड हरीनाम सप्ताह* आयोजित केला होता. हरीचा एकमुखी जागर सुरु होता. हरी नामाचा ध्यास उरात घेऊन फिरणारे भाविक भक्तजन जवळपासच्या खेड्यातून आली होती.
अखंड हरीनाम कीर्तन सप्ताहात श्रीविठ्ठल नामाचं घुसळण होत राहिलं.हरी नामाचा भक्तीरस पाझंरत राहिला.मनामनात तो भक्तीरस रास पाझरत घन होत उत्तुंग शिखर गाठत राहिला.श्रीविठ्ठल नामाचं वैकुंठ,आयोजित सप्ताहात सर्वत्र अवतरलं होतं.श्रीहरी विठ्ठलाचा जागर करण्यासाठी दूर दूरवरून संत,महंत आले होते.हरी कीर्तनकार आले होते.त्यांच्या कमलमुखातून वाहत्या हरीनामामृत कीर्तनाचां कर्णमधुर गोडवा कान, मन, अंतःकरण तृप्त करीत राहिला. वारकरी संप्रदायात भाविक, संत, भक्तांचे आराध्य *श्रीहरी विठ्ठल* आहे.हे दैवत भाविक भक्तांच्या हृदयी अवतरलं होतं.अखंड हरीनाम सप्ताहातील सर्वचं वंदनीय कीर्तनकारानीं प्रबोधनपर आपल्या ओजस्वी वाणीतून ज्ञानमेजवानीचा महाप्रसाद,आस्वाद रूपात देत राहिले.आम्ही घेत राहिलो. भक्तसागरात तृप्त होत राहिलो. श्रीविठ्ठल भक्तांतरी पोहचविण्याचा प्रयोजन यशस्वी होत राहिलं.आम्ही मंडपात बसून ज्ञानगोडवा प्राशन करीत राहिलो.चित्त हरीठायी पहुडले होते.मन मंत्रमुग्ध होत गेलं.🚩
०१ एप्रिलच्या रात्री ह.भ.प. जिवराम महाराज कापडणेकर यांच्या प्रबोधनपर कीर्तनातं एकचित्त होऊन गेलो होतो, जणू हरी विठ्ठलातं एकरूप होऊन गेलो होतो.*अखंड हरीनाम कीर्तन सप्ताहच्या* समारोपाचं कीर्तन ०२ एप्रिलला अर्थात *काल्याचं कीर्तन* होतं. पूर्वेला तांबूस गोळा वरती येतं होता. सकाळ अति प्रसन्न होती.आम्ही खूप लवकर,सकाळीच सांभामंडपात येऊन बसलो होतो.*काल्याच्या कीर्तनासाठी* उत्साह ताजा होता. ह.भ.प आनंदराव महाराज बोरकुंडकर यांचं काल्याच कीर्तन होतं.श्रीराम नवमीपासून सुरु झालेला अखंड हरीनाम कीर्तन सप्ताह,*हनुमान जयंतीच्या* दिवशी समाप्तीकडे निघाला होता. म्हसाळे येथील तरुण मित्र मंडळाच्या उत्तम आयोजनामुळे सप्ताह अमृतात न्हाऊन निघाला होता. काल्याच्या कीर्तननाने भक्तीशिखर गाठले जाणार होतं. उगवत्या सूर्यसाक्षी, सकाळच्या प्रहरी स्वाभाविकपणे भक्तजनांच्या मुखातून *राम कृष्ण हरीचं* उच्चारण सुरु झालं होतं.
*हरीनाम* कणाकणात आहे. त्याचं मनचक्षुतून दर्शन होत असतं. श्रीराम शब्दाचीं अलौकिक महाकिर्ती विश्वपूजनीय आहे. ज्या ज्या व्यक्तींने आपल्या आयुष्यात *श्रीराम पाठ गिरवला* तो रामदास होऊन गेला.राम प्रत्येकाच्या हृदयात निवासाला आहेतं. श्रीराम सदबुद्धी देत असतात.श्रीराम नितीमूल्य शिकवीत असतात.ब्रम्हपहाट श्रीराम शब्दातून उजाडू लागते.घरादारातून रामकृष्ण हरीच्या नामाने प्रारंभ होतो.आम्ही ह.भ.प आनंदराव महाराजांच्या काल्याच्या कीर्तनात दंग झालो होतो.कृष्ण लिलाच्या अवखळ खोडी कीर्तनातं चित्त हरण करीत राहिले.सदाचार, सद्गुणी, सत्यवचन,आदर्श विचारांचं वाढलेलं अमृतपान हृदयी उतरत राहिले. आम्ही श्रद्धाळू कृष्ण पावलांची धूळ कपाळी लावण्यासाठी आतुर झालो होतो.🚩
काल्याच्या कीर्तनानंतर कीर्तनमंडपी टांगलेली दहीहंडी ह.भ.प आनंदराव महाराजांच्या करकमलांनीं फोडण्यात आली.
सर्व भक्तजनांना प्रसाद वाटण्यात आला होता.हा प्राचीन काळाचा प्रवास आहे.तों त्याग, निष्ठा,प्रेम, समर्पण, एकवचन असे संपन्न गुण अंगी उतरवण्याचां मनात निश्चित केलां.काल्याचा प्रसादरूपी श्रीहरीविठ्ठल भजनात दंग होण्यास साह्य करीत राहिला.श्रीरामनवमी नवमीपासून ते श्रीहनुमान जन्मसोहळ्यापर्यंतचा साप्ताहिक कालखंड भक्तीअमृताचा विशाल अनुभव घेऊन भक्तीत तल्लीन तल्लीन झालो होतो.विठ्ठलाचां भक्तीसार भरकटलेल्या चित्तास शांत करीत राहिले.संसारीक, प्रापंचिक ओझे भक्ती अनुभूतीने हलके वाटू लागले होते.सुख शोधता शोधता दुःख शिखराशी समोरे जात सुख दुःखाच्या वाटेवरील भक्ती शिदोरी सहज सोपी होऊन गेली होती. काल्याचां भंडारारुपी महाप्रसाद ह.भ.प श्री देविदास काशिनाथ देशमुखांच्या पाचही बहिणींनी आयोजित केला होता.श्रद्धापूर्वक महाप्रसादाचं सेवन करून दुपारी म्हसाळ्याहून पुण्याला यायला निघालो होतो.
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२४ एप्रिल २०२६
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment