कानिफनाथ ट्रेक कष्टाचा देव (भाग-३६)

*कानिफनाथ ट्रेक कष्टाचा देव* 
  🚩🚩🚩🙏🚩🚩🚩
           ( भाग-३६ )
**************************
... नानाभाऊ माळी 

       मला आठवतंय,१९९५ साली मे महिन्याचां सूर्यदेव चटका देत पूर्वेपासून पश्चिमेकडे प्रवास करीत निघाला होता.सकाळी ८-९ वाजेपासूचं रणरंणतां चटका बसायला लागायचा.माणूस जिद्दीने घराबाहेर पडायचा.पोट भरण्यासाठी बाहेर पडायचा.चटका देणारं उन पाठलाग करायचं.दोघेही जिद्दी, आपल्याचं हक्कासाठी वाटचाल करायचेत. आम्ही देखील मे महिन्याच्या भर उन्हातं आमच्या एका मित्राच्या जुन्यापुराण्या कारने पुण्याहून नारायणपूरला निघालो होतो. कोंढवामार्गे बोपदेव घाटनें निघालो होतो.तेव्हा मित्राची कार एसी वैगरे नव्हती.कोंढवा पार करून अंगावर येणारा उभट बोपदेव घाट लागला होता.तेव्हा घाटमार्ग देखील अतिशय अरुंद होता.रस्ता रुंदीकरण झाला नव्हता. आमची कार पहिल्या गियरवर पळत होती.घाटाच्या उंच चढाईवर कार गळा काढून मंद गतीने पळत होती.धूर सोडत होती.🚩

           चालकाने अचानक गियर टाकला तशी कार भर्रदिशी पळत सुटली.पुढे मित्राने अचानक ब्रेक दाबून गाडी थांबवली होती. पाहतो तर कार घाटाच्या उंच कडेला थांबली होती.कोंढवासाईडला अचानक खाली खोल दरी दिसली.अंगाला घामचं फुटला होता. स्वर्गाच दार उघडं होतं पण देवाला आम्हाला घ्यायला वेळ दिला नव्हता. ड्राइवर सोडून आम्ही कारच्या खाली उतरलो.भर उन्हात कार ढकलीत हळूहळू मुख्य रस्त्यावर आलो. घाम,चटका देणारं उन परीक्षा घेत होतं.एकदाचा कारमध्ये बसलो अन नारायणपूरच्या दिशेने कार पळू लागली होती.आम्ही घाबरलो होतो. उन्हात घामेजलो होतो.डाव्या बाजूला उंच डोंगरावर एक छोटंसं मंदिर दिसलं. नारायणपूरला जातांना रस्त्यावरचं होतं.आम्ही तेथे गेलो. प्रवेशद्वार साधारण एक फूट बाय एक फूट चौकोनी आकारातलं होतं. त्यातून सरपटत आत गेलो.नवीनचं होतो. त्या छोट्याशा चौकोनी प्रवेशद्वारातून बाहेर येणारं की नाही याची भीती वाटतं होती.जीव गुदमरल्या सारखं झालं होतं. आम्ही दर्शन घेतलं.अन व्यस्थित बाहेरही आलो.पायऱ्या उतरून खाली आलो होतो.तें मंदिर होतं *कानिफनाथांचं* पुढे नारायणपूरला जाऊन एकमुखी दत्तात्रयांचं दर्शन घेत संत श्रीनारायण महाराजांचं दर्शनआशीर्वाद घेतलें होते.🚩

                      सन १९९५ पासून आजपर्यंत श्री कानिफनाथांनी माझं हृदय ओढून घेतलं आहे.कदाचित तेव्हा वाचलो म्हणून हृदयातंरी भक्तीची ओढ लागली असावी. तरीही मागील कित्येक वर्ष गेलो नव्हतो.पण गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून दर रविवारी आमची पावलं न सांगता कानिफनाथ डोंगराकडे ओढ घेऊ लागतात.देव आरोग्यमंत्र देत असतात.फिटनेस टिप्स देत असतात.स्वच्छ प्राणवायू पुरवत असतात.आमचा घाम दम अर्पण करून नवीन जोश अन निर्भयी मनाची ताकद देत असतात.

      नेहमीप्रमाणे रविवार दिनांक ०१ मार्च २०२६ रोजी पहाटे निवडक संवंगड्यांसोबत कानिफनाथ ट्रेकिंगला निघालो होतो.पहाट शांत होती. निवडक वाहनं शांतीचा भंग करीत ये जा करीत होती.दिवसा उन आभाळ छत्रीत उभं राहू देत नाहीये. पहाट मात्र आल्हाददायक आहे. पहाट गारवा अंगाला झोबंत असतो. उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. दोन मार्चच्या पवित्र सण होळीने दुष्ट प्रवृत्ती जाळली जाणार आहे. सद्विचारांचीं सत्संगती घडणार आहे.

              आम्ही पहाटे ५ वाजता होळकरवाडी मार्गे निघालो होतो. श्रीकानिफनाथ महाराजांच्या डोंगर पायथ्याला आमच्या गाड्या लावल्या अन आल्हाददायक अंधाऱ्या वातावरणात चालायला सुरुवात केली होती. मन प्रसन्न,तन ताजेतवाने होते.देवाला निघतांना भल्या पहाटे अंघोळ केल्यावरचं जाणं असतं.हृदयात श्रीकानिफनाथ वसले होते. नऊ नाथ वसले होते. आमच्या चालण्यालचां वेग वाढला होता.मनी छत्रपती शिवराय होते. धर्मरक्षक शंभूराजे चढाच्या आव्हानास स्फूर्ती देत होते. अंगात रक्ताचा थेंब नं थेंब चढाईसाठी उसळत होता. एकमेकांना साथ देत अंधाऱ्या पहाटे डोंगरचढाई सुरु होती.मनात थोडी वन्य प्राण्यांची देखील भीती होतीचं.संकटावर मात करण्याची शक्ती छत्रपती शिवरायांकडून घेतली होती.🚩

               वळणं वळणं पार करीत साक्षात श्री कानिफनाथांच्या मंदिराजवळ येऊन पोहचलो होतो.६ वाजले होते.आरतीला प्रारंभ होणार होता. पूर्वेचा देव अजूनही पांघरून घेऊन झोपला होता. तांबडं फुटलेलं नव्हतं. आम्ही एकेक संगमरवरी चढून श्रीकानीफनाथ मंदिराच्या विशाल दरबार गृहात प्रवेश केला अन आरतीला सुरुवात झाली.आम्ही भक्तिमय वातावरणात आरतीसाठी तल्लीन झालो होतो.देव दरबारी आम्ही भक्त देव महती गात होतो.

              पहाटे चालून आल्याचा थकवा वाटत नव्हता.अंगी उत्साह होता. आम्ही देवास हृदय अर्पून जिंकलें होतें. पूर्वेचा सूर्यदेव रथावर बसून सृष्टीपालनास निघाला होता. सह्याद्रीच्या उंच डोंगरावर भगवा फडकतांना दिसला.मंदिर कळसावर वाऱ्यासंगे फडकत होता. प्रत्येक श्रद्धाळुस कृपाशीर्वाद देत होता. छत्रपती शिवारायांच्या हिंदवी भगव्याची आठवण करून देत होता. श्रद्धामनं जिंकत भक्तांना भक्तीची जाणीव करून देत होता.आम्ही दर्शन घेऊन, स्वतःस जिंकून घरी परतीच्या प्रवासाला निघालो होतो. आरोग्य किल्ली सोबत घेऊन निघालो होतो. 🚩
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी 
हडपसर, पुणे -४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०४ मार्च २०२६
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol