कानिफनाथ ट्रेक कष्टाचा देव

*कानिफनाथ गड कष्टाचा देव*
      (अनुभूतीचा आनंद सोहळा)
                   (भाग-३३)
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
***************************
... नानाभाऊ माळी

पहाटवारा थंडी कुडकूड 
...... मी निशाचर झालो
अंधाराला घेऊनि सोबती 
.... कानिफनाथ वर गेलो!🚩 

सर्वांगाला बिलगूनी थंडी
........नाचुनी गार झालो
लढ म्हणुनी चढ चढलो
..मी कानिफनाथ वर गेलो!🚩

चढ चढता मागे पाहिले 
.....मी अचंबित झालो 
शुभ्र चांदणे दरीत होते 
.....भुलूनी त्यासं गेलो!🚩

लक्ख दिव्यांची पुण्यनगरी
.......चमचम करीत होती
घरात सारे गोधडी पांघरून
...........स्वप्नी घोरत होती!🚩

ब्रम्हवेळेची मजाच न्यारी
...आम्ही गड चढत होतो
  कुडकूड थंडी पांघरूनी
....अंधारातं लढत होतो!🚩

निसर्गनिर्मित दानावर
स्वास्थ्य गब्बर झालो
बाल सूर्यही हळूच हसला
जब्बर कोवळे उन प्यालो!🚩


                रविवारी ११ जानेवारीच्या पहाटे ०४ वाजता उठलो अन दरवाजा उघडून गॅलरीत आलो.तशी अचानक थंडगार हवा अंगावर चाल करून आली होती.सर्रदिशी अंगावरची केसं उभी राहिली होती.रविवारी थंडीचा निचांक असावा असं वाटतं.मी गारठ्यामुळे खाड्डदिशी दरवाजा बंद करून घेतला होता. कानिफनाथ गडावर जावं की नाही संभ्रमात होतो.🚩

                       मनाचा ऐकावं,का हृदयाचं? *मन* चंचल असतं. बेलगाम उधळलेलं घोडं असतं.ते कुठंही उधळतं असतं अन स्वतःच्या मतावर कधीच ठाम नसतं. चलबिचल असतं.एवढंच काय जरा अविचारी देखील असतं.जिकडे हवा तिकडे पळत सुटतं,लुडकत असतं. हव तर खुशालचेंडू म्हणा नां! तर तर...*हृदय* विचारी असतं.संस्कारी असतं.श्रद्धाळू असतं.सारासार परिस्थिती समजून घेत असतं.हृदय विचारांती निर्णय घेत असतं. नफा-तोटा जाणकार असतं अन घेतलेल्या निर्णयावर ठाम असतं. तडजोड करीत नसतं.मी हृदयाचं ऐकून विचार करू लागलो,'जाग आलीचं आहे.दर रविवारी नेहमीप्रमाणे कानिफनाथ गडावर जाण्याचा अधोरेखित नियम आहे. थंडी अंगावर आली म्हणून मैदानातून पळ काढायचा का?तिला कवेत घेऊन निघायचं.गारवा अंगाला हूडहुडी भरायला लावेल.घाबरून चालणार नाही.तोंड देत,थंडीला अंगावर घ्यायचंचं.डोंगर चढून श्रीकानिफनाथ दर्शन घ्यायचंचं!' मी  मनाला लगाम लावून पहाटे ०४ वाजता अंघोळ करून,बरोब्बर ०५ वाजता हूडहुडी भरायला लावणारी थंडी पांघरून कानिफनाथ गडाकडे निघालो.

            आम्ही गाड्यांनी पुण्यातल्या हडपसर पासून साधारण ०८ किलोमीटर अंतरावर असलेल्या होळकर वाडीत पोहचलो. होळकरवाडीपासून एक किलोमीटरपर्यंत डांबरी रस्ता आहे.तेथे गाड्या ठेवून कच्च्या खडकाळ रस्त्याने चालायला सुरुवात केली होती.साथीला टॉर्च होतीचं तिचं नाव ठेवलं होत *प्रकाश गाईड*. अंधारात चढ वाटेवरील दगड धोंडे,कडेनें वळलेलं गवत अन अनेक वस्तू दिसतात.कानिफनाथ गडाची चढ वाट साधारण सहा किलोमीटर असावी.थंड तशी शुद्ध हवा वातावरणात होती.पाय चढाकडे गती वाढवत चालत होते.एवढ्या मोठया डोंगर रस्त्याला पहाटे सर्वत्र सामसूम होतं.आम्ही जिद्दीने चालत होतो.

           वेडीवाकडा नागमोडी चढ आमच्या श्वासांची गती वाढवत होता.डोंगरावर वर वर चढतांना थंडगार हवा आपल्याचं नादात वाहात होती. अंगलट येत होती. प्रेमिकेसारखी प्रेमाराधना करीत होती.पण ऊबदार कुठे अन सुळसुळ थंड कुठे!टॉर्चच्या उजेडाचं एक चांगलं असतं.टॉर्च जिकडे फिरेल तिथेच उजेड दिसतो. अन्यथा सर्वत्र अंधार असतो.टॉर्चच्या अस्पष्ट उजेडातून आमची चढाई सुरु होती.मोजके काहीजण होतो. चालतांना मध्येचं दम लागत होता. अंधारात एकमेकांशी बोलून साथसंगत करीत होतो.अंधारात आजूबाजूला थोडी जरी सळसळ ऐकायला आली तरी सतर्क होतो. कानिफनाथ मोहीम तंदुरुस्तीची चावी असली तरी जोखीमपूर्ण आहे. आत्मविश्वास साथीला असला की भीती वाटत नसते.मुळात मनुष्यजन्म आव्हाने पेलण्यासाठी झाला आहे.सत्कारणी आव्हाने टीमटीमणारा दिवा असतो.यशस्वी होण्यासाठी खारुताई देखील होतो.

           वेडीवाकडी वळणे पार करीत आम्ही उंच भुईसफाट वाटेवर चालत होतो. गार वारा सुटला होता.आधी थंडी अंगाशी लागटपणा करीत होती आता थंडगार वारा नाचवत होता. पूर्वेला उंच टेकडावर प्रकाश दिसत होता. कानिफनाथ मंदिरातील तो प्रकाश आम्हाला जणू खाणाखुणा करून बोलवत होता.सकाळचे ०६वाजले होते.तरी रात्र पांघरून काढायला तयार नव्हती.हळूहळू चढ चढून कानिफनाथ महाराजांच्या पहिल्या पायरीवर पोहचलो तसं श्रद्धेनें डोकं ठेवून एकेक पायरी चढून श्रद्धा समाधीपाशी जाऊन पोहचलो होतो. श्रीकानिफनाथांच्यां श्रद्धा गाभाऱ्यात एकचित्त होऊन काहीवेळ भक्तीतं एकरूप होत हृदय भिजवत राहिलो. आत्मिक सुखाचा आनंद वेगळाच असतो.पूर्वेच्या तांबूस प्रकाशात आनंदानुभ घेत होतो. चालण्याचं परिश्रम आनंदानुभूती देऊन गेली होती. मनाच्या घोड्यावर बसून हृदय जिंकलं होत. आत्मिक, शारीरिक आनंद कष्टाशिवाय मिळत नसतो. आम्ही थंडी,गार वाऱ्याला सहन करीत,श्रम घेत श्रीकानिफनाथांचं दर्शन घेत होतो.भक्त अन ईश्वर एकरूप झालो होतो. 🚩
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
*****************************
.... नानाभाऊ माळी 
हडपसर, पुणे -४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१३ जानेवारी २०२६
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol