अष्टविनायक दर्शन भक्ती आनंद सहल(भाग -०३)

*अष्टविनायक दर्शन भक्तीआनंद सहल*
💐🚩🚩🚩🙏🚩🚩🚩💐
                   (भाग-०३)
*****************************
... नानाभाऊ माळी

             *अंतर* या शब्दातून अनेक गोष्टींचा शोध,बोध होत असतो.गाव गावांचं अंतर आपण किलोमीटरनें मोजत असतो. घर-शेतीतील अंतर मैल, किलोमीटर,फर्लागंभर असतं. माणसा माणसात देखील अंतर असतं. ते वागणुकीतून मोजले जात असतं, स्वभावातून मोजले जात असतं, चारित्र्यानुसार मोजले जात असतं. अनेक माणसं दुसऱ्यांबद्दल म्हणत असतात,'तू आपला लांबच बरा, उगाच किटकिट नको.'कधी म्हणत असतात,'मित्र खूप लांब गेला. वाईट वाटतं.पण त्याच्या भल्यासाठी लांब गेला तरी हरकत नाही.' तसंच भक्त अन देवामध्ये देखील अंतर असतं. संत नामदेव महाराज आपल्या अधिकारवाणीने स्वतःच्या हाताने साक्षात परमेश्वर विठ्ठलाला जेवू घालत असतं.भक्ताची भक्ती अतूट असावी लागते.ईश्वर सानिध्यात भक्त भक्तीत तल्लीन होऊन जातो. ईश्वराप्रती श्रद्धाभाव देवाजवळी नेत असतो.हृदयातून केलेल्या भक्तीतून देव,भक्त एकरूप होऊ लागतात. दोघांमधील अंतर कोण मोजू शकेल बरं?अनादी अनंताचं,आत्मा परमात्म्याच शून्यांतर समाधी अवस्थेपर्यंत नेत असतं.असं अंतर सद्गुनात्मक असतं.

      जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणीत तरंगू लागतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज रेडामुखे वेद वदवून घेतात.देवभक्तीचं शून्यांतर अध्यात्मिक शक्तीतून परमोच्चस्थानीं पोहचलेले महात्मे,ऋषी,मुनी,संत देवाला प्रिय असतात.त्यातील अंतर कोण बरं मोजेल?

       भक्तीत चिंब भिजतांना *मी* विसरावा लागतो.*मी* सोडावा लागतो.आम्ही देखील दिनांक ११, १२ फेब्रुवारी रोजी *मी* सोडायला गेलो होतो.आम्ही अष्टविनायक दर्शनाला गेलो होतो.थेऊर- श्रीचिंतामणी, मोरगाव-श्रीमयुरेश्वर, सिद्धटेक - श्रीसिद्धेश्वर श्रीगणेश दर्शन घेऊन पुढे रांजणगावातील श्रीमहागणपतीच्या दर्शनाला निघालो होतो.बस पळत होती.खिडकीतून मोहित करणाऱ्या लहान मोठ्या टेकड्या,शेतं,जंगल त्यातून दिसणारे भिन्न झाडं,भिन्न पिकं मनमोहित करीत होती.ग्रामीण जीवनाचं आगळं वेगळं दर्शन होतानां दिसत होतं. ऊस,गहू,ज्वारी शेताची शोभा वाढवीत होते.आम्ही पर्यटनातून देवधर्म साधत होतो.आम्ही श्रीमहागणपती दर्शनाला रांजणगावला निघालो होतो. रांजणगाव हे पुणे-अहिल्यादेवी अ.नगर रस्त्यावर आहे.

        अ.नगर-पुणे रस्ता नेहमीचं वाहनांनी व्यस्त असतो. रांजणगावला तिचं ट्रॅफिक जाम समस्या आहे. आम्ही पोहचलो तेव्हा  त्या समस्येला सामोरे जात रस्ता पार करून श्रींच्या मंदिरात पोहचलो.मंदिर सभोवतालचा परिसर सुंदर कमानिनीं सजविलेला दिसला.रांगेने प्रवेशद्वारातून चालत आत गेलो.मंदिर गाभाऱ्यात श्रीगणरायाचीं भव्य मूर्ती डोळ्यांना दिसली.साक्षात्कारी मनभावन मूर्ती नेत्रातून हृदयी उतरत होती. श्रीमहागणपतीचं दर्शन घेत होतो.श्रद्धा अर्पित करीत होतो. हातातली फुलं देवाला वाहिली. क्षणभर डोळे बंद करून देवाला मनात, देहात उतरवत होतो.अद्भुत शक्तीचीं अनुभूती घेत मंदिरातून बाहेर पडलो.

       परमेश्वर सानिध्य आत्मानुभूतीचं प्रतीक असतं.पावित्र्य आपणास पवित्र करीत असतं.आम्ही देव दर्शन घेऊन बाहेर पडलो.रांजणगाव येथील श्रीमुख अंतरी उतरवून पुढील यात्रेस निघालो होतो.आम्ही श्री विघ्नेश्वराच्या दर्शनाला ओझरच्या दिशेने प्रयाण केले.प्रवास,पर्यटन,देवदर्शन माणसाच्या जगण्याचे आधार आहेत. शिकतांना बरंचस आपण घेत असतो.थोडंफार सुटून जात असतं.ते सोडून द्यायचं.सूर्यदेव पश्चिमेंला झुकला होता.पश्चिम क्षितिजाकडे निघालाहोता.वाड्या-वस्त्या,लहान-मोठी गावं मागे जात होती. ओझर दिशेने प्रवास सुरु होता. शेतात, मळ्यात एकरूप झालेली कुटुंब पाहात होतो. 🚩

        शेती हिचं आई... धन धान्य देणाऱ्या आईच्या कुशीत राबणारा शेतकरी पाहात होतो. मंचर गावं पार करून आम्ही पुढे निघालो होतो. पश्चिमेला डोंगराआड दिवसभर राब राबणारा, तप्त होऊन वाटचाल करणारा, जिवसृष्टीस जीवनदान देणारा सूर्यनारायण आपलं तेजस्वी रूप मावळतीला सोडून लाल गोळारूपी निघाला होता.मावळतीचं ते दृश्य दिवसभर कष्ट करून राबणाऱ्यांना विश्रांतीसाठी खुणावत होतं.पशु, पक्षी निसर्गनियमांच पालन करीत विसावू लागली होती.माणसं मात्र राबत होती.हळूहळू सूर्यास्त झाला तसं संध्या छायेतून तिमिराकडे प्रवास सुरु झाला होता.आम्ही ओझरला पोहोचल्यावर सरळ मंदिराकडे निघालो.योगयोगाने सात वाजता श्रीविघ्नेश्वराच्या आरतीला मंदिरात पोहचलो.आम्हा भक्तांना कुशीत घेण्यासाठी साक्षात श्रीगणेशाने आम्हाला बोलावलं होतं.मुख अन वाद्यातून आरतीचा गोडवा अमृतांसमान वाटत होता.कानावर पडणाऱ्या शुद्ध पवित्र बोलांनी मन भक्तीसागरात डुंबत होतं.श्री विघ्नेश्वराचं दर्शन प्राणतत्वास प्रफुल्लित करीत होतं.देव दर्शनाने माझ्यातील *मी* विसर्जित होत होतां.🚩
(क्रमशः पुढील भाग-०४ मध्ये पाहू)
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी 
हडपसर,पुणे -४११०२८
मो. नं. ९९२३०७६५००
दिनांक-१४ फेब्रुवारी २०२६
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol