सुखानंदाकडून शोकाकडे प्रवास

*सुखानंदाकडून शोकाकडे प्रवास आमुचा*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
            (भाग-०१)
**********************
...नानाभाऊ माळी

                जीवन म्हणजे काय असतं बरं? सुख तरी कोणाला म्हणावं मग?डोळ्यानीं, हृदयानें अनुभवलेलं,भावलेल्यासं आनंद मानायचा का?सुखानंद तृप्ती पर्यंत पोहचल्यावर पुढे निरस वाटू लागतो का?निरस असलेल्या क्षणांनी शोक जन्माला येत असतो.अत्यंत दुःख होत असतं. शोकांतिका जन्म घेत असते.आपल्या वाट्याला शोकांतिका येते तेव्हा दुःखाने परिसिमा गाठलेली असते.जीवनात माणूस माणसात राहून आपले प्रत्येक क्षण सुख -दुःख घेऊन वाटचाल करीत असतो.वेळ,काळ पळत असतात. एकमेकांच्या सहवासाने पळत असतात. माणसं, कुटुंब, नातेवाईक, स्नेही, आप्त सर्वचं प्रत्येक क्षणी निकट,जवळ येत जातात. क्षणाक्षणांनी अती निकट येतात. पती-पत्नी पिता-पुत्र, माता-पुत्र,बहीण-भाऊ..... सर्व सर्व नातेवाईक!मित्र-समाज कसा एकरूप, एकजीव होऊन गेलेला असतो.सभोवती सुखानंद नुसता अमृता समान वाहू लागतो. आनंदानें सर्वोच्च शिखर गाठलेलं असतं.

            आनंदाने शिखर गाठलेलं असतांना अचानक दुःख प्रवेश करतं, आपला आनंद हिरावून नेतो. शोकाकुल प्रवेशाचां अंक अतिशय वेदनादायी असतो.प्रत्येकाला आनंद हवा असतो. दुःख नको असतं.दुःख क्लेश देत असतं.शोक करायला लावतं.शोक हृदयातून बाहेर पडत असतांना दबलेला श्वासांचा विस्फोट हुंदका असतो. हुंदका असहनीय असतो. घळाघळा रडून दुःखाचा डोंगर हळूहळू हलका करीत दुःखाला वाट द्यायची. डोळ्यातून अश्रुंचा लोट वाहू लागतो.हे दुःख आपल्या वाट्याला न सांगता येत असतं. आनंदाची वाट आडवीत थांबलेलं असतं. दुःख अपरिमित हानी करूनच आपली वाट सोडत असतं.पिच्छा सोडत असतं.असं म्हणतात की प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात त्यातून जावं लागतं.जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचं झाल्यास 'सुख जवा एवढे,दुःख डोंगरा एवढे!'प्रसंग असाच होता...आम्ही आज २७ जानेवारी २०२६ च्या सकाळी दुःखानुभूतीचा डोंगर चढत होतो. डोळ्यातून पुराचा लोंढा वाहणारा एक प्रवास अनुभवला.

           पुण्यातील प्रसिद्ध उर्दू साहित्यिक,गझलकार *प्रा. उद्धव महाजन 'बिस्मिल' सर* यांचं २५ जानेवारीला अल्पशा आजाराने झालेलं निधन मनाला चटका लावून गेलं.शोकाची विशाल किनार घेऊन हिंडणारं दुःख आपल्याचं नादात होतं. ते हृदयातं खोल खोल खळगा पाडीत गेलं होतं.कै.प्रा महाजन सरांसोबत माझे गेल्या ३८ वर्षांपासून सामाजिक,साहित्यिक स्वरूपाचे ऋणानुबंध जुळले होते.एक माणूस म्हणून, मार्गदर्शक म्हणून,एक समाजसेवक म्हणून, एक साहित्यिक म्हणून, एक व्यवहारी व्यक्तिमत्व म्हणून अशा अनेक भूमिकेत त्यांना पाहिले होते.मराठी, उर्दू, हिंदीत प्रचंड लेखन अन योगदान देत साहित्य शिखर गाठणारें, अनेक पुरस्कारांनी गौरवान्वित,नावलौकिक मिळविलेले लेखक आमच्या डोळ्यासमोर देहाचा निरोप घेत आपला आत्मा घेऊन दूर निघून गेलेत.उंच उंच ज्वाळांनी, अग्नीसंस्कारातून देह हळूहळू राखेत येऊन थांबला.आत्मा गगनावरी दूरवर उडून गेला.रसिक मनास आपल्या लेखणीतून, प्रतिभेतून भुरळ पाडणारे साहित्यिक आम्हास सोडून वैकुंठ धामास निघून गेलेत.आमचें डोळे आसवांचें तलाव झाले होते.भरलेल्या डोळ्यांना अश्रूधार लागली होती.उत्तम साहित्यकृती फुलवणारे थोर साहित्यिक आपली लेखणी सोबत घेऊन निघून गेले होते.एक तेजस्वी ज्योत दूरदूर वरवर जातांना दिसत होती.
        (क्रमशः पुढील भागात)
💐💐💐💐🙏💐💐💐💐
****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२७ जानेवारी २०२६
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol