कानिफनाथ ट्रेक कष्टाचा देव (भाग -४२)

*कानिफनाथ ट्रेक कष्टाचा देव*
                (भाग-४२)
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
***************************
... नानाभाऊ माळी

एप्रिलच्या तिसऱ्या साप्ताहात प्रवेश करतांना सकाळी सूर्योदयापासूनच अग्निदेव आपलं खरं रूप दाखवू लागला आहे.कडक उन्हाळ्यात अंगाला चटका बसतो आहे!सूर्य धरतीला भाजून काढतो आहे. उन्हाळ्याच्या सोनेरी तप्त उन्हात भाजलेल्या धरणीतून मन मोहित करणारा केशरी रक्तचंदन *गुलमोहर* निसर्गाच्या कुशीत उन्हाचं पांघरून घेत मन मोकळेपणाने फुलतो आहे, झूलतो आहे.निसर्गाविष्कार नयनमनोहरी असतो.तप्त उन्हात सुखावह वाटतो. सूर्यदेव आग ओकीत असतांना गुलमोहर कोरड्या सुष्क जमिनीत बुंध्याखाली मूळ्या गाडून जमिनीतील अन्न ओढून घेत उभा असतो.आनंद देत प्रत्येकाच्या नजरेत जाऊन बसतो.आम्ही रविवार दिनांक १९एप्रिल २०२६ रोजी, अक्षयतृतीयेच्या पहाटे कानिफनाथ गडावर ट्रेकिंगला गेलो.पहाटे पावणे पाच वाजता आपापल्या वाहनांनी गेलो होतो. पहाट असूनही पहाटेचा गारवा जाणवत नव्हता.दिवसभर आग ओकणाऱ्या सूर्यदेवामुळे,पहाट गारवा हिरावून नेला आहे.दिवसभर सूर्यदेवाची तप्त उष्ण किरणे बिचाऱ्या धरतीमातेला शोषून घेत होती.ती ही वाफाळल्यागत होऊन जात आहे.सूर्य मावळल्यानंतर कुशीत दाबून ठेवलेली उष्ण हवा हळूहळू बाहेर पडू लागते.त्यामुळे पहाट असूनही आल्हाददायक वाटत नाहीयें  

              आम्ही कानिफनाथांच्या पायथ्याशी सव्वा पाचला पोहचून अंधार पांघरून टॉर्चच्या उजेडात निघालो होतो.सध्या होळकरवाडी मार्गे वाहनं जात येतं असल्यामुळे डोंगरावरुन निखळलेले छोटे मोठे दगड-धोंडे चढरस्त्यावरचं आपलं अस्तित्व ठेऊन अडून पहुडलेले दिसत होते.अंधारात त्या दगड गोट्यावंरून पाय घसरण्याची भीती वाटत होती.आम्ही दगड गोट्यानां सामोरे जात अंधारातूनचं आमचा ट्रेक सुरु होता.वेडीवाकडी वळणं भरपूर असल्यामुळे अंगावर येणाऱ्या चढाची का भीती बाळगावी बरं?पण आम्ही ट्रेकर जो आहोत!!अंधारातून चालतांना हवा अजिबात साथ देत नव्हती.कदाचित हवा नाराज असावी.उन्हाळ्यात ट्रेक खरं म्हणजे पहाटेचाच उत्तम असतो.चढाला सामोरे जातांना तप्त सूर्यदेवाची भीती नसते.आम्ही एक एक वेडीवाकडी वळणं पार करीत शेवटी उंच शिखरावरील भू सपाटीवर येऊन पोहचलो होतो. 

                वेगाने चालणं सुरु होत. दम घामाला विश्रांती मिळाली होती. उजेडही स्वागतास सामोरी आला होता.समपातळीवर त्या उजेडात जंगलातील इतर सर्व झाडांमध्ये लपलेले पण ठळकपणे नजरेत भरेल अशी गुलमोहराची झाडं दिसली होती.लाल केशरी सुंदर,रेखीव फुलं डोळ्यास दिसत होती.झाडं जणू सामोरे येऊन आम्हा थकलेल्यांनां प्रोत्साहन देण्यासाठी स्वागतास उभे होते.चढाकडे जातांना ती गुलमोहराची झाडं कानिफनाथ गडावर चढण्यासाठी प्रोत्साहन देत होती. झाडांवर तुरळक हिरवीगार पानं दिसत होती.त्यावर नव्वद टक्के केशरी-लाल फुलं लदलदलेली दिसत होती.हसऱ्या केशरी गुलमोहरच्या फुलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आम्ही प्रोत्साहित होऊन सूर्योदयापूर्वीचं नव्या दमाने कानिफनाथ महाराजांच्या उंच शिखरावरील मंदिरात जाऊन पोहचलो होतो.डोंगरावरील भुईसफाटीवरं उंच मंदिराच्या शांत गाभाऱ्यात श्रीकानिफनाथ महाराजांची समाधीसमोर भक्तीभाव अंतःकरणपूर्वक श्रद्धेनें समाधी दर्शन घेतलं होतं.गाभाऱ्यातून बाहेर येतं उंच डोंगरावर सभोंवती पाहिले असता डोंगरपोटाशी उंच उंच लाल-केशरी रक्तचंदन रंगाची गुलमोहराची झाडं दिसली.

                  पूर्वेला सूर्य उगवत होता.उगवतानांच डोळे वटारून पाहात होता.सकाळीच तप्त सूर्यकिरणं टोचू लागली होती.आम्ही सूर्यसाक्षी गुलमोहराचीं हसरी लालीमां पाहात होतो.गुलमोहर सूर्यदेवाला हसवत होता जणू.गुलमोहराच्या देखण्या रूपाची मोहिनी लोभस होती.सृष्टीवर परिवर्तन घडत असतं.सुष्कतेत सौंदर्य लपलेलं असतं.उन्हाळ्यात चिंच, आंबा अशीच स्वादिष्ट चव देण्यासाठी आपल्या समोर उभी दिसतात.ऋतू बदलतो.पांनगळीत निसर्गसौंदर्य उतू जात असतं. 

आम्ही सर्व ट्रेकर समाधानी अंतःकरणाने परतीच्या प्रवासाला लागलो होतो.कानिफनाथ गड उतरत असतांनाचं सकाळीच उन तापू लागलं होतं.दूरवर पुन्हा नवे गुलमोहराचं झाडं दिसलं.त्याला पाहात होतो. विपरीत परिस्थितीवर मात करता येते असा मार्गदर्शक गुरु आमच्या समोर उभा होता.उतारावर चालतांना थकवा पसार झाला होता. आम्ही कानिफनाथ गड सर करून आनंद उरात बसवून निघालो होतो.
    🚩🚩🚩🙏💐🚩🚩🚩
*****************************
... नानाभाऊ माळी 
हडपसर, पुणे -४११०२८
मो.नं-९९२३०७६५०० 
दिनांक -२१ एप्रिल २०२६
nanabhaumali.blogspot.com

Comments