कानिफनाथ ट्रेक कष्टाचा देव (भाग -३२)
*कानिफनाथ ट्रेक कष्टाचा देव*
(ठिकाण तेचं अनुभूती वेगळी)
(भाग-३२)
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
***************************
... नानाभाऊ माळी
पहाटेचा ऊबदार गारवा अंगावर घेत आज दिनांक ०४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ५-१५ वाजता, आम्ही कानिफनाथ गडावर चढाईला सुरुवात केली होती!काल पौर्णिमा होती.आज चंद्रदेव शितलतेचां दुग्धप्रकाश घेऊन,ढगांच्या पातळ जाळीदार कापडातून, आकाशात वर येतांना दिसत होता. हिवाळा असूनही आकाशात चांदण्या झोपी गेलेल्या दिसत होत्या.ढगांच्यां मलमलं चादरीत चांदण्या झोपी गेल्या असाव्यात.पहाटेच्या खडकाळ, घसरलेल्या दगडं गोटयांच्या अंधाऱ्या रस्त्यावर आमची चढाई सुरु होती. कोणीतरी अफवेचीं गती वाढवली होती,'बिबट्या जंगलातून गावं, शहरात, मानवी वस्तीत हिंडतो आहे!' बिबट्याचं नाव अन दृष्य डोळ्यासमोर आल्यावर थंडीतही घाम फुटावा असं होतं. आम्ही टॉर्चच्या उजेडात एक एक पावलं पुढे टाकत होतो. टॉर्चचा उजेड सोडला तर सर्वत्र अंधार दिसत होता.आकाशी ढगांनी चंद्राला घेरलं होतं.तो सुद्धा ढगांना ढुश्या मारीत प्रकाश देण्याच्या प्रयत्नात होता.पण त्याची शक्ती कमी पडत होती.🚩
आनंदाची गोष्ट म्हणजे ट्रेक रस्त्याच्या दोन्ही बाजूला खुरटी झाडं उभी दिसत होती. सुकलेलं सुष्क गवत दिसत होतं.काही ठिकाणी कडे कडेने रस्ता रुंदीकरणाच्या प्रयत्नात डोंगर फोडलेला दिसत होता.दगडं अन माती ढिगारा होऊन दर्शन देत होते. या सगळ्या जमेच्या बाबी होत्या म्हणून की काय अनेक ससे ट्रेक रस्ता इकडे तिकडे ओलांडून पळतांना दिसतं होते.टॉर्चच्या उजेडातून भुर्रकण झाडा झूडपात पळत होते. आम्ही सशांचा तो खेळ ट्रेक रस्त्यावर चालतांना पाहात होतो.आमची बिबट्याची भीती कमी झाली होती. ''बिबटे सशांवर आपलं पोट भरत असतील.आपल्यावर कुठं येतायेत अंगावर!" आम्हाला मानसिक बळ तरी आलं होतं.🚩
हिवाळा असल्याने सूर्यदेव गारठ्यात उठत नसावा.आम्ही चालतांना पूर्व दिशेकडे नजर लावून पाहात होतो. सूर्यदेव तर जाऊ द्या पण चंद्रदेव मस्त मजेत आकाशी ढगांच्या आडून प्रवासाला निघाला होता.प्रवास कुणाचाही असो विषयभांडार संगतीला घेऊन सुरु असतो. आमच्या सोबतीला अंधार होता.पावलं कानिफनाथ गडाकडे पळत होती.चालल्याने ग्रुप देखील मागे पुढे विभागला गेला होता.
अंधाऱ्या छटातून दुरून प्रकाशराईतील उंच डोंगरावर कानिफनाथ मंदिर अस्पष्ट दिसत होतं.शुद्ध प्राणवायुच्या श्वासासंगे आम्ही उत्साह घेऊन चालत होतो. मध्येच काही भू भाग सपाटीचा आला होता.चालण्याची गती वाढली होती.सकाळचे सहा वाजत होते.धुकं अन ढगांच्या दाटीवाटीतं उजेड अजूनही नजरेच्या टप्प्यापासून दूरचं होता.अंगावर थंडी घेत झाडं देखील सळसळ नव्हते.जंगल पार करून शेवटच्या टप्प्यावर होतो.कानिफनाथ मंदिरातील प्रकाश स्पष्ट दिसत होता.आमचा उत्साह दुनावला होता. चालून चालून शेवटी पायऱ्यांवर पहिलं पाऊल ठेवलं.वाकून नमस्कार केला.एक एक उंच पायऱ्या चढत होतो.दम लागला होता.देवदर्शन कष्टातून होत असतं. आम्ही बरोबर सहा वाजता मंदिरात पोहचलो. भाग्य थोर होतं आरतीला नुकताचं प्रारंभ झाला होता.श्रद्धा फळाला आली होती.साक्षात कानिफनाथांच्यां समाधी मंदिरात छोट्याशा चौकोनी प्रवेशद्वारातून अंग घासत सरपटी प्रवेशीत झालो होतो.समाधी गर्भगृहात शांतता होती.एकावेळेस फक्त चारपाच व्यक्तींना बसायला जागा आहे.आम्ही मौनव्रतातून दर्शन घेतलं.सरपटी झोपत डोकं समाधी मंदिराकडे तर पाय बाहेर चौकोनातून सरकवत गर्भगृहातून बाहेर आलो. मन शांत झालं होतं.दर्शन आत्म्याने परमात्म्याचं केलं होतं.सकाळच्या प्रसन्न समयी सभोवती अजूनही अंधारलेलं होतं. आम्ही प्रसाद घेऊन पायऱ्या उतरून खाली आलो अन काहीवेळ बसून परतीच्या मार्गाला लागलो होतो.उजेडाला जाग आली होती.पूर्वेचा सूर्यदेव धुक्याआड बसला होता. दर्शन देण्यास उशीर करीत होता.आम्ही परतीच्या प्रवासात कानिफनाथ गड उतरत असतांना अर्ध्या तासांनी मागे वळून पाहिले असता ढगाआडून सूर्य किरणांनी आमच्याकडे दृष्टिक्षेप टाकला होता.आठ वाजले होते.आम्ही सकाळच्या सुंदर, कोवळ्या, आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेत होतो. सकाळी लवकर उठणारा भाग्यशाली असतो. आम्ही भाग्य वाटून घेत होतो.🚩
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे -४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०४ जानेवारी २०२६
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment