भुलेश्वर ते बनेश्वर व्हाया बालाजी

*भुलेश्वर ते बनेश्वर व्हाया बालाजी*
          ( भाग-०२)
💐💐🚩🚩🙏🚩🚩💐💐
****************************
... नानाभाऊ माळी

              कर्तव्यासाठी दूरदूर फिरणे, प्रवास करणे,माणसाच्या जीवनाचां महत्वपूर्ण भाग समजला जातो.प्रवास करतांना थकवा येत असतो.यात्रा करतांना अंगात कुठला जोश,उत्साह असतो बरं? आपण नेहमीचं एका गावाहून दुसऱ्या गावाला जात-येत असतो.प्रवास करीत असतो.आपण प्रवासानंतर सहज बोलून जातो,' थकलो राव,पुढे प्रवास नको आता!' पण यात्रा करतांना डोळ्यात चमक असते,तेज असतं.मनात कुठली ओढ असते बरं?कुठली आसक्ती असते बरं? आपलं काळीज सहज आतून सांगत असतं,'देव दर्शनाला आलो आहे.सगळं तोचं पाहिलं!सगळं व्यवस्थित होईल!'देवाच्या अंगावर भार टाकून मोकळे होतो.ही देवाविषयीं असलेली दृढ भक्ती! नितांत आसक्ती!ओढ असते!देव भेटीच्या व्याकुळतेची ओढ असते!देवाचं दर्शन होणारं असतं.आपल्या मुखातून चांगलं तेचं बाहेर पडत असतं.चालता बोलता मुखातून देवामृत पाझरत असतं. 🚩

          श्रद्धेचां ओढा माणसाला ओढत असतो.श्रम, कष्ट, थकवा असे निरर्थक नकोशा गोष्टी आपल्या जवळ येण्यास उत्सुक नसतात.पाय अन मन देव दर्शनासाठी ओढत असतात.देह देव दर्शनासाठी पळत असतो.भक्तीची शक्ती स्वार्थ,लोभ विसरायला लावते.आम्ही योगा ग्रुपचे सदस्य सर्वचं वयाने साठीपार आहोत. आम्ही एकाच दिवसात एका छोट्या बसने,२० सीटर बसने देवाचं मॅरेथॉन दर्शन घेतलं.होय,बुधवार दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी श्रीहरी विठ्ठलाचा शुभ दिवस-वार होता. आम्ही श्रीमहादेव दर्शनाला निघालो होतो. श्रीभुलेश्वर, श्रीवीर श्रीम्हस्कोबा-वीर,श्रीकाळभैरवनाथ-परिंचे, श्रीनागेश्वर- सासवड, श्री सोपानदेव काका समाधी - सासवड, श्रीसंगमेश्वर- सासवड, श्रीचांगवटेंश्वर- सासवड,श्री क्षेत्र नारायणपूर, श्रीबालाजी-केतकावळे, श्रीबनेश्वर अन कोंढवा येथील इस्कॉन मंदिर. अशा या देवदर्शन यात्रा सहलीला गेलो होतो.सकाळी सहा वाजता घरून निघालो अन रात्री साडेनऊ वाजता देवानंदी प्रसाद देहांतरी घेऊन प्रसन्न मनाने घरी पोहचलो होतो.एका दिवसात ही दर्शन यात्रा अत्यंत आनंदी, उत्साही,श्रद्धाळू अन सुखावह अशी झाली.🚩

              आम्ही सकाळी ०७ वाजता थंडीला अंगावर पांघरून, सूर्यदेवाच्या उगवत्या सोनेरी किरणांच्या साक्षीने, प्रत्यक्षात आरती घेत श्रीभुलेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं होतं!तेथून वीर येथील वीर धरण पाहून तेथेचं असलेल्या प्राचीन श्रीम्हस्कोबाचं पांडवकालीन मंदिराचं दर्शन घेतलं. अंगात जोश होता उर्मी अन उमेदीचा. देव दर्शनाचा मोह नेहमीचं लाभदायी असतो.मन शांतीच भांडार देवाकडून मागत असतो. श्रीकालभैरवनाथांकडे मन शांतीचं औषधी आशीर्वाद घेत मंदिराबाहेर पडलो होतो.🚩

           श्रीकालभैरवनाथाचं दर्शन झाल्यावर बसमध्ये येऊन बसलो होतो.पोटाच्या भुकेने आतूनच पोट बडवायला सुरवात केली होती. नाश्त्याची वेळ झाली होती.आमची बस सासवडच्या दिशेने निघाली होती.वीर, परिंचे ते सासवड दरम्यान साधारण २५ किलोमीटर अंतर असावं.शेतंपिकांनी हिरवी साडी नेसली होती.बस सासवडच्या दिशेने पळत होती.डोंगरांनी वेढलेला घाटमाथा नजरेस पडत होता. पावसाळ्यात हिरवगार दिसणारा डोंगरमाथा आता कोरड्या सुष्क कुसळ गवताने अन खुरट्या झाडांनी नटलेला दिसत होता.आम्ही सासवडला पोहचून नाष्टा आटोपला. सासवड अध्यात्मिक, साहित्यिक, ऐतिहासिक अन राजकीय  शहर म्हणून नावाजलेले आहे.कऱ्हा नदीकाठी असलेल्या संतश्रेष्ठ सोपानदेव काकांच्या समाधीस्थळी जाऊन माथा टेकवला. तेथेच श्रीनागेश्वरांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.मंदिर मन शांतीचं शाश्वत स्थळ असतं.काही वेळ एकचित्ती बसलो होतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे लहान बंधुच्या समाधीवर डोकं ठेवून आशीर्वाद घेतलेत.🚩

                      सासवडमध्ये दोन नद्याच्यां संगमावर प्राचीन यादव, चालुक्य कालीन श्रीसंगमेश्वर महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.काळ्या पाषाणातील प्राचीन हेमांडपंथी मंदिर वास्तुकलेचा अद्भुत,अविश्वनीय स्वर्गाविष्कार नमुना नजरेत भरतो. ज्या वास्तू शिल्पकारांनी दगडातून हे सुंदर मंदिर साकारलें अशा अनाम निर्मात्यांनां शत शत नमन करतो. मंदिराच्या पायापासून आतून गाभारा अन बाहेरील अतिशय सुरेख कलाकूसरतेने दगडातून स्वर्गीय मंदिर साकारले आहे.दगडाला कुठल्या हत्यारांनी उत्तम आकार दिला असेल बरं? आश्चर्य वाटावं असंच श्री संगमेश्वर महादेव मंदिर आहे.त्यातील लहान मोठी मोजमाप पाहिले असता विस्मयाने आश्चर्य वाटायला होतं. कळसावर एक एक दगडं रचून त्यावरील कोरीव नक्षीकाम डोळ्यांचीं तृप्तता पूर्ण करू लागतं.त्यात भक्तीरस ओतून सश्रद्धेकडे श्रद्धाळू ओढला जातो.गाभाऱ्यातील पिंडीवर डोकं ठेवून एकांती मनःशांतीच स्वर्गीय आनंद आपण घेऊ शकतो. आत्मातृप्तीचां आत्मानुभव घेऊन श्रीसंगमेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन बाहेर पडलो.🚩
(लेख अपूर्ण भाग-०३मध्ये पाहू)

🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-३० डिसेंबर २०२५
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol