अष्टविनायक दर्शन भक्ती आनंदसहल (भाग -०५)

*अष्टविनायक दर्शन भक्तीआनंद सहल*
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
                   (भाग -०५)
****************************
... नानाभाऊ माळी 

      श्रद्धाभक्ती एकत्र आल्यावर लोकं आस्थेस पूजत असतात.एकत्र येणाऱ्या जनसागरास भक्ती महापूर म्हणावा का बरं? पवित्र स्थळास विशाल सागर स्वरूप येत असतं. तिला यात्रा म्हणावी का? देवयात्रा आस्थेस समर्पित असते.ठाम विश्वास असतो कैवल्यधामाविषयीं.आपण आपल्या अंतर्मनीचे भाव समर्पित केलेले असतात.आत्मविश्वासाने आपण म्हणत असतो, 'पंढरपूर आषाढी यात्रा जवळ आली आहे. पांडुरंग भेटीस जायचं आहे बरं का?' आस्थेत स्व:कल्याणकारी ईश्वर पाहिलेला असतो!प्रत्येक व्यक्तीची आस्था भिन्न असू शकते.श्रद्धास्थळं वेगळी असू शकतात.देवाशी एकरूप होण्याची माध्यमं वेगळी असू शकतात.मन सुख,शांत,प्रसन्न,आनंदी जिथे होईल तिथे सुखाची शिदोरी प्रदान होत असते.आम्ही देखील यात्रेला गेलो होतो.अष्टविनायक दर्शनाला गेलो होतो.🚩

       दिनांक ११-१२ फेब्रुवारी २०२६ रोजी आम्ही देवयात्रेस गेलो होतो. म्हटलं तर देव वारीस गेलो होतो. अंगात, मनात देव वारं संचारलं होतं.  सात्विक,शुद्ध,निर्मळ भाव उमलू लागले होते. श्रीगणेश, वक्रतुंड, हस्तीदंत, भालचंद्राच्या दर्शनासाठी आम्ही अष्टविनायक यात्रेला गेलो होतो. लेण्याद्रीच्या उंच पर्वतराई कुशीत, अतिविशाल कातळातं कोरलेल्या सुंदर लेणी कलाशिल्पाचा अद्भुत अविष्कार अनुभवायला आम्ही गेलो होतो.अनेक लेण्यापैकी एका लेणीत श्रीगिरीजात्मज गणपती बाप्पाचं  दर्शन घेतलं अन पुढे पालीला निघालो होतो.लेण्याद्री तें पाली अंदाजे १५० किलोमीटर अंतर असावं.मुंबई -पुणे एक्सप्रेस हायवेंकडून खोपोलीला जातांना कोकण घाट पार केल्यावर पालीचा श्रीबल्लाळेश्वर गणपतीचं मंदिर आहे.

               घाट म्हटला की चढ-उतार आलाचं.वेडीवाकडी वळणं आली. जंगल अन घाटमाथ्यांमुळे डोळ्यांना भुरळ पडतें.निसर्ग आपल्याचं नादात फुललेला असतो.आपण पाहतंच राहावं.निसर्गाचें उमलणारें विविध अंग पाहात राहावेसे वाटतात. बसमधून आम्ही खोपोली घटाकडे वळलो होतो.घाट-उतारावरून कोकणातील दमट वातावरणाला सामोरे जात पालीच्या श्रीबल्लाळेश्वर  गणपतीचं दर्शन घ्यायला सिद्ध झालो होतो.देव भेटीची व्याकुळता वाढली होती.अंतःकरण भरून आलं होत. सूर्यदेव मावळतीला चलला होतां. सेकंद-मिनिटांनी थकून भागून छोटासा लाल-तांबूस गोळारूपी सूर्यनारायण डोंगराआड निघाला होता.आम्ही तळ्याकाठी कोकणातील *पालीच्या श्रीबल्लाळेश्वराच्या* मंदिरात श्रीगणपतीचं दर्शन घेत होतो.मन तृप्तीच्या उंच शिखरावर होतं.माझ्यातील आत्मभव परमात्म्याच्या ठायी संचार करू लागला होता.कणाकणांनी आत्मतत्व परमातम्यात विरघळू लागलं होतं.

      आमचं मन प्रसन्न होतं.भक्तीची शक्ती अपार आहे.त्यात आनंद वाटण्याची परमशक्ती असते.आम्ही काळजाच्या खोल ठायी आनंद देवआनंद भरून घेतला अन पालीहून महाडला जायला निघालो. अष्टविनायकातील आठवा श्रीगणेश अर्थात श्रीवरदविनायकाच्या दर्शनाला निघालो होतो.सूर्यनारायण 
डोंगराआड निघून गेला होता.बस पळत होती.हळूहळू रात्रअंधाराने काळा पडदा उघडला होता.सृष्टी अंधार कुशीत विसावू लागली होती. पशु-पक्षी,झाडं-वेली निसर्ग नियमाचं पालन करून झोपली होती.गावं खेड्यातील प्रकाशदिवे चमकत होती. त्या उजेडात गावं उजळली होती. बसच्या हेडलाईटमधून रस्ता उजळून निघत होता. पुढे प्रकाश मागे अंधार करून बस वेगाने पळत होती. साधारण अर्ध्या तासाने महडला जाऊन पोहचलो होतो.उंच डोंगराच्या पायथ्याला अतिशय प्राचीन मंदिराच्या गर्भगृहात *श्रीवरदविनायक* विराजमान आहेत.आम्ही रांगेने चालत होतो.चित्त तल्लीन झाले होते. गर्भगृहात देव आशीर्वाद देण्यासाठी प्रसन्न मुद्रेत बसले होते.पार्वतीपुत्र श्री गणेश,श्रीवरदविनायकासं नतमस्तक होतं श्रद्धापूर्वक दर्शन घेत. *अष्टविनायकातील आठव्या गणपतीचं* दर्शन घेतलं.दर्शन ऊर्जा असते.दर्शन श्रद्धेचा गाभा असतो. आम्ही गाभ्यापर्यंत पोहचून स्वतःस धन्य समजत होतो.गाभाऱ्यातील गाभा परमतत्व असतं.त्यात एकजीव झालो होतो.अष्टविनायकांचं शुभ दर्शन झालं होतं.आनंद, प्रसन्न होऊन रात्री आठ वाजता परतीच्या प्रवासाला निघालो होतो.आम्ही अष्टविनायक दर्शनातून श्रद्धा देवतत्व घेऊन आलो होतो.
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
****************************
...नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१७ फेब्रुवारी २०२६
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol