कानिफनाथ ट्रेक कष्टाचा देव (भाग -३५)
*कानिफनाथ ट्रेक कष्टाचा देव*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
(दम घामाचा अनुभव)
(*भाग -३५*)
*************************
... नानाभाऊ माळी
आपल्या जेवणात तोचं तोचं आहार असला कि कंटाळा येतो. जेवायची ईच्छा होत नाही.दररोज जेवणात पुरणपोळी वाढल्यावर कंटाळा येणारचं.बदल सृष्टीनियम आहे.आपण त्याचं त्याचं नेहमीच्या मार्गाने ट्रेकिंगला गेलो तर निश्चित कंटाळा येतो.मार्ग बदलून घेतल्यावर त्यातील जोश वेगळाच असतो. वेगळा अनुभव घेण्यासाठी मन तयार असतं.जेवणात मेन्यू बदलून घ्यावा. ट्रेकमध्ये मार्ग बदलून जावं. वेगवेगळ्या मार्गाने जातांना, चढतांना वेगळाच थरार असतो, अनुभव असतो.आम्ही पुणे जिल्ह्यातील सासवड, नारायणपूर, बोपदेव घाट, हडपसरपासून जवळपास सारख्याच अंतरावर मध्यवर्ती ठिकाण असलेलं कानिफनाथ गडावर दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी भल्यापहाटे गेलो होतो.यावेळेस होळकरवाडी मार्गे न जाता.वडकीनाल्याकडून गेलो होतो.हा अतिशय कठीण मार्ग आहे.अंगावर येणारा चढ आहे. खडकांवर पाय ठेवून चढावं लागतं.थरार वेगळाच असतो,त्यात पहाटे काळकुट्ट अंधार असतो. कसातरी मार्ग शोधत वर चढत राहणे, आव्हान स्वीकारून चढण्यातला थ्रील वेगळाचं असतो.
आता हिवाळा संपल्यात जमा झाला आहे. सूर्यदेव देखील आपलं मूळ रूप दाखवू लागला आहे. गड चढायचा असेल तर पहाटेची वेळ सर्वोत्तम असते.ब्राम्हपहाट आपल्या आरोग्यासाठी उत्तम वेळ असते.गड, किल्ले म्हणजे आव्हानास आवाहन करणारं अफलातून ठिकाण असतं. आव्हान स्वीकारून आरोग्य संपन्नतेचा मार्ग स्वीकारला तर आजारापण काही किलोमीटर दूर निघून जातं.स्फूर्ती, शक्तीचा जागर करीत असतांना गडकिल्ले छत्रपती शिवरायांचां इतिहास उभा करीत असतात.इतिहास ऊर्जा देत. असतात. शिवरायांसाठी शत्रूशी लढणाऱ्या शूर मावळ्यांनां स्मरण करीत असतात. त्यांचं त्याग अन बलिदान आपल्या हृदयी रुजलं जातं असतं.आम्ही सिंहगर्जना करीत गड चढत असतो.🚩
आम्ही कानिफनाथ आणि हेल्थ ग्रुपचे सदस्य देखील छत्रपती शिवारायांच्या मावळ्यांसारखं भल्या पहाटे उभट क्लायम्बिंग कडा चढत होतो.जंगली खुरटी झाडं अंगाला स्पर्शून जातं होती.अंधारातील कठीण चढायी लढाई लढण्यासारखीचं ऊर्जा,शक्ती देत होती.निवडक मावळ्यांसोबत किर्रर्र जंगलातील आडवळणी खडकाळ, दगडी अस्पष्टशी वाट आमच्या मदतीला धावून आली होती. कुठूनतरी रातकीड्यांचा किर्रर्र आवाज कानी पडत होता.भीती तरी का बाळगावी?भीतीवर आरूढ होऊन कठीण कडा चढत होतो.गुडघे,पायाच्या पोटऱ्यांचीं परीक्षा घेत होतो.छातडातून नासाग्रपर्यंत श्वासांनी गती वाढवली होती.त्यांना आवर घालून आम्ही वडकीनाला मार्गे कानिफनाथ गड चढत होतो.🚩
निर्धार,निर्णय,संयम सोबत असतील तर संकटावर सहज मात करता येतं असं म्हणतात.आम्ही पहाटसमयी पूर्ण क्षमतेने कानिफनाथ गडावर चढाईस आतुर झालो होतो.आम्ही आमच्या कार्यक्षमतेची परीक्षा घेत होतो.दम, घाम यांचा विचार का करावा?चढाईची लढाई मनात उतरलेली असते.मन शरीराला आदेश देऊन लढाईस भाग पाडीत असतं. आम्ही एक एक पावलं नेमक्या ठिकाणी ठेवून चढत होतो. पूर्वेला थोडं पिवळसर तांबूस फुटत होतं. निसर्ग नियमाला बांधील असतो.आमच्या नजरा उजेडात निसर्ग शोधत होत्या. निसर्ग सुंदर, अप्रतिम दिसत होता. आम्ही ट्रेकर निसर्गाशी नाते जोडायला आलो होतो. आम्ही निसर्गाशी एकरूप होऊन कानिफनाथ गड चढत होतो. उजेडात उंचावर मंदिराचा कळस दिसला तसें आम्ही आनंदित झालो होतो.आमच्या कष्टाचं फळ डोळ्यासमोर दिसत होतं.फळ गोड होतं.
कानिफनाथ गड चढून आलो होतो. सांगमरवरी १३४ पायऱ्या पुन्हा चढलो.साक्षात कानिफनाथांचं दर्शन घेत होतो.दर्शन दृशांत्मक होतं.डोळे, मन भरून आलं होतं. थकलो होतो तरी देवदर्शनाचं समाधान अमृतासमान होतं.मनोभावे नतमस्तक होतं श्रीकानिफनाथांचं दर्शन घेतलं आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो होतो. चढणे कठीण असतं तसं गड उतरणे देखील कठीण असतं. उतरताना पाय घासरण्याची शक्यता असते. इजा होण्याची दाट शक्यता असते. आम्ही सर्व ट्रेकर काळजी घेतं उतरत होतो. ट्रेकिंगंचा आनंद द्विगुणित झाला होता.तंदुरुस्तीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालो होतो. वेगळी अनुभूती, वेगळा अनुभव सोबतीला घेऊन कानिफनाथ गड कष्टाचा देव असल्याचं सुख मनी घेऊन घरी पोहचलो होतो.🚩
🚩🚩🚩🙏🚩🚩🚩
*****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे -४११०२८
मो.नं -९९२३०७६५००
दिनांक- २४ फेब्रुवारी २०२६
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment