कानिफनाथ ट्रेकिंग कष्टाचा देव (भाग -४०)

*कानिफनाथ ट्रेक कष्टाचा देव*💐💐💐🚩🙏🚩💐💐💐
                   (भाग-४०)
****************************
... नानाभाऊ माळी

विश्व पसारा अद्भुत असुनी 
बुद्धी असते आपुली गहाण 
शोधाशोध शोधूनी पाहता
आमुची श्रद्धा होते महान!🌹

जवळीकतेचा बांधूनी सेतू 
काळजाला खोदीत बसतो 
 भावनांचा असुनी पसारा
 माणुसकीला शोधीत असतो!🌹

त्या मातीतून सोने काढीत
परीस स्पर्शाचे होते देणे
शोधित बसतो माणुसकीला
गातो माणुसकीचें गाणे!🌹

दूर दूरचे एक होऊनि......
पक्क्या पाडुनी टाकती भिंती 
 भग्न भिंतीत ती वीट अवीट
पुंडलिक विठ्ठल नाम म्हणती!🌹

                निसर्गाचा खेळ अद्भुत असतो.सतत चालू असतो.दररोज खेळ बदलत असतो.सतत परिवर्तन होत असतं. रात्र होते. दिवस उगवतो.अंधारुनी मग उजेड होतो,प्रकाश येतो.प्रहर बदलत असतात. पहाट,कोवळी सकाळ, दुपार, तिसरा प्रहर, संध्याकाळ, झुंजूमुंजू मावळतीचां क्षण होतो.रात्र चादरीत लपते.क्षण, तास भराभर पळतात.पुन्हा सप्त घोड्यांच्या रथावर बसून लाल पिवळ्या तांबूस प्रकाशातून सूर्य गगण सफरीला निघतो. किती किती अद्भुत प्रवास आहे नाही का हा!.....

        उन्हाचा कडाका वाढतो.नकोसं होतं.अचानक पक्षांचा थवा गोळा व्हावा तसें मेघ दाटूनी येतात. वादळ, वारा सुटतो.मेघ गर्जू लागतात.पाहता पाहता टपोरे थेंब ढगातून गळू लागतात.घोड्यांच्या टापांसारखे टप टप धरणीवर आदळू लागतात. थेंबाचा लोट होतो.चौफेर पाणीच पाणी वाहू लागतं.लोंढे होतात. लोंढा अविचारी होऊन वाट मिळेल तिकडे सुटतो.बेफान होतं. त्यानेच द्यावं, त्यानेच हिसकावून घ्यावं. माणूस हतबल होऊन निसर्गाचा लहरीपणाला गपगुमान सहन करीत बघत बसतो. जमिनीत पेहरलं, उगवलं हातात येण्याआधी निसर्ग ओरबाडून घेऊन घेतं.हे सगळं अद्भुत असतं. ऊन, वारा, पाऊस,... हिवाळा उन्हाळा, पावसाळा हा निसर्गाने रचलेला खेळ सातत्याने सुरु असतो.आपण त्या अद्भुत किमयेचे घटक आहोत. एक जीव आहोत. जन्म झाला म्हणून आपली वळवळ सुरु होते.जन्मभर ही वळवळ सुरु राहते.ज्या मातीतून जन्मलो वेळ आल्यावर त्यांचं मातीत विलीन होण्याची सिद्धता होते. किती अद्भुत आहे नाही का हा निसर्गाचां खेळ!...

              आम्ही कालचं रविवार दिनांक ०५ एप्रिल २०२६ रोजी पुण्याजवळ असलेल्या पुरंदर तालुक्यातील उंच पर्वतावरील कानिफनाथ गडावर गेलो होतो. नेहमीच जात असतो. आम्ही निसर्गाच्या खेळातील बाहुले असून,स्वतंत्र प्यादे होऊन, सोंगट्या होऊन खेळात तल्लीन होत असतो. त्या खेळास आपण जीवन म्हणतो. तर...तीन चार दिवसांपूर्वी उन्हाचा कडाका सहन न झालेल्या धरतीवर मेघ दाटून आले होते..वादळ वारा सुटला होता.चटका बसणाऱ्या धरतीवर टपोऱ्या थेंबानी!तर काही ठिकाणी गारांनी वर्षाव केला होता.उभी पिकं आडवी झाली.लहरी पावसाला काहीही देणे घेणे नव्हतं. अवकाळी फटका शेतीला बसला. शेतकऱ्यांना बसला.पावसाने भूमी चिंब भिजली होती.काल आम्ही रविवारी पहाटे ०५ वाजता कानिफनाथ गडावर ट्रेकिंगला निघालो होतो.ही उन्हाळ्यातील पहाट जाणवली नव्हती. हिवाळ्यातील थंडगार गारवा अंगाशी मस्ती करीत होता.हा कसला परिणाम होता मग?🚩

               तीन-चार दिवसांपूर्वीच्या अवकाळीत जमिनीनें पाणी धरून ठेवलं होतं.वातावरण गार होतं.पहाट गारवा अंगाशी मस्ती करीत होता. आम्ही पहाट अंधारातून साहसी सफर करीत होतो.चढाई गुडघ्यांना चालायला सांगत होती. आम्ही 'कानिफनाथ ट्रेक अँड हेल्थ क्लबचे' सदस्य हवेतल्या गारव्यामुळे उत्साहाने एक एक पावलं पुढे टाकीत गड चढत होतो. होळकरवाडीमार्गे पहाट गारव्याच्या सोबतीने आमची पावलं भरभर पडत होती.वेड्यावाकड्या वळणावर, टॉर्चच्या अंधुक उजेडातून चढाई सुरु होती.मागे मान वळवून पाहिले असता दूरवर जणू दिवाळी प्रकाशातं पुणे शहर उजळून गेलं असावं इतकं सुंदर दृष्य डोळ्यांना दिसत होतं.

        आम्ही पहाट अंधारातून चालत पुढे उंच शिखरावर दिसणाऱ्या लुकलुकणाऱ्या दिव्यांकडे पाहात मार्गक्रमण करीत होतो.कानिफनाथ गडावरील दिवा आम्हाला बोलवीत होता.अंतर कमी कमी होतं चाललं होतं.उन्हाळ्यात दिवस मोठा असल्याने पूर्व दिशा उजळू लागली होती.चालतांना पूर्व दिशेतील गर्भातून उजेड वाढत होता. प्रकाश पर्वाचा प्रारंभ होणार होता. रविकिरणांनी अंधार पळवून लावण्याचां कार्यारंभ केला होता.त्या उजेडात उंच डोंगरावरील सभोवताली असलेलं सुंदर मनमोहक दृष्य मोहवीत होतं.चालण्याला गती मिळाली होती.कानिफनाथ गडावरील देव दर्शनाची अभिलाषा होती.उभट चढ असूनही सकाळच्या प्रसन्न गारव्यात थकवा आला नव्हता.आम्ही आजूबाजूला पाहात होतो.परवा झालेल्या पावसाने सकाळ ओलसर वाटत होती. हवी हवीशी वाटत होती.प्रसन्न वाटत होती. मंदिराच्या पायऱ्या चढून गेल्यावर सूर्य देवाची सोनेरी किरणं मंदिर कळसावर पडतांना दिसली. आम्ही उत्साहाने श्री.कानिफनाथ मंदिरात जाऊन भावभक्तीने दर्शन घेतलं.थोडाफार आलेला थकवा कुठला कुठे पळून गेला होता.

          देव श्रमाचा, कष्टातून भेटतो याचा साक्षात्कार घेत आनंदाने परतीच्या प्रवासाला लागलो होतो. कालचा सूर्य उगवला होता.वेगळी अनुभूती देऊन गेला.प्रत्येक दिवस समृद्ध अनुभवांचा भंडार घेऊन उभा असतो.निसर्गाचा विलोभणीय, अविस्मरणीय अविष्कार आम्ही अनुभवत होतो. निसर्गाच्या कुशीत आम्ही आनंदून गेलो होतो.
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी 
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०६ एप्रिल २०२६
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol