अष्टविनायक दर्शन भक्ती आनंद सहल
*अष्टविनायक दर्शन भक्तीआनंद सहल*
💐🚩🚩🚩🙏🚩🚩🚩💐
(भाग-१)
****************************
... नानाभाऊ माळी
ब्रम्हपहाटे आडमुठ मन देहाला उठू देत नसतं.झोपेतून उठायला नकार देत असतं.मनाला ताब्यात ठेवण्यासाठी अंतरीचा ठाम निर्धार असला पाहिजे.सकारात्मक ध्येयाने प्रेरित अतंकरण मनाला आदेश देऊन 'होकार' घडवून आणत असतं.आम्ही देखील काल ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे उठलो अन घड्याळ काट्याच्या टिकटीक फिरण्यातून धावपळ सुरु झाली होती.मनाला बजावलं,' चल आदेशाचं पालन कर!' मन हृदयाचं गुलाम होऊन ताळ्यावर येताचं हृदयातंरीच्या ऊर्जेमुळे भराभर तयारी करून आम्ही 'चला जाऊया गड किल्ल्यांवरचें' आयोजक आदरणीय श्री.वसंतराव बागूल सरांच्या *'चला जाऊया अष्टविनायक दर्शनाला'* या मोहिमेअंतर्गत अष्टविनायक दर्शन यात्रेला निघालो होतो.
डोळ्याला जे दिसतं त्याला दर्शन म्हणतात.हृदयाला भावलेलं त्यालाही दर्शन म्हणतात.दर्शन साक्षात्कारी असतं.मनौषधी असतं.हृदयाला भावलेलं असतं.आत्मशुद्धीची अनुभूती त्यातून होत असते.मानवी मनाला पडलेलं कोडं शोधण्याचा प्रयत्न असतो.आपलं आयुष्य अन श्रद्धा हे कोडेंच आहेत नाही का!जन्मापासून आपण आपलं कोडं सोडवित असतो.सुख-दुःखाच्या चढ-उतारावर प्रवास सुरु असतो.मन श्रद्धेभोवती नागवेढा टाकून बसलेलं असतं.मन घट्ट वेढा आवळत बसतं.मनाचीं लालसा काही सुटत नाही.अतृप्तीचा प्राणवायू देहात उगाच येरझाऱ्या करीत असतो. आपल्याला आपल्या जन्माचा अर्थ कळत नाही.मन तडफडू लागतं. व्याकुळ होतं राहतं.व्याकुळतेची सीमा पार होण्याआधी मनाला श्रद्धाद्वारी ओढून नेल्यावर अविचारांची साखळी तोडण्यात यश मिळतें.माणसाचं आयुष्य अतिशय गुंतागुंतीच असतं.व्यवहारी जगण्याचा हा गुंता शुद्ध श्रद्धेतून सोडविण्यात जो यशस्वी होतो तो जगण्याच्या अर्थापर्यंत पोहचतो.स्वतःस ओळखू लागतो.जगण्याचं उद्धीष्ट समजून घेतो.थोडी अध्यात्माची फोडणी सोबतीला असली की जगणं सुखकर होतं.आम्ही मनाला अध्यात्माच्या ओढ्याकडे घेऊन निघालो होतो. ओढ्यातील शुद्ध वाहक हृदयात ओतण्यास निघालो होतो. होय आम्ही *अष्टविनायक दर्शनाला* निघालो होतो.
११ फेब्रुवारीच्या शुद्ध पहाटे आम्ही पुण्याजवळ असलेल्या *थेऊर येथील श्रीचिंतामणी गणपतीच्या* दर्शनाला निघालो होतो.४५ आसनी बसमध्ये निघालो होतो.श्रद्धाद्वारी हृदय वसविण्या,मनअहंकार जाळण्या निघालो होतो. शुद्ध अशुद्धाची पारख करून अंतरात्मा अर्पित करण्या निघालो होतो. श्रीगणेश सर्व शुभकार्याचा प्रारंभ असतो.प्रारंभाला नमन करण्यासाठी निघालो होतो.शिव-पार्वतीपुत्र श्रीगणेशास नमन करण्या निघालो होतो.बस पळत होती रस्ता मागे जात होता.काँक्रेट जंगल सहित हिरवं रानं मागे जात होती.सोलापूर रस्ता काही डांबरलेला,काही काँक्रेटचा झालेला बस चाकांना गती देत होता.लोणी काळभोर गेल्यावर हळूचं डावे वळण घेत बस थेऊरला पोहचली.
सकाळचे ६-४५ वाजले होते. कोवळा सूर्यदेव लालगोळा होऊन क्षितिजावर येत होता.आम्ही थेऊरला बसमधून खाली उतरलो होतो. जीव जीवांना ऊर्जा, प्रकाश जीवन देणाऱ्या सूर्यदेवास नमन करून श्रीचिंतामणीच्या दर्शनास निघालो. श्रीगणेश कृपाशीर्वाद देत गर्भगृहात बसले होते जणू!शुभ सकाळी श्रीचिंतामणीचं हात जोडून मनोभावे दर्शन घेत होतो. शुभ कार्यारंभास अंतरी वसवीत होतो.जगण्याचा अर्थ देवात शोधित होतो. स्वतःस त्यात शोधित होतो.मी पणास अर्पित करीत होतो.*मी* ला शोधित होतो.देहरूपी डोळ्यातून देवाला अंतरी वसवीत होतो.श्रीचिंतामणीसं भक्ती ओलाव्यातून,भावना ओतून देव कृपाशीर्वाद घेत होतो. अष्टविनायकांपैकी पहिल्या श्रीगणेशास हृदयातंरी वसवून पुढील प्रवासास प्रारंभ केला होता. मोरगाव येथील श्री मयुरेश्वराच्या दर्शनासाठी निघालो होतो.
(क्रमशः पुढील भाग-०२मध्ये पाहू)
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी
(सध्या अष्टविनायक दर्शन प्रवासात)
.........पुणे
मो.नं. ९९२३०७६५००
दिनांक-१२ फेब्रुवारी २०२६
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment