कानिफनाथ ट्रेक कष्टाचा देव(भाग-३४)
*कानिफनाथ ट्रेक कष्टाचा देव*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
(वेगळी अनुभूती)
*( भाग -३४)*
*************************
... नानाभाऊ माळी
मनाला योग्य स्थळी पोहचायची ओढ असते.जोपर्यंत आपण वाटचाल करीत नाही त्याची हृदयातून हुरहूर असते.असं स्थळ मनाला आनंद, समाधान देत असतं.स्फूर्ती देत असतं.पायांना आपोआप ओढून नेत असतं.मन अन पाय त्या स्थळाच्या अधीन झालेले असतात. अशी कुठली जादू असेल बरं?म्हणजे जादू नाही बरं का.पण पक्का विश्वास असतो. आपल्या पायांना आपोआप मन ओढून नेत असतं.त्या स्थळी सतत बोलवत असतं.आम्हाला देखील पुण्याच्या हडपसर पासून अवघ्या ९-१० किलोमीटरवर अंतरावर असणारां श्रीकानिफनाथ गड बोलवत असतो.श्रीकानिफनाथ दर्शनाने सतत साक्षात्कारी नावीन्यपूर्ण अनुभूतीचं दर्शन घडवत असतो.आपल्या श्वास अन शरीराचा उत्तम व्यायाम घेत असतं.मला वाटतं तो गड आमचा आवडता शिक्षक असावा.आम्हाला आरोग्यसंपन्न घडविण्यासाठी सतत लक्ष देऊन असतो.आम्ही देखील कानिफनाथ गडाचे आवडते विध्यार्थी आहोत!
श्रीकानिफनाथ गड श्रद्धा, विश्वास शरीराची परीक्षा घेणारा ट्रेक आहे. थकव्यानंतर आत्मिक समाधान देणारा ट्रेक आहे.ते श्रद्धेचं आनंदस्थळ आहे.भक्तीचा आत्मिक आनंद देणारं स्थळ आहे.पूजनीय देवभूमी आहे.आपली पावलं आपोआप कानिफनाथ स्थळी ओढ घेत असतात.हडपसर,पुण्याहून केवळ १०-१२ किलोमीटर अतंरावर असणारी ही अध्यात्मिक देवभूमी कानिफनाथ गड पर्वतावरील भू सपाटीवर वसलेलं शांत,निरव,एकांत अध्यात्मिक केंद्र आहे.उंच पर्वतरांग चढतांना अंगाला घाम फुटतो.दम लागतो.छातीचे ठोके वाढतात.या परिश्रमामुळे शरीर अन मनाची शुद्धी होते.ही शुद्धी आरोग्यासाठी हितकारक असते.कानिफनाथ गडावरील शुद्ध प्राणवायू सभोवती भरून असतो.झाडांमधून हिंडत प्रदूषणमुक्त होऊन जातो.
आम्ही रविवार दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी पहाटे कानिफनाथ गडावर गेलो होतो.हवेत गारवा होता.चढण्यास उत्साह होता.चौफेर अंधार होता.आम्ही उमेदीच्या घोड्यावर बसलो होतो.माणूस घोडा झाल्यावर अंगात जोश चढतो.तोचं जोश हिम्मत देत असतो लढण्याची अन कठीण प्रसंगी तोंड देण्याची. आम्ही कानिफनाथ गड चढत होतो.
अंगात ऊर्जा होती.पावलं पुढे पडत होती.अंधारात आश्वासक टीमटीमणाऱ्या चांदण्या सोबतीला होत्या.टॉर्चच्या उजेडात उजेडाच्या वाटेवर चालत होतो.हिम्मत असल्यावर शिखर देखील जवळ येत असावं.आमचं असंच झालं होतं.पायांना अन डोळ्यांना मनाने आदेश दिला होता.आम्ही अथक चालत कानिफनाथ गडाचं उंच शिखर गाठलं होतं.त्यावरील भूसपाटीवर श्रीकानिफनाथांचं समाधी मंदिर दिसलं.मंदिरातील समाधीवर श्रद्धापूर्वक डोकं ठेवलं.कृपाशीर्वाद घेतले.सभोंवती मन शांतीचीं गोड ध्वनी कानी पडत होती.होय पूर्व क्षितिजावर किंचितसं तांबड फुटलं होतं.त्या साक्षीने पक्षांचा चिवचिवाट मन प्रसन्न करीत होता.शुद्ध वातावरणातील कर्णमधुर पक्षीगीत जणू चित्तास समाधीस्थळी ओढून नेत होतं.सकाळचें सहा वाजत होते. आरतीला हजर होतो.आधी श्रीकांनिफनाथांची नंतर श्रीगणेशाची आरती झाली.मनोभावे पूजन करून सकाळी सव्वा सहाला प्रसाद घेतला होता.
आम्ही 'कानिफनाथ ट्रेकिंग आणि हेल्थ क्लबचें' सर्व सदस्य परतीच्या प्रवासाला लागलो होतो.पूर्वेची सोनेरी किरणं ताजे जीवनसत्व प्रदान करीत होते.पूर्वेचा सूर्यदेव दाता होता. आम्ही याचक होतो.श्रीकानिफनाथ गडाच्या उतारावरून गुढघे सांभाळून पळत होतो.कडेला असलेले कोरडे-सुष्क गवत आमच्या स्वागतास तयार होतं. श्रम, कष्ट अन जिद्दीने श्रीकानिफनाथ गड सर केला होता.धमनीचे ठोके वाढले होते.फुफुसात शुद्ध प्राणवायू घेऊन नव्या दमाने, नव्या शक्तीने कानिफनाथ गड खाली उतरत होतो.तो आनंद अवर्णनिय होता. श्वासात श्रीकानिफनाथ अन शुद्ध प्राणवायू घेऊन घरी निघालो होतो. उतारावरील दगडगोटे साक्षीला होते. ते ही घरंगळत होते.उताराकडे जात होते.प्रत्येकाला चढ कठीण वाटतो, उतार आपलासा वाटतो.आम्ही उताराकडे निघालो होतो.आनंद घेत स्वतःला पारखत निघालो होतो.
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०६ फेब्रुवारी २०२६
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment