कानिफनाथ गड कष्टाचा देव (भाग -४१)

*कानिफनाथ गड कष्टाचा देव*
                   (भाग-४१)
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी

           पाणी,वायू,तेज,आप,पृथ्वी मिळून माणसाचं जीवन सुखकर बनवीत असतात.हे अत्यावश्यक घटक नसते तर?आपलं अस्तित्व राहिलं असतं का?आपला जन्मही झाला नसता. पृथ्वीवर जन्मल्यानंतर आपल्याला पोषक तत्व मिळतात.आपल्या अंगावर कपडे मिळतात. सुरक्षित घर असतं. खायला अन्न मिळतं.हे शक्य होतंय ते केवळ उपलब्ध अनुकूल वातावरणीय संपदेमुळेच.मनुष्याच्या प्राथमिक गरजा अन्न, वस्र अन निवारा असतात.त्या पूर्ण करण्यासाठी जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य आकाश,पाताळ एक करीत असतो.आरोग्यसंपन्न जीवनासाठी धडपडत असतो.ओढवलेल्या प्राकृतिक विपदेवर मात करण्याचा प्रयत्न करीत असतो.संकटं कधी नैसर्गिक असतात तर कधी मानव निर्मित देखील असतात. विकासात्मक नागरीकरणाच्या रेट्यात मनुष्य धरतीला वेशीवर टांगतो आहे.ओरबाडून ओरबाडून लचके तोडतो आहे. गावाचं शहर होतंय.शहराच महानगर होतंय.पर्यावरणाचा तोल ढासळतो आहे.झाडं तोडून,शेती संपवून घर, बिल्डिंग बांधकाम होताहेत. पर्यावरण पूरक मातीची, लाकडाची घरं जाऊन काँक्रेटचं प्रचंड जंगल गावोंगावी वाढतंय.नद्या बुजवून गटारी होताहेत.नद्यातील वर्षभर वाहतं पाणी गेली कित्येक वर्ष वाळू चोरीमुळे खडकाखाली गेलं आहे.बोडके पर्वत कुठला प्राणवायू पुरवणार आहेत आपल्याला?

        आम्ही कानिफनाथ ट्रेकिंग अँड हेल्थ क्लबचें सदस्य नेहमीप्रमाणे आज रविवार दिनांक १२ एप्रिल रोजी पहाटे ०५ वाजता कानिफनाथ गडावर ट्रेकिंगला निघालो होतो. पहाट असूनही हवेत गारवा नव्हता. शहर शांत,वातावरण सुन्न होतं. एप्रिल महिन्याची पहाट एवढी सुष्क कशी?असा प्रश्न मनात होता.झाडं तोडून काँक्रेट रस्ता बनवणारे आपणच आहोत.आपणच आपलं भवितव्य घडवत आहोत. कृत्रिम सुखाच्या पाठीमागून दुःखाचा भस्मासूर जन्म घेत आहे.नैसर्गिक जंगलं तोडून आपलंच आपलं अमंगल करण्यात दंग आहोत.आम्ही दुचाकीवरून कानिफनाथ गडाकडे निघालो होतो.हवेत गारवा नव्हता.२० मिनीटांनी कानिफनाथ पायथ्याशी पोहचलो होतो.उत्साह मात्र जाणवत नव्हता.🚩

                  पायथ्याशी अनेक दगडगोटे आमच्या स्वागतास तयार होते.पायात बूटं असूनही दगड गोट्यावर पाय पडून घसरण्याची शक्यता होती.पहाट अंधारात चढाई सुरु होती. आजूबाजूला बोडक्या डोंगर रांगा स्वागतास उभ्या होत्या. कोरडेपण जाणवत होतं.आपल्या शरीरात नव्वद टक्के पाणी असतं. त्यातील पाणी घाम रूपात बाहेर येऊ लागलं होतं.चढाईतून स्वतःस जिंकण्याची जिद्द निर्माण होते. जिद्दीला घाम लपेटून ओघळत होता.एप्रिलचीं ही घामेजली सकाळ नको वाटत होती. विपरीत परिस्थितीवर मात करायची असेल तेव्हा अंतंरात्म्याचा आवाज महत्वपूर्ण असतो.नाका तोंडातलें श्वास अतिवेगाने येरझाऱ्या घालीत होते.वेडीवाकडी चढ वाट उंच उंच जात होती.पूर्वेला उजेड जन्म घेत होता.छोटया मोठ्या बोडक्या झाडांची पानं हालत-डुलत नव्हती. तप साधनेला बसलेल्या योगी सारखे अचल होते.हवा शांत झोपली होती जणू.आमची पावलं उद्दिष्टाकडे पळत होती.घाम थकव्याला घेऊन प्रवासाला निघाला होता.एप्रिल महिन्याचा उन्हाळा सूर्योदयापूर्वीच संकेत देत होता.अचलतेची सांकेतिक ओळख करून देत होता. आम्ही देखील जिद्दीला पेटलो होतो. कानिफनाथ गडावर असलेल्या श्रद्धेला शरण जाण्यासाठी घामाला न जुमानता चालत होतो.उद्दिष्ट हृदयात अन डोळ्यासमोर असल्यास श्रद्धा फळाला येते.आम्ही श्री. कानिफनाथ महाराजांच्या मंदिरात प्रवेश करीत होतो. गड जिंकल्याचा आनंद तो वेगळाचं होता.थकून जिंकण्याची उर्मी वेगळीचं होती. आम्ही मावळ्यांनी गड जिंकला होता.दूरवर नजर फिरवली असता सोनेरी किरणानीं मंदिराच्या कळसाला दर्शन दिलं होतं.कष्टाचा देव भेटला होता.आम्ही आत्मिक समाधानाने श्री कानिफनाथ दर्शन घेऊन पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो.उगवता सूर्य उगवल्यापासून तेजस्वी किरणांनी धरतीला तापवायला सुरवात केली होती. कोवळे ऊन देखील राकट नकोसे वाटत होते.आम्ही गडाच्या उताराच्या दिशेने वेगाने निघालो होतो.का बरं सूर्य देवाशी वैर घ्यावं आपण.म्हणून उताराकडे झपझप पावलं पडत होती.बोडक्या डोंगर रांगा नजरेत भरत होत्या.
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी 
हडपसर,पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१२ एप्रिल २०२६
nanabhaumali.blogspot.com

Comments