कानिफनाथ गड कष्टाचा देव (भाग -३९)

*कानिफनाथ गड कष्टाचा देव*
             (भाग-३९)
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी

रोज सूर्य उगवत असतो
तो कालपेक्षा वेगळा होता 
उघडूनि पडदा अंधाराचा 
 तप्त फुफ्फुसाचा भाता होता!🚩

आकाशावर चढतांना सूर्य
चटके घाम काढीत होता
दिवस आजचा कठीण आहे
कालचा थोडा मवाळ होता..!🚩

आपलं असून दूर भासतं
कधी कधी वाटत असतं
माझं असूनही परकं होतं
चंचल मन आपलं नसतं..!🚩

काळ हाती असतांना माझ्या
तेल ओतीत बसलो आहे
 अंधाराऱ्या दिवे लावणीला
मीचं त्यांत फसलो आहे....!🚩

काळ सरळ निघुनी जातो
हाती काही लागत नसतं
क्षणभंगूर तें आयुष्य अधुरे
कोण आपुले वाली असतं?🚩

काळासोबत क्षण उगवतो
क्षण भंगूर हे आयुष्य असतं
असेल चांगुलपण सोबतीला
खुशाल उधळून द्यायचं असतं!🚩

        आपलं जगणं खरंच क्षणभंगूर असतं.आपण आपल्या जगण्यावर शिक्का मारू शकत नाही.येणं आपल्या हाती नसताना आपण या जगात आलो.ज्याने आयुष्य दिलं, त्याचे कोटी कोटी उपकार मानून आपलं जगणं सुंदर करायचं असतं.चढ उतरांचां प्रवास आपुला मार्ग काढीत चालायचं असतं. चालतांना ज्यांचे ऋण असतात थोडे देऊन उतराई व्हायचं असतं.देत घेत मनं जुळतात.माणसं पारखी व्हायचं असतं.चांगल्यांचे पाय धरुनी स्वतःस स्वतः जिंकायचं असतं.आयुष्य जरी कठीण असलं आनंदाने पार करायचं असतं.खाच खळगे येतात जातात संयमाने चालायचं असतं.कधी कधी वाटत असतं, आपुले असूनही परके होतं.उगाच डोळे अश्रू गाळतात, स्वतःस स्वतः आधार बनत असतात. असवांचे ढग येतात जातात. त्यातून उभे राहायचं असतं.दुःखाने कोलमडून ध्येय कधी सोडायचं नसतं.🚩

ट्रेक म्हणजे जीवन लढाई,चढाईनें जिंकित पुढे जायचं असतं.भित्र्या मनाला स्फूर्ती देऊन अंगी घाम दम काढायंचा असतो.कोण आपुले, कोण परके अनुभव शिकवीत असतो.अनुभवांचा डोंगर उंच पार त्यासं करायचं असतं.चढ-उतार येतात जातात शिकवण देऊन जात असतात.....🚩

आम्ही *कानिफनाथ ट्रेकिंग अँड हेल्थ क्लबचे* सर्व सदस्य एक कुटुंबातील सदस्य वाटतात.मित्र, मैत्रीतून ओळख आपुली ठळक होत चालली आहे.आरोग्याची कास धरीत आम्ही सर्वजण कानिफनाथ गडावर दर रविवार जात असतो.शरीर अन मनाला वळण लावीत आनंद निसर्गातून घेत असतो. कोण कुठला? भेट महत्वाची!!रक्ताचे नाते नसूनही रक्तासारखे वागत असतो. हाचं आनंद वाटीत वाटीत मैत्री जीवाची करीत असतो.काल रविवार दिनांक २२मार्चचीं पहाट गुलाबी थंडी घेऊन हिंडत होती.आम्ही देखील तिच्या कुशीत बसण्या धावा धाव करीत होतो. शांत, एकांत अंधाऱ्या पहाटे आम्ही कानिफनाथ गडाकडे निघालो होतो.दुचाकी पळत होत्या.गारवा अंगी झोबंत होता. ताज्या मनाला उत्साह वेगळा आम्ही अंधार सारण्या पळत होतो.🚩

उंच उंच शिखरावर दूर टिम टिम तारे चमकत होते.पहात त्यासी,पहाट हाती आम्ही पायथ्यापाशी पोहचलो होतो.एक एक पावलं पुढे पडत होती.अंधारातून चालणं होतं. पायाखालचीं दगड गोटे टाळत आम्ही कानिफनाथ गड चढत होतो.हृदयात एकचं ध्यास होता, ज्या ध्येयासाठी आलो आहोत तें घाम गाळून गड चढून जाणे.त्यासाठी आम्ही वेडीवाकडी वाट जिद्दीने चढत होतो.स्वतःस कष्ट देत पुढे चालत होतो.

अंधारतून पुढे चालणे, प्रसन्नतेचा आनंद घेणे यातून पुढे चालत राहणे हेचं ध्येय मनी आमुचें. पायात शक्ती होती.गुढघे यंत्रवत हलत होते. परिस्थितीशी झुंजत आम्ही ध्येयाकडे चालत होतो.कष्टाचा आनंद वेगळा, घामाचें फळ गोड.चमत्कार घडला होता आम्ही मावळे ट्रेकर कानिफनाथ गड चढलो होतो. समोर कानिफनाथ महाराजांची समाधी डोळ्यातून अंतःकरणी जाऊन बसली होती.घाम गाळूनही मन प्रसन्न होतं.घामातून देव दिसला होता. आम्ही कानिफनाथ गड सर केला होता.
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
***************************
... नानाभाऊ माळी 
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२३मार्च २०२६
nanabhaumali.blogspot..com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol