भुलेश्वर ते बनेश्वर व्हाया बालाजी दर्शन

*भुलेश्वर ते बनेश्वर व्हाया बालाजी दर्शन*
                  (भाग-०३)
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी 

       आज ३१ डिसेंबर इंग्रजी कालमान प्रमाणे वर्षाचा शेवटचा दिवस. ही भौतिक बाब झाली.उद्या  ०१ जानेवारी २०२६ चं आगमन नव्या सूर्योदयाने होईल. मागील १२ महिने कशी निघून गेलीत.अनेक घटना,आठवणींचा २०२५ साल हळूहळू मागे गेलं. आज मागील वर्षाचं मूल्यमापन करायचा दिवस. चांगलं ते घेऊन वाईट सोडून देत उद्या नव वर्षात पदार्पण करणार आहोत. आम्ही देखील वयाने जेष्ठ मंडळी  भूत,वर्तमान अन भविष्याच्या वाटचालीतील सहकारी आहोत. आम्ही देवयात्रा दर्शनासाठी गेलो होतो त्याविषयी काही🙏....


             श्रद्धा माणसाच्या जीवनात आशेचा किरण असतो.जगण्यासाठी उमेदीची शिदोरी असते.ती वेळेवर शिदोरी उघडावी,मनसोक्त आस्थेशी हितगुज करावं.आपलं सुख-दुःख मांडत बसावं.कधी आस्थेवर डोकं ठेवून मनसोक्त रडून घ्यावं.बोलून घ्यावं. मन हलकं करावं.दुःख हलकं करावं.कधी सुखात श्रद्धेशी एकरूप होऊन जावं.आनंदातं कान्हा होऊन नाचावं.प्रफुल्लित व्हावं.सुख-दुःखाचीं अशी ही फोडणी सतत देत राहिल्यानें आपलं जीवन हलकं फुलकं होत राहतं.लोणी घुसळावं तसं होत राहतं.तूप काढावं. ताक काढावं. दही काढावी. बेरी काढावी. भिन्न भिन्न अस्तित्व ठेवून जावावं.जीवन चढ-उताराची मालिका असते. ती सतत सुरु राहते.जगणं निरसवरुन स्वादिष्ट चवदार होऊ लागतं.प्रत्येक दिवसाला बदल घडत असतो.आपण बदलाचे साक्षीदार व्हायचं असतं.मुख दर्शक व्हायचं. शेवटी काय तर जीवन परिवर्तनशील असतं.असणे -नसणेचा हिशोब इतर करीत असतात. कधी त्रयस्त राहायचं तरी कधी समरसून जायचं.श्रद्धा हेचं सांगत असते. अध्यात्माचा पाया सुख दुःखाने रचला जातो.माणूस त्यात गुरफटून जातो.काळ चालत राहतो.🚩

               आयुष्य वयोमानाप्रमाणे संध्याकाळ होण्याची वाट पाहू लागतं. हा संसारगुंता आपल्या आयुष्याला चिकटतो.सुटता सुटत नाही.आपण कंटाळतो तरीही सुटत नाही. तेव्हा आपण श्रद्धेच्या द्वारी जातो.कधी द्विधा मनस्थितीतून जात असतो.कधी मनाचां मनाशी चाललेला गुंता सुटता सुटत नाही.कोंडमारा होत राहतो.आयुष्याचं,जगण्याचं कारण हळूहळू कळायला लागतं.मग उताराला लागलेलं आयुष्य श्रद्धाचरणी अर्पण करीत श्रद्धेशी एकरूप व्हायचं.हींचं मानवी जीवनाचीं उकल तर नाही ना?निर्मात्याने श्रद्धेचीं निर्मिती मानवी मनाची गुंथी सोडविण्यासाठीचं केली असावी.हिचं देव नावाची संकल्पना तर नाही ना?मन तेथे स्थिर-शांत होतं जातं.आपल्या जन्माचं कोडं उलगडू लागतं.आम्ही दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी मनातलं कोडं घेऊन देवयात्रेला गेलो होतो!......🚩

               आम्ही यात्रेकरू होऊन एक एक श्रद्धास्थळाच दर्शन घेत होतो. देवाला हृदयात उतरवतं होतो.एक एक देवदर्शन करून पुढे वाटचाल सुरु होती.सासवडमध्ये श्रीसंगमेश्वराचं दर्शन घेऊन नारायणपूर रस्त्यावर असलेल्या श्रीचांगावटेश्वर मंदिरात गेलो होतो.अतिप्राचीन श्रीमहादेव मंदिर पाहून तत्कालीन आधुनिकतेचा कयास लावत उभा होतो.आश्चर्य म्हणजे प्राचीन काळी अशी कुठली संसाधन असतील मंदिर बांधकामासाठी? काळ्यापाषाणातील कोरीव काम म्हणजे वास्तुकलेंतील सर्वांग सुंदर निर्मिती होती.अतिभव्य अखंड दगडातून साकारलेलं मंदिर अन त्याचा कळस पाहून आश्चर्य वाटायला होत होतं.अप्रतिमतेचा आगळा वेगळा नमुना विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहात होतो.विस्मयाला नतमस्तक होत मान खाली घालून, डोकं ठेवून,महादेवाचं दर्शन घेतलं.
दर्शनाचं समाधान वेगळंच होतं.येथून पुढे श्रीक्षेत्र नारायणपूर गेलो. तेथे एकमुखी दत्ताचं दर्शन घेतलं.सद्गुरू श्री.नारायण महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं.मी ३० वर्षांपूर्वी साक्षात सद्गुरूंच्या हातातील काठीचां प्रसाद पाठीवर बसली होती.तोचं प्रसाद होता.मंदिर विलोभनीय अन शांत एकांत होतं.भाविक रांगेने दर्शन घेत होते. त्याला लागूनच प्राचीन महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.अन पुढे निघालो.🚩

            आमची बस केतकावळेतील श्रीबालाजीला निघाली होती.झाडांनी वेढलेला घाट नागमोडी वळणं घेत उताराला लागला होता.हिवाळ्यात प्रसन्न हवेच्या हलक्या गारव्याने उत्साहवर्धक वातावरणात आम्ही श्रीबालाजी देव दर्शनाला निघालो होतो.याचं महिन्यात मी दूर दूर १००० किलोमीटर दूरवरील श्रीतिरुपती बालाजीला जाऊन आलो होतो. केतकावळ्यातील बालाजी दर्शन भाग्यात होतं.नेमकें त्याचं मार्गावर आमची धावत होती.घाट संपला होता.लांबवर श्रीबालाजीचं मंदिर दिसत होतं.तीन आठवड्या पूर्वी श्रीतिरुपती बालाजी दर्शन घेऊन आलो होतो.त्याचंच प्रतिरूप होतं. दूरवर सह्याद्रीच्या डोंगर रांगा दिसत होत्या.मंदिरात आत जाऊन श्रीबालाजी दर्शन घेत होतो. 'गोविंदा... गोविंदा' म्हणून श्रीहरी विष्णू देवाचा सात्विक भक्तीभावाने नाम घेत होतो. गोविंदाचां पुकारा ती तल्लीनता तशीच हृदयी उतरत होती. श्रीबालाजीच मनोहरी रूप डोळ्यातून आत उतरवत होतो. भक्तीचा आनंद अलौकिक असतो. आमची प्रांजळ प्रार्थना जणू देवाने ऐकली असावी. आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो होतो.🚩

देवासाठी प्रवासी झालो
तूझ्या निरंतर सेवेत आलो!🚩

दर्शन झाले देवा आता...
तूझ्या आशिर्वादातं नाहालो!🚩
 
राहिली ना आसं कसली
तूझ्या चरणाचा दास झालो!🚩 

नको हा श्वास देवा मज 
बैरागी होऊनि नाचत आलो!🚩

            श्रीबालाजीचीं अपार महिमा हृदयन्तरी ठेवून पुढे सातारा-कात्रज महामार्गांवरींल भक्तीधाम श्रीबनेश्वरला निघालो होतो.संपूर्ण परिसर गर्द झाडांनी वेढलेला दिसला. मोठी बाग दिसली.नदीच्या खोल धबधब्यापाशी काठावर श्रीबनेश्वर महादेवाचं प्राचीन मंदिर जणू भक्तांच्या अतूट भक्तीसाठीचं उघडून ठेवलेलं होतं. मंदिर प्रवेशातच खोलवर गायमुख दिसलं.तेथून पाण्याचा अखंड झरा वाहात होता. श्रीबनेश्वरच्या पवित्र मंदिरी आमचं मन देखील पवित्र स्पर्श करीत राहिले.

देव प्रवासी झालो आम्ही 
देवांतरी हळूच गेलो....🚩

भक्तीचा रें अखंड स्रोत 
स्पर्शाने आज पवित्र झालो!🚩 

श्रीमहादेव म्हणती तुजला 
अमृत प्याला कंठी प्यालो!🚩

          देवाधी देव महादेवाचं दर्शन घेऊन, भक्तीचा ढेकर देत,तृप्तीचा आनंद घेत आम्ही मावळतीच्या संध्याप्रकाशात  पुण्याला परतीच्या प्रवासाला लागलो होतो. बस कात्रजकडे निघाली होती. खिडकीतून गारवा आत घुस्कोरी करू पाहात होता.आम्ही भक्तजन श्री महादेवाच्या भिन्न नावात स्वतःस अर्पण करीत राहिलो.🚩

              आमची बस कात्रज घाट पार करून कोंढवा रस्त्यावर गर्दीचा महापूर सांभाळून हळहळू मार्गक्रमण करीत होती. सर्व भक्तांच्या आग्रहाखातर आमचे आयोजक श्री. देवघरे सरांनी हळूच कोंढवा येथील इस्कॉन मंदिराकडे वळवली.आम्ही मंदिरात प्रवेश करीत असतांना नेमकी आरती सुरु होती. रात्रीचे ८-३० वाजले होते. देव जवळ असावा अन आपण लांबवर त्याला शोधित भटकतं राहावं अशी अवस्था इस्कॉन मंदिरात गेल्यावर झाली होती. अतिशय भव्यदिव्य मंदिर पाहून भक्तीत डुबकी लावल्यासारखे वाटत होत.मी पहिल्यांदाचं इस्कॉन मंदिरात आलो होतो. बाहेर पडावं असं वाटत नव्हतं. सकाळी ०६ वाजता आमच्या प्रवासाला सुरवात झाली होती. रात्रीचे ०८ वाजले होते तरी मंदिराबाहेर पडावंसं वाटत नव्हतं.तेथील भक्तिमय वातावरण आमचा थकवा हरण करून घेत होता. इस्कॉन मंदिरातील श्रीकृष्णाचें सचित्र रूपं मनात देवत्व ओतीत होत.आम्ही भक्तीआनंद घेत देवरुप हृदयात घेऊन हडपसरकडे निघालो होतो.🚩

              अखिल भारतीय योग संस्थानचें आम्ही सदस्य महादेवाकडून पुण्याशिर्वाद घेत घरी पोहचलो. देव म्हणजे तरी काय.... माणसामाणसातील सद्गुण घेत इतरांच्या कल्याणा स्वतःस झोकून वाकून जाणे. चांगले देत देत समोरच्याकडील चांगले गूण घेत जीवनाणंद मिळविणे हाचं खरा धर्म. हेचं देवपण आम्ही २३डिसेंबर २०२५ च्या शुभदिनी अनुभवत राहिलो. श्रीभुलेश्वर ते श्रीबनेश्वर व्हाया बालाजी अन इस्कॉन मंदिर स्मृतिपटलावर चिरकाल राहील अशी अविस्मरणीय देवयात्रा पार पडली.
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
***************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६६००
दिनांक-३१ डिसेंबर २०२५
(सन २०२५ला निरोप देतांना)
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol