क्रीडामहोत्सव आरोग्य गुरु

*क्रीडामहोत्सव आरोग्य गुरु*
🥇🏆🏆🤹‍♂️🤹‍♀️🏆🏆🥇
*************************
... नानाभाऊ माळी 

                  आम्ही लहान मुलं होतो.खूप लहान होतो. घरात, दारात,अंगणात हुंदडत असतांना गल्ली पारावर नुसताचं धिंगाणा चालू असायचा. अंगठा ठेचकाळला, लागलं, ढोपर रक्ताने माखलं की इकडे तिकडे कुठे घावटीचा पाला असेल तर जखमेवर निर्दयीपणे चोळून खेळण्यासाठी पुन्हा तयार असायचो.गल्लीत मातीची धूळ असायची.पायात चप्पल नसायचे. सरळ सरळ माती अन तळपाय पळतांना एकरूप झालेले असायचे. मित्रांशी कधी कट्टी बट्टी देखील व्हायची.पुन्हा दोन बोट समोरच्याच्या हाताला भिडायची. पुन्हा धिंगाणा सुरु व्हायचा. हाताने बनविलेलं पतंग वर उडतांना तुटायचं. ते कुठे पडेल याचा अंदाज नसायचा लक्ष पतंगाकडे असायचं. खाली, दगडं, काटे काहीही असो पळत सूटायचं अन पतंग हस्तगत करायचं. ज्याला सापडलं ते त्याचं पतंग घेऊन आनंद व्यक्त करायचा. तर इतर हिरमुसल्यागत व्हायचे.जिंकणे अन प्राप्त करणे हा आत्मप्रौढीचां आनंद वेगळाच होता.लहानपणी कितीही आजारी पडलो, फनफन ताप असला तरी डॉक्टरकडे जाणं नव्हतं.तेव्हा खेड्यातं डॉक्टर तरी कुठं होता? डोक्यावर मिठाच्या पाण्यात भिजविलेले फडके ठेवले तरी चालायचं. 🏆

          खरंच सगळं सगळं वेगळं अन अलौकिक होतं नाही का!!!.. मुलं पळता पळता धडपडतात!कधी गुडघा फुटतो.पुन्हा उठून पळू लागतो.झाडावर सूर पारंब्या,विटी -दांडू,नदी-तळ्यात चपटा दगड असा फेकायचा की पाण्यावर टप्पे घेत लांबवर जाऊन पडणे, खो खो, कबड्डी सारखे खेळ खेळण्यातील मजा ती वेगळीचं होती. जिद्द होती.जिंकण्यासाठीचं खेळणं होतं.घामाघूम होऊन शरीराची कसोटी लागायची.आजारी पडनंचं नव्हतं.खेळ तंदुरुस्तीच साधनं होती. पोट आत गेलं की जेवायची आठवण यायची.भूक इतकी लागायची की चेष्टेने घरातील म्हणत असतं,'किती बकासुरा सारखा खातोयं रें?' अंग दुःखेस्तोवर खेळणं होतं.पोट तट्टतुंब होई स्तोवर खाणं होतं.व्यायामचं तेवढा व्हायचा.

     तेचं खेळ शाळेत खेळू लागले.उंच उडी,धावणे,कबड्डी, खोखो खेळण्यातून जिल्हा,राज्य,राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळू लागले. मुलांना वेगळं जग गवसल्यागत झालं. खेळण्यातून प्रतिभा प्राप्त होते. हे सर्वांना कळलं.सर्वांचा नावलौकिक होऊ लागला.शाळा,महाविद्यालयांत मैदानी खेळ अत्यावश्यक असावाचं. प्राचीन काळापासून खेळाला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे.खेळ म्हटल्यावर प्रचंड अंगमेहनत होते.दंगा, मस्ती,अंगीकुवत या सर्वांचा कस लागतो. शालेय जीवनापासूनचं खेळ अंगीभूत शारीरीक मस्तीसाठी महत्वाचा असतो.अंगीभूत गुणांना वाव मिळतो, संधी मिळते.देशाची सुदृढ, आनंदी, उत्साही युवक-तरुण संपत्ती असते.भावी आरोग्यदायी पिढी घडतं असते.खेळातील सहभाग आरोग्यधन असतं.

         २९ नोव्हेंबर २०२५ रोजी एका नामांकित शिक्षण संस्था आयोजित हिवाळी क्रीडामहोत्सवात उपस्थित राहण्याचा योग आला होता. पुण्यातल्या हडपसर येथील महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेनें *४३ व्या जिल्हास्तरीय वार्षिक अंतरशालेय क्रीडामहोत्सवाचं* आयोजन केलं होतं.ठिकाण होत रामटेकडी येथील एस.आर.पी ग्राउंड. संस्थेने विविध मैदानी क्रीडास्पर्धा आयोजित केल्या होत्या.संस्थेचे संस्थापक -कर्मवीर रतन माळी सर, अध्यक्षा- सौ. स्मिताताई वाघ मॅडम, सचिव- प्राचार्य श्री. रवींद्र वाघ सर, सर्व शिक्षकवृंद आणि सर्व उत्साही विध्यार्थी क्रीडामहोत्सवात विध्यार्थ्यांमधील उपजत कलागूणांना वाव मिळत असतो, लपलेल्या सुप्त गुणांना वाव मिळण्याची नामी संधी असते.तर... संस्थेच्या अनेक शाळेतील विध्यार्थी त्यांच्या अंतर्गत फेऱ्यातून पात्र ठरल्या नंतर अंतिम फेरीसाठी एस.आर.पी ग्राऊंडवर क्रीडास्पर्धा आयोजित केली होती.खेळातील अनेक क्रीडाप्रकार होते. रनिंग, भाला फेक, कब्बडी, खोखो इत्यादी.सकाळी गारवा होता. पोलीस ग्राउंडसभोवती झाडांची गर्दी होती.विध्यार्थ्यांमध्ये प्रचंड जोश होता.त्यांचे पाळण्यातले पाय क्रीडामहोत्सवात दिसलें.दिवसभर सुरु असलेल्या क्रीडास्पर्धेत शारीरिक तंदुरुस्तीचीं परीक्षा होती.🏆

          हिवाळा आरोग्यवर्धक असतो. बलवर्धक असतो. कितीही खा, व्यायाम करा शरीराला हितकारक असतो.अशा हिवाळ्यातील नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या क्रीडा महोत्सवाची रंगत न्यारी होती. खेळ म्हटलं की हार आणि जीत असतेचं. यावेळेस जिंकणारा अतिशय आनंदी असतो.हरणारा पुढील वर्षी जिंकण्याच्या तयारीला लागत असतो. खेळातून नवचैतन्य,उभारी अन (sportsmanship)खिलाडूवृत्ती जन्म घेत असते.खेळं उत्तम शरीर स्वास्थ्यांची पावती असतात.मला खेळाविषयी सतत ओढ, कुतूहल, उत्सुकता, मस्तीची झ्जींग वाटत आली आहे.बालपण आठवणं होतं.लहानपण तणावमुक्त असतं. खेळातून व्यक्ती घडत असतो. खेळातून भावी नागरिक सुदृढ राष्ट्रीय संपत्ती म्हणून ओळखली जाते.अशा मनोवेधक खेळात समरस होण्यासाठी गेलो होतो.मनाने मुलं होऊन मैदानात खेळाडू म्हणून खेळत होतो. आनंद घेत होतो.असा अविस्मरणीय क्षण कधीही विसरणे होणार नाही.लहानपण शुद्ध निर्मळ असतं. ते उपभोगून घ्यायचं असतं. जिंकलेल्या विध्यार्थ्यांना शुभेच्छा देत अन हरलेल्याना हृदयाशी घेऊन पुढील वर्षासाठी शुभेच्छा देऊन निघालो होत🏆
🥇🏆🏆🤹🤹‍♂️🏆🏆🥇
**************************
... नानाभाऊ माळी 
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१५ जानेवारी २०२५
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol