तिरुपती बालाजी दर्शन(देव गाभाऱ्यात उभा )

*तिरुपती बालाजी दर्शन*
    (*देव गाभाऱ्यात उभा*)
             (भाग -०४)
    💐💐🌹🙏🌹💐💐
***********************
... नानाभाऊ माळी 

          जीवनात प्लॅनिंग,नियोजन अतिशय महत्वाचं असतं. प्रत्येक गोष्टीत उत्तम नियोजन असल्यासं रिझल्ट उत्तम मिळत असतो.थोडंसं दुर्लक्ष देखील कष्टमय परिणाम देत असतात.आपण घरून यात्रेला, तीर्थस्थानाला,लांबच्या प्रवासाला जातो.निघाल्यापासून परत येईपर्यंतचं नियोजन केलेलं असतं.  कुठेही त्रास होणार नाही याची काळजी घेतो. कुठे थांबायचं?पुढील प्रवास कसा याची जानकरांकडून किंवा माहिती काढून करून घेतल्यावर त्रास कमी होतो.कधी अति आत्मविश्वास देखील त्रासदायक ठरू शकतो.त्या भागाची माहिती नसेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचं साह्य घेऊ शकतो. सोबत काय काय वस्तू असावी. कुठली नसावी, सारासार विचार करून नवख्या ठिकाणी जाणं योग्य असतं.

           आम्ही तिरुपती बालाजीला ६ डिसेंबर २०२५ रोजी पुण्याहून रेल्वेने गेलो होतो. देव दर्शन झालं.श्रद्धा देवचरणी वाहून आलो. पण आम्ही नवख्या ठिकाणी नवखे यात्रीकरू गेलो होतो.देवदर्शन झाले पण अपूर्ण माहितीमुळे मानसिक अन शारीरिक त्रास झाला होता.देवदर्शन, यात्रा आपल्या जीवनाचे सार असतात. भक्तीत स्वतःस वाहून घेतांना सहज दर्शनाची तरी का अपेक्षा करावी?मनुष्य स्वतःच्या आर्थिक प्रगतीसोबत मन शांतीचा मार्ग शोधू लागतो. सकारात्मक बदल शोधू लागतो.मन कुठेतरी भरकटलेलं असतं. एकचित्ताचां शोध सुरु राहतो. एकांतवास शोधित असतो. ताणतणाव हलका व्हावा म्हणून श्रद्धारुपी देव गाभाऱ्यात मनाच्या शांतीऔषधासाठी जाऊन माथा टेकवत असतो.आम्ही साधारण १००० किलोमीटर लांब तिरुपती बालाजीला गेलो होतो!अनेकजन होतो.....

               आम्ही दोघे श्रीबालाजीचं दर्शन घेऊन बाहेर आलो होतो.रात्रीचे ९-३० वाजले होते.हिवाळ्याची थंडी अंगावर नाचत होती.आम्ही कुडकूडत होतो.सोबत आमची नात 'ओवी' होती.ती थंडीत कुडकूडत होती.'आई जवळ न्या!आई जवळ न्या!' रडून रडून सांगत होती.तिचे आई-पप्पा दुसऱ्या ग्रुपमध्ये होते.त्यांच्यासोबत अवघं ११ महिन्याचा लहानसं छोटंसं बाळ होतं.त्यांची काय परिस्थिती असेल? यामुळे मनाची विचित्र अवस्था झाली होती.तर इकडे आमचा लहान नातू 'श्री' आमच्या मागे येतांना मोबाईल जमा करण्याच्या गडबडीत कुठेतरी त्याच्या आजी सोबतचं मागे राहिले होते. आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो अन प्रसादाच्या, लाडूंच्या रांगेत उभे राहिलो होतो.सर्वचं चार तें पाच ग्रुपमध्ये विभागले गेलो होतो. संपर्कासाठी मोबाईल देखील नव्हता.प्रसादलाडू घेऊन आम्ही दोघे जन अन ओवीसोबत महाप्रसाद हॉलमध्ये जाऊन रात्रीचं घेतलं.जेवण करून पुन्हा कोणी दिसतंय का दर्शन रांगेकडे डोळे ताणून ताणून पाहात, रात्रीचं कुडकूडत विनाचप्पल उभे होतो. आपलं कोणी दिसत नसल्याचं पाहून आम्ही आपले चप्पल कुठे ठेवले तिकडे गेलो होतो.पण भुलभूलैया झाल्यासारखे तिथंच फिरत होतो. जेवणाचा हॉल कुठला, चप्पल कुठे काढली देवर्शन रांग असं सगळं तिथल्या तिथे फिरत होतो. ओवीला खांद्यावर घेऊन हिंडत होतो. पायात चप्पल नव्हती. आपण कोणाला विचारलं तर तें तेलगू -तामिळ शिवाय बोलत नव्हते. स्वतः तेथील पोलीस देखील त्यांच्याचं भाषेत बोलत होता.आम्ही चालून चालून थकलो अन मंदिराच्या आवाराबाहेरील रस्त्यावर आलो. एक इलेक्ट्रिक बस भेटली त्यात बसलो अन PS-5 या व्यंकटेश निलायम या यात्री भावनात पोहचलो.याचं ठिकाणी सर्व येतील असं समजून गेलो होतो. रात्रीचे १०-३० वाजले होते. पायात चप्पल नव्हते. सोबत मोबाईल नव्हते. लॉकरचीं चावी आमच्या मागे राहिलेल्यांकडे होती. आम्ही हॉलमध्ये एका बाकड्यावर जाऊन बसलो अन ओवीला मांडीवर झोपवून सर्वांची वाट पाहात बसलो होतो.

           मागे राहिलेलें चार-पाच ग्रुप उशिरा पोहचले होते.दर्शन रांगेत ७-८ तास उभे राहून श्रीव्यंकटेशाचं दर्शन झालं होतं.कोणी रात्री १२-३० तर कोणी रात्री ०२ वाजेपर्यंत यात्री भावनात पोहचले होते.थंडीने सर्वचं गारठले होते.देवदर्शन परीक्षा असते. महादिव्य असतं.दिव्यानुभतीचा योग जुळून येत असतो. जसं परीक्षा दिल्याशिवाय आपण उत्तीर्ण होऊन वरच्या वर्गात जात नसतो,देवदर्शन तसंच असतं.श्रद्धास्थळ प्रचंड अनुभव देऊन जात असतात.त्यातून माणसं जोडली जातात.देव म्हणजे तरी काय? जिथे अढळ आस्था असते!आपण आस्थेला शरण गेल्यावर निसर्गाच्या अतिविशाल रूपाचं दर्शन घेत असतो. दर्शन चमत्कार असतो.आम्ही सर्व दर्शनार्थी मनोभावे त्या विशालतेला शरण गेलो होतो.प्रचंड गर्दीतून कुठलीही माहिती नसतांना देव दर्शन करून एक एक ग्रुप,बरोबर एकाचं ठिकाणी जागेवर येऊन पोहचलो होतो.हा अनाकलनीय प्रवास भक्तीतून श्रद्धा बळकट करीत असतो.प्रवास सुख दुःखाचा आलेख असतो.यात्रा अनुभवांची जननी असते.यात्रा दैवत्वाचीं ओळख असते.यात्रा करून जो घरी पोहचतो त्याची पूजा केली जात असते. चार धाम यात्रा अशीच असते. शरीर-मनाच्या महापरीक्षेतून व्यक्ती यात्रेकरू होतो.सर्व कठीण तें सहन करण्याचं आत्मबळ यात्रा अनुभवातून मिळत असतं.म्हणूनचं इतर म्हणतात,' हे दूर दूर देव दर्शनाला जाऊन आलेत.यांची पूजा करूया!' आपले पाय धुवून पूजा बांधली जाते. आपल्याला सत्कर्माचं सद्गुनात्मक फळ मिळत असतं. या अतिविशाल, अनाकलनीय विश्वास देव मानून पूजन्याचं कारण तेचं असावं. देव अशाचं ठिकाणी विसाव्याला थांबलेला असतो. 

           आम्ही प्रचंड गर्दीत,अतिशय विपरीत, परिस्थितीतं लाखों भक्तांच्या साक्षीने एक मुखी भक्ती हाकेतून, साधनेतून देवाचा 'गोविंदा!...गोविंदा!' म्हणून पुकारा करीत राहिलो.देवाचीं ओळख करीत राहिलो.देवाचं देवपणात मनाने एकरूप होत राहिलो.हेचं तर देवाचं रूप आहे.आपण त्याचा शोध घेत हिंडत आहोत.आपण दर्शनासाठी उतावीळ होतो.तो ही भक्तांनां कुशीत घेण्यासाठी आतुर असतो.देव देव्हाऱ्यातून बाहेर येत भक्तांना अंगा खांद्यावर घेत आत्मतत्व परतत्वात एकजीव होऊन भक्तीआनंदात नाचू लागतो.काय चमत्कार आहे हा? हेचं तर नाही मानवी जन्माचं गुपित? आनंद देत,आनंद घेत सार सार साधून घ्यायचं.देव हृदयी बसवून माणसातं माणूसपण पाहात जगत राहायचं.'गोविंदा.. गोविंदा!🌹
💐💐🌹🙏🌹💐💐
************************
...नानाभाऊ माळी 
हडपसर, पुणे -४११०२८
मो.नं -९९२३०७६५००
दिनांक -२४ डिसेंबर २०२५
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol