अष्टविनायक दर्शन भक्तीआनंद सहल

*अष्टविनायक दर्शन भक्तीआनंद सहल*
  💐🚩🚩🚩🙏🚩🚩🚩💐
               (भाग-०२ )
*****************************
... नानाभाऊ माळी 

     माणसांचा जन्म आई-वडिलांपोटी होतो.मोठा होऊन कर्तव्यपूर्तीसाठी बुद्धी-चातुर्याने झटत असतो. स्वप्न घेऊन झटत असतो, लढत असतो. मी,माझा परिवार जगला पाहिजे म्हणून राबत असतो. राबता राबता जाणीव नेनिवांचा स्पर्श होत राहतो.बुद्धी असल्याने 'मी का जगतो आहे? मी कोण आहे? माझं वागणं अन चरित्र काय?' या प्रश्नांची उकल होऊ लागते.भीती अन आस्थेच्या अनेक प्रश्नांची उकल होऊ लागते. भीती,आस्थेतून दोलायमान अवस्थेला सामोरे जात जगणं सुरु राहतं. 

             जबाबदारीतून *स्व* शोधनं सुरु होतं. *स्व* ला एकामागोमाग अनेक रसायनातून बुडवून काढलं जातं. तरीही *स्व* तरंगत नाही. त्याला मग भक्ती रसात बुडवून घ्यावं लागतं. भक्तीरस मग तो श्रीरामरस असुद्यातं,श्रीकृष्णरस असूद्यात, शिवरस असूद्यात,ओंकार स्वरूप श्रीगणेश असूद्यात....बुडवून बुडवून *स्व* ला भान येऊ लागतं,ध्यान येऊ लागतं.*स्व* तील ताठरता कमी होऊन मुलायमतेकडे वाटचाल सुरु होते. राग, लोभ,मत्सर सारखे दुर्गुण त्यागणे सुरु होतं.सकारात्मक भाव जन्म घेऊ लागतात.*स्व* त्यात विरघळू लागतो. मन, चित्त एकाग्रतेकडे वाटचाल करू लागतात. प्रसन्नतेची सुंदर निरामय अनुभूती होऊ लागते. *स्व* चा अर्थ कळू लागतो.स्व...परतत्वात विलीन होऊ लागतो.तेथे *श्रद्धेचा अविष्कार* साक्षात *देवनामात* दिसू लागतो. ईश्वरीय तत्व दिसू लागतं..... आम्ही *ईश्वरी अविष्कार* अनुभवण्यासाठी दिनांक ११ अन १२ फेब्रुवारी रोजी *अष्टविनायक दर्शन यात्रेला* गेलो होतो.

                        पुणे जिल्ह्यातील थेऊरच्या श्रीचिंतामणी श्रीगणरायाचं दर्शन घेऊन श्रीमयुरेश्वराच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र मोरगावला पोहचलो होतो. सूर्यदेव आपला रथ घेऊन आकाशी अंतर पार करीत वर आला होता.*मोरगाव श्रीमोरया गोसावीनीं पुनित तीर्थस्थळ आहे.* चिंचवड देवस्थान *श्रीमयुरेश्वराच्या* दर्शनासाठी भाविक भक्तांना ओढ लागली होती. देव भावाचा भुकेला असतो. भाव सात्विक असले की दर्शन सुखकर होत असतं.आम्ही भक्तगण गाभाऱ्यात विराजमान *श्रीमयुरेश्वराच डोळेभरून दर्शन घेत होतो.* मनोमन सात्विक समाधानाने म्हणत होतो,'दुसऱ्या श्रीगणेशाच दर्शन झालंयं.' 

                      आम्हाला ओढ लागली होती तिसऱ्या श्रीगणेश दर्शनाची.सिद्धटेकच्या श्री सिद्धिविनायक दर्शनाची.देव भक्तांकडे जाणार कसा?भक्ताने तीर्थाटन करून तीर्थस्थळी जायचं असतं.आमच्या मनात देव भेटीची व्याकुळता होती.देव दर्शनाचा स्वार्थ अंतरी जागत होता.आमची बस सिद्धटेकच्या दिशेने निघाली होती. दूरवर हिरवीगार शेती फुललेली दिसत होती.पाणी असेल तर शेतकरी राजा असतो.नदीचं पाणी शेतात मुरत असतं.पिक हिरव्या अंगी नाचू लागतं.सिद्धटेकला  जातांना चौफेर हिरवाईने पिसारा फुलवला होता.सिद्धटेकला पोहचलो तसें सर्वचं श्री सिद्धिविनायक मंदिराकडे देवाच्या ओढीने धावत सुटले. भक्तांशिवाय देव नाही तसा देवाशिवाय भक्त नसतो.भक्तीत रममान होण्यासाठी देवराधना महत्वाची असते.मंदिराच्या  एकेक पायऱ्या चढून गेल्यावर साक्षात श्रीलंबोदर मंदिर गाभाऱ्यात विराजमान असलेले दिसलें.देवाच्या विस्मयी रूपाकडे पाहात नतमस्तक झालो होतो.श्रीगणेश अंतरी जावून बसले होते.*श्रीसिद्धिविनायकचं दर्शन झालं होत.* अष्टविनायकातील तिसऱ्या गणपतीचं दर्शन झालं होतं.मंनचक्षुतं पवित्र भाव जागत होते.
(क्रमशः पुढील भाग-०३मध्ये पाहू)
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१३ फेब्रुवारी २०२६ 
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol