तिरुपती बालाजी दर्शन.. देव गाभाऱ्यात उभा
*तिरुपती बालाजी दर्शन*
(*देव गाभाऱ्यात उभा*)
(भाग -०३)
🌹🌹💐🙏💐🌹🌹
***********************
...नानाभाऊ माळी
एखादं लहान मुलं यात्रेत हरवावं!आई वडील मुलासाठी सैर भैर होतात.तें मूल देखील गर्दीच्या महापुरात आपलं कोणी दिसत नसल्याने हमसून हमसून रडून कुठंतरी एका जागी बसून आपल्या माणसांच्या भेटीसाठी कासावीस झालेलं असतं. आपलं कोणी भेटत नाही. इतर ओळखीचे दिसत नाहीत.मलूल झालेल्या चेहऱ्याने कोपऱ्यात बसलेलं तें मूल हंबरडा फोडून फोडून थकतं. कुठेतरी देव नामाचा चमत्कार आशेला उभा असतो.अशा पल्लवीत होत असते!आम्ही तिरुपती बालाजीला गेलो होतो.लहान मोठे एकूण ५४ जन होतो.देव दर्शनाला गेलो. दर्शन रांगेतून चालतांना मोबाईल सोबत नेल्यामुळे भक्तांच्या महापुरात मोबाईल जमा करण्याच्या नादात, गर्दीच्या रेट्यात सर्व मागे पुढे झालो होतो.दर्शन रांगेत पाण्याचा प्रचंड लोंढा सुटावा तसें श्रद्धाळू पुढे ढकलतं चालत होती.साक्षात्कारी परमेश्वर भक्तांचा पालनहार असतो.
५४ व्यक्ती दर्शनार्थी होतो. काहींच्या हाती जेष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलत पास होती,त्यात आम्ही ०४ व्यक्ती होतो. पण जेष्ठ नागरिकांसाठी दिलेली वेळ दुपारी एक वाजेची होती. आम्ही संध्याकाळी ०५ ला दर्शन रांगेत प्रवेशासाठी गेल्यावर आम्हाला वेळ संपली म्हणून प्रवेश नाकरण्यात आला होता. प्रवेश देणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांकडे जाऊन विनवणी, विनंती करीत अर्ध्या तासाने दर्शन रांगेत प्रवेश मिळवला.पण जेष्ठ नागरिकांच्या मार्गाने प्रवेश मिळाला नाही. काही विशेष व्यक्तींच्या प्रवेशद्वारातून प्रवेश दिला गेला. तेथेही खूप गर्दी होती. रांगेतून जातांना मेटल डिटेक्टरनें आमच्या सोबतीला असलेल्या व्यक्तीचा मोबाईल जप्त करून विशिष्ट ठिकाणी जमा करायला सांगितले.
आमच्या चौघांपैकी दोन जन मोबाईल जमा करण्याच्या गडबडीत मागे राहिले. त्यांच्या सोबत तीन वर्षांचं छोटं मूल होतं. तें मागे राहिले. आमच्या सोबतही एक लहान तीन वर्षांचीचं मुलगी होती. दर्शन रांगेतून एकमेकांना पुढे ढकलीत चालणे होतं. लहान मुलीचा (नातीचा) जीव गुदमरू नये म्हणून तिला खांद्यावर घेऊन पुढे चालत होतो.मागे राहिलेले आमचे दोन जणांनंजवळ लहान मूल होतं तें म्हणजे आमचा दुसरा नातू होता.त्यात एक महिला तर दुसरी व्यक्ती ७९ वर्षांची जेष्ठ होती(माझी सौभाग्यवती अन सासरे).एवढ्या गर्दीत नातूला खांद्यावर घेऊन पुढे कसे येत असतील?हीचं चिंता होती.
दर्शन रांगेत चालतांना जणू स्वप्न पाहावं असं दृष्य होतं.आम्ही चालतं होतो.अनेक भाषिक,अनेक राज्यांचें भाविक भक्तगण,दर्शनाभिलाषा मनी बाळगून, 'गोविंदा!... गोविंदा!' म्हणत चालत होती.ही त्या ईश्वराचींच माया असावी.आलेल्या ९९% भाविकांचीं भाषा समजत नव्हती.विविधतेतून एकता सांधली जात होती.देव कष्टाचा असतो असा अनुभव घेत होतो.आम्ही दोघे अन आमची तीन वर्षांची नात... 'ओवी' प्रचंड थंडीत कुडकूडत होती.तिचे आई वडील दूरच्या रांगेत होते. तिला खांद्यावर घेऊन हळूहळू देवद्वारातं पोहचलो होतो.भाविकांची ईश्वराकडे, साक्षात विष्णू देवाकडे,श्रीगोविंदाकडे केवळ एक क्षण दर्शन होईल म्हणून गर्दीच्या महापुरात एक टक नजर लावून पुढे ढकलले जात होते.
महाद्वारातं प्रवेश करताच स्वप्नी पाहिलेलं वैकुंठ पाहात होतो.कळस बाहेरून सोनेरी दिसत होता.लाईटच्या प्रकाशात पिवळेधमक सोनेरी कळस डोळ्यातून हृदयातंरी जात होता. अतिशय विशाल श्रीबालाजी मंदिर पाहून प्राचीन वास्तुकलेचा आगळा वेगळा कलाविष्कार भक्तीश्रद्धेतून हृदयात खोलवर वाहून नेला जात होता.अखंड काळ्या पाषाणातील श्रीबालाजी मंदिर चालुक्य,यादव, त्या पूर्वी असलेल्या हेमांडपंती मंदिराची वास्तूरचना श्रद्धेत रूपांतर होतांना देवास हृदय अर्पण करून बसलो होतो.श्रीतिरुमाला!श्रीव्यंकटेश!श्रीगोविंदासं मनोभावे पूजत होतो. आम्ही भाविक भक्तांच्या महापुरात पुढे वाहात राहिलो.गाभाऱ्यात अंधार होता.दिव्याची ज्योत जळत होती.फक्त.... फक्त पापणी लवते नं लवते त्याक्षणी श्रीव्यंकटेशाचं दर्शन झालं होतं. हृदय तृप्त झालं होतं. श्री बालाजीचं दर्शन झालं होतं.दुरून हात जोडून एक क्षण नतमस्तक झालो अन भाविक भक्तांच्या सागर लाटेतून सहजपणे गाभाऱ्या बाहेर पडलो. खांद्यावर नात ओवी होती.आमचे व्याही होते. आम्ही वयाच्या उतरावर दर्शनाला आलो होतो तर ओवी अवघी तीन वर्षांची होती. भाग्यशाली कोण होतं?
(अपूर्ण लेख..पुढील ०४ थ्या भागात पाहू)
🌹🌹🌹💐🙏💐🌹🌹🌹
****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२२ डिसेंबर २०२५
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment