तिरुपती बालाजी, कष्टाचा

*तिरुपती बालाजी दर्शन*
           *(कष्टाचां देव )*
🌹🌹💐🙏💐🌹🌹
**********************
... नानाभाऊ माळी


मन वढाय वढाय
 दूर पळतं बाहेर..
पाय पडती रें पुढे
कधी भेटेल माहेर!🌹

पाय पडती रें पुढे
देव उभा दूर दूर 
घाम कष्टातुनी सार 
उघडें आनंदी द्वार!🌹

श्रद्धा हृदयांत वसें
डोळे शोधती कळस
माझ्या अंतरीचा देव
दूर पळतो आळस!🌹

मन वढाय वढाय
कसं होई ना रें शांत
चालून थकून भागलो
'तो' सापडेना कांत!🌹

रोज चालतो चालतो 
शोध लागे ना अजून 
सूर्य तळपतो वरुन 
देह निघाला भाजून!🌹

                      आपण मन शांतीच्या पाठीमागे लागलो आहोत.दररोज तिला शोधतो आहोत.ती पुढे पळते आहे.आपण पाठलाग करीत आहोत.चित्तास समाधान लाभतं नाही.आपण प्रवासी होतो. यात्री होतो. आपण कोण? कुठे चाललो? का चाललो? आपला जन्म का झाला? झालाचं आहे तर जगणं कोणासाठी?कशासाठी? इतर प्राण्यांपेक्षा वेगळे असणारे आपण, बुद्धी, वाचामुळे आपलाचं शोध सुरु ठेवून कष्ट, त्याग, झिजण्यातून परोपकारी होत जातो.ओरबाडून खाणारी हीन वृत्ती सोडून सुखाच्या, शांतीच्या, आनंदाच्या अतिशय सुंदर मार्गांवर चालू लागतो. साऱ्यांचं सुख जेथे असतं,तें खरं सुख मिळविण्यासाठी धडधड सुरु होते. मागील सर्व कर्म गंगार्पण करून चित्तास शांती देणाऱ्या मार्गावर चालू लागतो. तो मार्ग तरी कुठला आहे बरं?

                    भक्ति, श्रद्धेसं अर्पण केलेला मार्ग चित्तवृत्तीस पवित्रस्थळी ओढू लागतो.पुण्यभंडार वाढविण्यासाठी श्रद्धामार्गाचा अवलंब केला जात असतो.भारतातील देवदर्शन यात्रा पवित्र मार्गांवरील भिन्न भिन्न श्रद्धास्थानं आहेत.कोणी उत्तरेकडे यात्रेला जात असतात. कोणी दक्षिणेत जात असतात तर कोणी पश्चिम, पूर्वोत्तरला जात असतात.आपल्या जीवन प्रवासातील पवित्र थांबे भक्तिमार्गातील सेतू असावेत.ते संस्कृती दर्शनाचे सनातन बंध तर नाहीत ना? ते चार धाम यात्रा तर नाहीत ना? का तीर्थस्थळं आहेत?काहीही असलं तरी मनाला, हृदयाला आनंद,समाधान देणारे निश्चित असतात.आम्ही देखील देवदर्शनाला गेलो होतो.*तिरुपती बालाजीला* गेलो होतो.दिनांक ६ डिसेंबर तें ११ डिसेंबर २०२५ दरम्यान तिरुपती बालाजी दर्शन यात्रा पूर्ण केली.

                   कित्येक वर्षांपासून ईच्छा होती तिरुपती बालाजीला जावं.साक्षात देव भूमीत भक्त म्हणून देवाशी हट्ट धरावा.आपलं हृदय पूर्णत: झटकून देव पायांवर ठेवावं!दर्शन घ्यावं अन मिळालेल्या जन्माचं सार्थक व्हावं. कदाचित देवाने ऐकलं असावं.भाग्ययोग जुळून आला होता.आम्ही आमचे भाचे इंजिनियर श्री.पुरुषोत्तम सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली ६ डिसेंबरच्या रात्री ११-३० वाजता, पुणे- कन्याकुमारी रेल्वेने निघालो होतो.यात्रेकरू संख्या ५४ होती.आम्ही सर्वचं नवीन होतो.देव भेटीची आसं होती.देव भावाचा भुकेला असला तरी भक्तांची परीक्षा घेत असतो.कसोटीला उतरल्यावर देव भेटतो.🌹

           सहजासहजी देव भेटला तर त्याला अर्थ काय? 'कष्टाविना देव भेटला',असं होतं.आम्ही देव भेटीच्या परीक्षेसाठी निघालो होतो.आम्ही जवळपास १५-१६ तासांचा रेल्वे प्रवास पूर्ण करून तिरुपती रेल्वेस्टेशनवर उतरलो. दुसरा दिवस उजाडवून तिसरा प्रहर देखील झाला होता. तिरुपती पासून 'श्रीतिरुमला बालाजी देवस्थानला' जाण्यासाठी उभ्या असलेल्या आंध्रप्रदेश एसटी महामंडळाच्या बसमध्ये जाऊन बसलो.अंतर साधारण ३१ किलोमीटर असावं, त्यात २०किलोमीटरचां पूर्णतः घाटरस्ता होता!नागमोडी घाटरस्ता जंगलांनी वेढलेला होता. तिरुपती रेल्वेस्टेशन साधारण समुद्र सपाटीपासून शंभरएक फूट उंचावर असेल तर श्रीबालाजी उंच उंच डोंगरावर आहे.तिरुपतीला कोरडे, दमट वातावरण आहे तर उंच उंच डोंगरावर असलेल्या श्रीबालाजीचं मंदिरं परिसरात प्रचंड थंडी होती!आम्ही वेडावाकडा घाट पार करून उंच डोंगरावरील भूभागावर आलो होतो.थंडी अंगाला झोबंतं होती. श्रीबालाजीचां उंच डोंगर म्हणजे एक नगरपालिकाचं असावी एवढं मोठं शहर वरती वसलेलं दिसलं.... 
(अपूर्ण लेख,पुढील भाग-०२मध्ये पाहू)
🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
*****************************
... नानाभाऊ माळी 
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१८डिसेंबर २०२५
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!