जावळ.. जन्माचा पहिला संस्कार विधी
*जावळ..जन्माचा पहिलाच संस्कार विधी*
🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
*************************
... नानाभाऊ माळी
एप्रिल महिन्याचा चटका अन उकाडा जाणवू लागला आहे. कुठे ४०ते कुठे ४२डिग्री तापमानाची नोंद होत आहे.०१ एप्रिल २०२६चां शुभ दिवस उगवला होता.इंग्रजी महिन्यातील ०१ एप्रिल,लोकांना चेष्टेत एप्रिल फूल करण्याचा दिवस होता.चेष्टा करून अचानक मूर्ख बनविण्याचा दिवस होता.बुधवारी ०१ एप्रिलला चैत्रशुद्ध चावदस होती अन दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला हनुमान जयंती होती. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याच्या बहाळ गावापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर पिंपळवाड गावी म्हाळसा देवीचं मोठं मंदिर आहे.श्री.म्हाळसादेवी भक्तांना पावणारें जागृत देवस्थान आहे अशी श्रद्धा आहे.उत्तर महाराष्ट्र, खान्देशांतील अनेक घराण्यांची कुलदैवत असणारी श्रीम्हाळसा देवीचं मंदिर गिरणा नदीच्या काठावर आहे. संपूर्ण गिरणाकाठ बागायती क्षेत्र असल्याने हिरवाईने नटलेलं,सुजलाम सुफलाम अन हिरवीगार शेती क्षेत्र नजरेस पडतं.आम्ही श्रीम्हाळसादेवीच्या दर्शनाला गेलो होतो. व्याहीचें (आमच्या मुलीचे सासर) कुलदैवत असल्यामुळे नातूच्या पवित्र धार्मिक संस्कार *जावळ विधीनिमित्त* श्रीम्हाळसाई मातेच्या दर्शनाला गेलो होतो.मंदिरात,सभोवती जावळ काढणाऱ्या अनंत कुटुंबाची गर्दी होती.म्हाळसादेवी मंदिरात श्रद्धाळुं भक्तांची गर्दी झाली होती.तेथे यात्रेचं विशाल स्वरूप आलं होतं.हे कुलदैवत असलेली कित्येक कुटुंब आपल्या कुटुंबासहीत त्यांच्या बाळाचं जावळ संस्कार विधीसाठी आले होते.💐
नातूचं(मुलीच्या बाळाचं) जावळ होतं.शंभू-चिनू बाळाचा जावळ विधी होता.मंदिराच्या गर्भगृहात प्रचंड गर्दी होती.भल्या मोठ्या स्टीलताटात गव्हाच्या पिठाच्या कणकेचे साधारण १४ दिवे तेवत होते.ताटात १४ दिवे,एक भंडारा,वेणी,फणी, टिकली, बांगडी, विटी, दांडू, पोळपाट, लाटणे, बांगड्या, जोडवे, गोट्या,चेंडू, फळी असे गव्हाच्या कंनकेचेच बनवलेल्या लहान लहान वस्तूरूप म्हणून ठेवल्या होत्या. प्राचीन धार्मिक श्रद्धेनुसार कुलदेवतेला प्रिय असलेल्या या वस्तू श्रद्धनें ताटात ठेवल्या होत्या.कुलदेवतेची आरती कुटुंबातील उपस्थित सर्व सदस्यानी मनोभावे गायली होती.बाळाच्यां आत्या-मामा, आजोबा-आजी, आई -वडील उपस्थित होते.मंदिराबाहेर एप्रिलचं कडक उन्ह जाणवत होतं.आरती झाल्यावर मंदिर सभामंडपात सव्वा वर्षाचं गोंडस बाळ चिन्मयला-शंभूला त्याच्या आत्याच्या मांडीवर बसवलं होतं. न्हावी दादाने विधीवत केसं कापायला सुरुवात केली होती. काढलेली केसं आत्याच्या साडीवरील पदरात गोळा केली जात होती.छोटा शंभु बाळबोधपणे खुदखुद्द हसत होता.रडणं तिळमात्र नव्हतं.त्याचं गोड हसणं कुटुंबातील उपस्थितांना वेगळाचं आनंद देऊन गेला होता. डोक्यावरील केसं पूर्ण काढल्यावर, गिरणा नदीतील स्वच्छ वाहत्या पाण्यातं शंभूचीं अंघोळ करण्यात आली होती.कुटुंबाने श्रीम्हाळसा देवीला पुरणपोळीचा नैवद्य दाखवून कुलदेवतेचे कृपाशीर्वाद घेतलें होते. मंदिरातल्या सभा मंडपात सर्वांनी मिळून घरून स्वयंपाक करून आणलेल्या पुरणपोळी, पंचपक्वानाचा भोजनास्वाद घेतला होता.💐
उन्हाळ्यात देखील धरणातून सोडलेलं, नदीच्या एका कोपऱ्यातील धारेतून वहाणार झूळझूळ पाणी गिरणा नदीचं विस्तीर्ण पात्र डोळ्यांना मोहवीत होतं.वाहतं पाणी, सभोंवतालाचा हिरवागार परिसर, नदीतीरी वसलेलं श्रीम्हाळसादेवीचं मंदिर जणू कुळउद्धाराची प्रचिती देत होतं,अनुभूती प्रदान करीत होतं. आम्ही भावभक्तीने श्रद्धेद्वारी हृदय अर्पण केलं होतं.कुलदेवतेच्या पवित्र गाभाऱ्यात जावळचा विधी पार पडला होता.अनंतकरणपूर्वक, श्रद्धेनें,आत्मिक ओढीने,आनंदाने संपन्न झाला होता.बाळ जन्माचा पहिलाचं संस्कार विधी पार पडला होता.एका वेगळ्याचं अनुभूतीतून जातांना मनात उत्सुकता होती, *बाळाचं जावळ का काढत असावेत?* हिंदू धर्मात जावळचं काय महत्व असावं? तेचं उत्सुकतेपोटी जाणून घ्यायचीं ओढ लागली होती,अंतरी उत्सुकता लागली होती...
माणसाचा जन्म परमभाग्याने प्राप्त होतो,असं धर्मग्रंथ सांगतात. जन्मापासून श्वासांचा अखंड प्रवास सुरु होतो.शेवटी वैकुंठात देह ठेवण्यापर्यंत धडधडता प्रवास सुरूचं राहतो. धमणीत श्वास आहेत तोवर देह पळत असतो....जन्मसोहळ्याचं वर्णन कसं,किती करावं बरं?घरात आनंदानें शिखर गाठलेलं असतं.आई आपल्या पोटात नऊ महिन्याचं बाळओझं मोठ्या कष्टाने सहन करीत राहते!आई वेदना,कळा सहन करीत प्रसवते.बाळाला जन्म देते.बाळ जन्मल्याबरोबर ते रडतं असतं.घरा-दारातले आनंदून गेलेले असतात.बाळ जन्माचा आनंद उत्सव सुरु होतो.पेढे-गोडधोड वाटून आनंद व्यक्त केला जात असतो.बाळ दिवस,महिनें,वर्षाने आपलं वेगळं अस्तित्व दाखवत असतं.बाळ घराचं नंदनवन करून टाकतं.घराचा केंद्रबिंदू होऊन जातं.त्याच्या बाल लिला घरातील सर्वांना भावतात, आवडतात.घरातल्या या चालत्या बोलत्या खेळण्यासंगे सर्व खेळू लागतात.ते घरभर हुंदडु लागतं.आई, वडील,आत्या,काका,आजी-आजोबा,मामा-मामी जे जे जवळचे असतील ते सर्वचं गोंडस बालकाचं लाड-कौतुक करण्यात दंग होतात. हळूहळू वर्ष संपतं.बाळाच्या डोक्यावरील केसं वाढू लागतात. लांबसडक होतात.मातृ पोटातील नैसर्गिक केस अतिशय विरळ, कोवळी,नाजूक असतात.हळूहळू डोक्यावर केसांच्या मुळाशी काळपट पातळ खपली येते.केसं जन्मत:च नैसर्गिक वाढतात.वर्षभरात ती खपली वाळून काळपट दिसू लागते.बारीक पापूद्र्यासारखी दिसू लागते.💐
प्रत्येक धर्मात वेगवेगळे संस्कार विधी असतात.बाळ जन्माचा संस्कार विधी पार पडत असतो.हिंदू धर्मातही बाळ जन्मल्यावर पवित्र संस्कार विधी करीत असतात.बाळ एक-दिड वर्षाचं झाल्यावर धार्मिक विधीनुसार पहिल्यादांचं डोक्यावरील केसं काढली जातात.या संस्कार विधीला *जावळ काढणे* असं म्हणतात, मुंडन करणे असं म्हणतात.मुंडन विधी वैदिक पवित्र मंत्रोच्चाराच्या साक्षीने पार पाडले जातात.बाळाच्या या पहिल्याच विधीला अतिशय महत्व असतं.हा हा संस्कार विधी अतिशय पवित्र मानला जातो. हा विधी आपल्या श्रद्धास्थळी,देव देवतांच्या मंदिरात,कुलदैवतांच्या द्वारी किंवा घरी देखील करतात. बाळाचं जावळ काढलं जातं.यात बऱ्याच श्रद्धा आहेत.पारंपरिक चालीरिती असाव्यात.महाराष्ट्रात बऱ्याच गावांमध्ये बाळाला त्याच्या मामाच्या मांडीवर बसवून,मामाच्याचं हातून कात्रीने (कैचीने)केसांची एक बट कापली जाते.त्यानंतर न्हावी दादा वस्ताऱ्याने बाळाच्या डोक्यावरील संपूर्ण केसं काढून चमनगोटा करीत असतात. काही गावांमध्ये आत्याच्या मांडीवर बसवून बाळाची केसं काढली जातात.मामा अन आत्यांना मिळणारा हा मान प्राचीन रूढी परंपरा,चालीरीतीचा अत्यंत महत्वपूर्ण भाग असावा. बाळाचे केस काढणाऱ्या न्हावी दादांचां सन्मान करून बिदागी दिली जात असते.ही केसं कुलदैवताच्या चरणी अर्पण करतात.💐
एकंदरीत प्राचीन काळापासून मुलाचं जावळ काढलं जातं असावं.आईच्या पोटातून बाळाच्या डोक्यावर वाढलेली केसं अपवित्र मानली जातात. एक ते सव्वा वर्षाचं झाल्यानंतर विधीवत ती केसं काढली जातात.कुटुंबात जन्मलेलं पहिल्याचं मुलाचे जाऊळ काढलं जातं असावं. मुलींचे केसं वाढत असल्यामुळे कदाचित मुलीचे केसं काढली जात नसावीत.पण तिरुपती बालाजीला गेल्यावर सर्वचं लहान थोर, मुलं-मुलींच्या डोक्यावरची केसं काढण्याची परंपरा आहे.तेथे केसं काढावीचं असंही बंधन नाही.धार्मिक संस्कार, परंपरेनुसार कुठेतरी तरी संदर्भ मिळत असावा!असा जावळ संस्कार केल्यावर बाळाच्या डोक्यावरील ओझं कमी होत असावं. डोकं नाजूक असल्याने, टाळू येत असल्याने जरा जपूनच न्हावी दादा केसं काढीत असतो.आम्ही सर्वचं बाळ शंभूच्या जावळ विधीला उपस्थिती लावून हृदयातून आशीर्वाद देत प्रसन्न मनाने कुलदेवतेचे कृपाशीर्वाद घेत निघालो होतो.
💐💐💐🙏💐💐💐💐
***************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१६ एप्रिल २०२६
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment