कानिफनाथ ट्रेक कष्टाचा देव ( भाग -३७)

*कानिफनाथ ट्रेक कष्टाचा देव*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
              (भाग-३७)
महिला दिनी नारी शक्तीचा जागर
*************************
... नानाभाऊ माळी

         आज जागतिक महिला दिवस आहे!आज कानिफनाथ महाराज यात्रा देखील आहे.अहिल्यादेवी होळकर नगर जिल्ह्यातील *मढी* अन पुणे जिल्ह्यातील *बोपदेव* येथील *श्रीकानिफनाथ महाराजांची भव्य यात्रा महोत्सव* आहे!आज रंगपंचमी देखील आहे!आज रविवार देखील आहे.जागतिक महिला दिनी आज कानिफनाथ ट्रेकिंगला नारी शक्तीचा जागर करता आला. होय महिला देखील कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत हे सिद्ध झालेलं आहे.काल एका ठिकाणी साखरपुड्याला गेलो होतो. येता येता रात्रीचे ११वाजले होते. आज पहाटे जाग येईल की नाही याची शास्वती नव्हती!पण शास्र आहे, नियम म्हणा पाहिजे तर ज्या दिवशी आपल्याला कुठे फिरस्तीला, भटकंतीला किंवा कामामुळे जायचं असेल त्या अधल्या रात्री झोप येतंच नाही. आमचही तेचं झालं.घरातील महिला वर्ग पहिल्यांदाच कानिफनाथ ट्रेकिंगला येणार असल्यामुळे त्यांना झोप आली नाही.त्यांना ट्रेकिंग पेक्षा कानिफनाथ यात्रेची ओढ होती.

         पहाटे ठरविलेल्या वेळात जाग आली अन उठलो देखील. सोबत बच्चे कंपनीही उठली अन आमच्या मागे येण्याचा आग्रह करू लागली होती. लहान लहान मुलं एवढा उंच कानिफनाथ गड चढतील की नाही शंका होती.सर्वजण पहाटे अंघोळी उरकून निघालो.पहाटेचीं ०५ वाजले होते.रस्त्यांवरील इलेक्ट्रिक दिव्यांचा मंद प्रकाश आमच्या स्वागतासाठी मार्गदर्शक झाला होता.दिवसा कडक ऊन पडतंय. पहाट मात्र आल्हाददायक असते.हा ऋतु बदलाचा परिणाम असावा.बच्चे कंपनीसोबत गार हवा अंगावर घेत निघालो होतो.🚩

         शहराची हद्द संपताना तुरळक घर दिसत होती.त्यामुळे गरव्यानें अंगी झटण्यास सुरवात केली होती. बच्चे कंपनी या नवीन अनुभवाने गारव्यात आम्हाला बिलगून बसली होती. आम्ही आमच्या गाड्या पळवत होतो. रस्त्यावर असलेले खाच-खळगे, स्पीड ब्रेकर स्वागतास तयार होते.गाड्या टून्नदिशी उडत होत्या.गाड्यांवरील सीटं तोल सांभाळून बसलेली होती.एक्सलेटर फिरवून वेग वाढविल्यावर गाड्या नरडं काढून ओरडत पळत होत्या. पुढे जातांना अंधार लागला होता. गाड्यांच्या हेडलाईटचां फोकस डोळे ताणून प्रकाशझोत टाकीत गाड्या पळत होत्या.🚩

            शेवटी आमचं चढाईचं मुख्य ठिकाण आलं होतं.जिथून ट्रेकिंगला सुरुवात करायची होती तो कानिफनाथ पायथा आला होता.होळकरवाडीमार्गे गेलो होतो.आज महिला दिवसाचं औचित्य साधून घरातील महिला अन बाल चमुने ट्रेकिंगची सुरुवात केली होती.चढाईचं अंतर किती आहे ते त्यांना माहीत नव्हतं.त्यांची जणू परीक्षाचं होती.गड -किल्ले चढणे आरोग्यास हितकारक असतं.आम्ही मोठया उत्साहाने चालायला सुरुवात केली होती.आमचे नेहमीचे सहकारी त्यांच्या गतीने पुढे निघून गेले होते.चौफेर अंधार असल्याने नवीन आलेल्या ट्रेकर्रसना रस्त्यावरील खाणाखुणा माहीत नव्हत्या. अंधार जरी होता तरी हवेत छानसा गारवा होता.गारवा खेळवत खेळवत चालणाऱ्याला प्रोत्साहन देत होता.लहान बच्चे कंपनी उत्साहाने पुढे पळत होती.त्यांच्या मागे महिला दिनाचां आनंद अंगी बाळगत महिला वर्ग एक एक पावलं टाकीत निघाली होती. त्यांना प्रोत्साहन देत आम्ही त्यांच्या पाठीमागे चालत होतो.

            चढ परीक्षा घेणारा होता. कानिफनाथ गड परीक्षा घेत होता. आज महिला दिन आहे. त्यांत श्री कानिफनाथ महाराजांचा यात्रा उत्सव असल्यामुळे ट्रेकर्स देखील जास्त होते. रंगपंचमी असल्याने रंगांची उधळण कानिफनाथ गडावर होणार होती.किती मोठा योगायोग होता!!घामाला साथ देणारा उत्साह अंगात होता. महिला वर्गाची जिद्द वाखाणण्याजोगी होती.त्यांची सहनशक्ती सर्वांना मार्गदर्शक असावी.स्त्री शक्तीचा जागर आत्मविश्वास वाढविणारा होता.चढ अंगावर येत असतांना सहनशक्ती, सहनशीलता अंगी बाळगून चालणारी नारी गौरवास पात्र होती.ज्या चढावर कधीही जाणं येणं नाही अशा ठिकाणी चढत जाणे नारी शक्तीला सॅल्यूट होता.सॅल्यूट त्यांच्या आत्मसन्माला होता.कानिफनाथ गडावर हळूहळू चढत होतो. कानिफनाथ यात्रेमुळे उंच पर्वतावर असलेल्या मंदिरावरील इलेक्ट्रिकल दिव्यांचा झगमगाटं डोळ्यांना आकर्षित करीत होते.पहाट अंधारातील उंच शिखरावरील दिवे दर्शनासाठी बोलवीत होते.🚩

     डोळ्यासमोर उद्दिष्ट असेल. मनाची तयारी असेल.जिंकण्याची ईच्छा अंतरंगातून असेल तर यश १०० टक्के असतं.आज यशस्वी होण्यासाठी पाय, गुढघे अन श्वासानां आपल्या नियंत्रणात ठेवून महिला दिनी नारी शक्तीनें सिद्ध केलं आहे. महान नारी श्री कानिफनाथ मंदिराजवळ पोहचली होती.अथक ६० मिनिटे,अंगावर येणारा चढ चढत भक्तीचां आनंदघन डोळ्यांना दिसत होता.साक्षात श्री कानिफनाथ महाराज यात्रेतील भाविकांच्या गर्दीत कृपाशीर्वाद देतांना मनचक्षुना दिसलें होते.सूर्यदेव उगविण्याची वेळ झालेली होती.पूर्व दिशा हळूहळू उजळू लागली होती.आम्ही सर्व नवे, जुने ट्रेकर्स हृदयात वसलेल्या भक्तीसागराच्या सभामंडपात एकचित्त झालो होतो.चालण्याचा थकवा होता.त्याहून अंतरीचा देव भेटल्याचा आनंद वेगळाचं होता. ती अनुभूती दिव्य दृष्टी देत होती. भक्ती आनंद सोहळा वाटीत निघालो होतो. त्यांत महिलांचं अभिनंदन करीत होतो. ते कधीही न आलेल्या मंदिरात घाम गाळून आले होते. आज महिलादिनी श्री कानिफनाथ महाराजांचा भक्ती सोहळा अनुभवत होतो.बच्चे कंपनी देखील या सोहळ्याचे सदस्य होते. आम्ही श्री कानिफनाथ महाराजांचे दर्शन घेतलं. अन कष्टा शिवाय देव नाही हा नवीन परिपाठ मनी बाळगून परतीच्या प्रवासाला निघालो होतो.
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
*****************************
...नानाभाऊ माळी 
हडपसर, पुणे -४११०२८
मो. नं- ९९२३०७६५००
दिनांक-०८ मार्च २०२६
  (जागतिक महिला दिन )
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol