सासवडच्या अध्यात्म कुशीत

*सासवडच्या अध्यात्म कुशीत*
     🚩🚩🚩🌹🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी

           आज होळी आहे!होळी निमित्त अनेक हार्दिक शुभेच्छा!
... वाईट तें अग्निदेवतेच्या स्वाधीन करून चांगलं जे आहे तें स्वीकारून वाटचाल करूयात!काल रात्रीपासून पुणे जिल्ह्यातील संत शिरोमणी सोपानदेव महाराजांच्या कऱ्हा नदी किनारी असलेल्या सासवडला आलो आहे!.... 💐

          असं म्हणतात,'ज्या देशाचा भूगोल अन इतिहास गौरवशाली असतो तो देश पृथ्वीतलावर तिन्ही काळ जीवंत असतो.पृथ्वी अस्तित्वापर्यंत जीवंत असतो.' तोचं कित्ता त्या देशातील शहरं,गावं देखील गिरवत असतात. उज्वलतेचीं वैभवशाली परंपरा गावं, खेडी टिकवून ठेवतात.*सासवड* देखील प्राचीन इतिहास-भूगोल परंपरेतील आहे.धार्मिक,ऐतिहासिक दिव्यत्वाचा स्पर्श लाभलेलं  सासवड शहर आहे!

         का कुणास ठाऊक?पहाट ब्रम्हमुहूर्त समयी गावं झोपलेली असतातं. सभोवती अंधार असतो. पहाटे एक एक घर जागूं लागतं. अंगणी सडा पडू लागतो. पूर्वी शेणाचा सडा असायचा, आता पाण्याचा सडा पडत असतो. अंगणं अंघोळ करू लागतात.माणसं अंघोळ करू लागतात.स्वच्छ, पवित्र झालेला देह अन मन प्रसन्न होऊन जातं.हाती फुलं घेऊन,पावलं आपोआप देवळाकडे ओढ घेऊ लागतात.पळू लागतात. तो स्वछंदी प्रहर हृदयात साठवून ठेवावासा वाटत असतो.मन मंदिराकडे पळू लागतं.देवळातील देवाला झोप कशी येईल बरं?देव भक्तांचा कैवारी असतो.दिवस-रात्र जागून भक्तांना आशीर्वाद देत जागत असतो.भक्त भावभक्तीने देवभक्तीत तल्लीन होऊन जातो.स्वतःस विसरतो.पहाट एकांततेचीं,शांतिची सुगंधी धूप घेऊन हिंडत असते.आनंद घेऊन जागू लागते.पहाट प्रसवू लागते, पूर्वेला तांबडं फुटू लागतं.पक्षांचीं गोड किलबिल कानी पडू लागते. त्या गोड किलबिलटाने सकाळ हळूहळू  हसरी होऊ लागते.🌹

            आज मी देखील सासवडला आहे. गेल्यावर्षी २७ फेब्रुवारी २०२५ ला देखील सासवडला आलो होतो. पावन भूमीची ओढ हृदयाला आकर्षित करीत असते.आज सोमवार दिनांक ०२ मार्च २०२६, होळीचा दिवस. ब्रह्मपहाटे उठून अंघोळीआदी आटोपून एकटाच पायी पायी निघालो.पूर्वेला तांबूस फुटलेलं दिसत होतं.तरीही सासवड शहर अंधाराची चादर घेऊन पूर्व दिशेला झूजूमुंजू उकलणाऱ्या तांबूस पिवळ्या प्रकाशाची वाट पाहात थकलेल्यांना थापाटीत असावं. गल्लोगलीतून चालत निघालो होतो. डांबर,सिमेंटच्या रस्त्यावर घराघरातून पाण्याचा सडा शिंपणं सुरु दिसलं होतं.सासवड सकाळच्या पक्षी गोड किलबिलटाने उठतं होतं.ऐतिहासिक सासवड शहरांच्या प्राचीन खाणाखुणा नजरेतून टिपित निघालो होतो.

             रस्ता मिळेल तसा चालत निघालो होतो.योगायोगाणे ज्या गल्लीतून चालत निघालो होतो त्या गल्लीत  इतिहास प्रसिद्ध पुरंदरेवाडा भक्कम दगडात बंदिस्त दिसला. चालत जातांना वाड्याचा इतिहास मनी घोळत असंतांनाचं अखंड दगडात बांधलेलं श्री भैरवनाथांचं भव्य मंदिर दिसलं.पायऱ्या चढून मंदिरात गेलो.मंदिर उघडचं होतं.पुजारी मंदिरातील देवपूजेत मग्न होते. एकटाच होतो, सोबतीला ना कोणी!!!हात जोडून श्री.भैरवनाथांचं दर्शन घेतलं. डोळ्यातून देवमूर्ती हृदयी तळाशी साठवत होतो.🚩

             दर्शन घेऊन हळूहळू कऱ्हा नदीच्या संगंमावर आलो.सकाळ शांत होती. नदीत थोडंफार पाणी दिसलं.नदीच्या संगमावर श्रीसंगमेश्वर मंदिर प्राचीनतेचा अध्यात्मिक भक्तीवारसा घेऊन डोळ्यांना बोलावीत होतं. दर्शन घेण्यासाठी माझा बोट धरण्यासाठी उभं दिसलं. मी भक्त, भक्तीच्या ठायी व्याकुळ झालो होतो. श्रीसंगमेश्वराने माझा बोट हाती धरून श्रीमहादेवाच्या पिंडीजवळ ओढून नेले जणू. महादेवाच्या पिंडीवर डोकं ठेवून एकचित्त झालो होतो.मी देवचरणी एकरूप झालो होतो.मी बाळ देवकुशीत भक्ती निवासाला होतो.मी श्रीसंगमेश्वराच्या प्राचीन भव्यतेत लिन झालो होतो.माझी ओळख पुसली गेली होती.श्रीमहादेव  प्राणतत्वात माझे श्वास विलीन झाले होते.

                 श्रीमहादेवाच्या पिंडीवर मस्तक ठेवलं होतं.हळूहळू डोकं वर घेऊन काही क्षण मन:चक्षुत एकांती बसलो होतो.गाभाऱ्यातून बाहेर आलो.पूर्वेचा देव पिवळसर लाली घेऊन क्षितिजा वर येत होता.उंच पायऱ्यांवर बसलो होतो. श्रीसंगमेश्वराचं प्राचीनतत्व ओंकार स्वरूप डोळ्यांनी न्याहाळत होतो. नदी संगमावर पक्षी येरझाऱ्या करीत होते.

              मी सूर्यदेवाचं दर्शन घेऊन पायी पायी 'संत शिरोमणी सोपानदेव महाराजांच्या संजीवन समाधीकडे निघालो होतो.सासवडच्या गल्ली बोळातून चालत होतो.सासवडचे प्राचीन वाडे पडक्या दगडातून नजरेत भरत होती.चालत कऱ्हा नदी  किनारी पोहचलो असता,नदीतलं वाहतं झूळझूळ थांबलं असावं.कोरडं पात्र पाहात प्र. के. अत्रे सरांच्या कऱ्हेचं पाणी नदीत शोधून पाहात होतो.झेंडूची फुले शोधत होतो. ज्यांनी महाराष्ट्र जागवला अशा महान साहित्यिकासं अश्रूनयनी याद करीत होतो.*कुठे गेलं सारं तें वैभव?* काही वेळ नदीकिनारी कोरड्या पडलेल्या पत्रातील खडकांकडे पाहत उभा होतो.मानवी जीवन अपूर्ण आहे हे अश्रूतं भिजवून अनुभवत होतो.ओल्या झालेल्या कडा पुशीत एकेक पावलं संत शिरोमणी श्रीसोपानदेवांच्या उंच पायऱ्यावर चढत होती.🚩

                मुख्य प्रवेशद्वारातून आत गेलो असतो श्री नागेश्वरांचं दर्शन घेतलं.श्रीमहादेववांचे कृपाआशीर्वाद घेत सोपानदेव काकांच्या समाधीकडे निघालो.संत भक्तांसाठी झिजत देवाकडे उज्वल भविष्यासाठी प्रार्थना करीत असतात.मी समाधी मंदिरात एकटाच होतो.संतांचा त्याग, कष्ट,सर्व डोळ्यासमोरून जात होतं.माझं डोकं समाधीवर ठेवलं होतं.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या कनिष्ठ भ्राताच्यां समाधीवर डोकं होतं.मी पापी हळूहळू उजळू लागलो होतो.अहंमं गळू लागला होता. विश्वव्यापी संत, संत शिरोमणीच्यां कृपाआशिर्वादामुळे आज सोमवारी होळीदिनी माझ्यातील स्वार्थ जळू लागला होता.मन प्रफुल्लित होत अध्यात्मिक पालवी फुटू लागली होती.सासवडच्या कुशीत नवअनुभूतीचा अंकुर घेत पूण्याकडे प्रयाण केलं होतं.आजचा दिवशी आनंद ओसंडून वाहत आहे.आनंद देण्यात-घेण्यात आहे.होळी अग्नी घेऊन नकारात्मक जाळून टाकणार आहे.मी धुतला जातो आहे. मन स्वच्छ, निर्मळ,निष्कलंक होण्यास सिद्ध होत आहे!भक्तिमार्ग थेट श्रद्धेच्या गाभाऱ्यात खोल जाऊन परामानंदी अमृतानुभ घेतो आहे.
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०२ मार्च २०२६
(सोमवार, होळीउत्सव)
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol