दर्शन.. संतुष्टीचा प्रसाद
दर्शन.. संतुष्टीचा प्रसाद
🚩🚩🚩🚩🚩🚩
******************
... नानाभाऊ माळी
हृदयाचे ठोके पडत असतात!धडकन चालूच असतें!श्वसन चालूचं असतं!नाका तोंडातून श्वास सुरूचं असतात!बाहेरून बंदिस्त छातीच्या आतचीं धमणी अविरत सुरूचं असते!देहातला होम अखंडपणे सुरूचं असतो!ओमंकार स्वरूपाचं स्पंदन सुरूचं असतं!मानवी देह पावित्र्याचं सुंदर गुंजन असतं!आपला देह होम झाला तर ? देह दाह सहन करीत चंदणी लाकडाचा सुगंधी देह स्वाहा होत असतांना आपला जन्म सिद्ध करीत राहतं!आपला देह मुळातचं परमात्म्यास अर्पण करण्यासाठी असतो!आत्मा समर्पित भावनेने जगत असतो!जागत असतो!समर्पण सेवावृत्ती होऊन बसते!... अशाचं परमात्म्याच्या विशाल स्वरूपाचं दर्शन करण्या गेलो होतो!💐
सातारा जिल्ह्यातल्या 'वाई' पासून काही किलोमीटर अंतरावर,'ढोम' धरणाच्या पोटाशीच पवित्र कृष्णा नदी तिरावर महादेवाचं प्राचीन मंदिर आहे!नृसिंहाच प्राचीन मंदिरं आहे आहे!निसर्गाच्या कुशीत, धरणाच्या विशाल साठ्याजवळी असलेलं प्राचीन मंदिरं स्वर्ग सुखाचं द्वार आहे असं वाटून गेलं होतं!आम्ही दिनांक ०९ जून २०२४ रविवार रोजी 'चला जाऊ गड-किल्ल्यांवर' या मोहिमेला गेलो होतो!पांडवगडावर जाऊन आलो होतो!साहसातून श्रद्धेकडे मन ओढ घेत होतं!सर्वदूर निसर्गाने मोहिणी टाकलेली होती!उंच-सखल डोंगर पायथ्याशी,कृष्णाकाठी,श्रद्धास्थळी मन ओढ घेत होतं!💐
आमची बस ढोम तीर्थस्थळी थांबली होती!आम्ही झाडांच्या दाट हिरवाईतून चालत होतो!समोर विशाल सह्याद्री पर्वत दिसत होता!उंच उंच पर्वतावर हिरवाईचीं चादर पांघरलेली दिसत होती!पर्वत पायथ्याशी कृष्णानदी शांत शीतल भासत होती!वरच्या बाजूने ढोम धरणाची उंच उंच आडवी भिंत दिसत होती!अशा निसर्ग सानिध्यात नृसिंह मंदिरं होतं!शुद्ध,प्रसन्न प्राणवायुचा संचार सुरु होता!देह देवाजवळी ओढला जात होता!कृष्णातटी देव दर्शनास व्याकुळ झालो होतो!समोर कळस दिसत होता!प्रथम कळसाला हात जोडून नमस्कार केला!कळस दर्शनानाने मंदिरातील देव दर्शनाचीं व्याकुळता अन ओढ वाढली होती!एक एक पावलं मंदिराच्या दिशेने ओढली जात होती!समोर अतिभव्य प्रवेशद्वार दिसलं!प्राचीन प्रवेशद्वार नयन मनोहारी दिसत होतं!प्राचीन कला शिल्पाचा साक्षात्कार डोळे भरून पाहत होतो!आम्ही साक्षात्कारी श्रद्धेचं दर्शन घेत होतो!अतिप्राचीन श्री.नृसिंह अन श्री.सिद्धेश्वर मंदिरात प्रवेश करीत होतो!💐
दगडात बांधलेल्या अतिशय सुबक, सुरेख, घडीव कलाशिल्पाचा अविष्कार डोळ्यांनी पाहात होतो!श्री.नंदीचा घुमटाकार कळस म्हणजे निर्माता विश्वकर्मानीं मुक्त्तहस्ते उधळलेली कलाकृती होती!दगडी कासवावर आरूढ नंदीमंदिर पाहिलं!कासव खोल अशा तळ्यात पोहत असल्याचा दगडातील सुंदर शिल्प मनास तृप्त करीत होतं!आम्ही नतमस्तक होतं नंदी देवाचं दर्शन घेतलं!नंतर साक्षात महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतलं!संपूर्ण मंदिरं घडीव दगडांचं होतं!भगवान श्री काशी विश्वेश्वर..सिद्धेश्वर गाभाऱ्यात शिवलिंग होतं!सर्व भव्य दिव्य!पवित्र!सुंदर!कैलासस्पर्शी दिसतं होतं!श्रद्धापूर्वक वाकून ईश्वर दर्शन घेतलं!नंतर समोरील श्री लक्ष्मी-श्री नृसिंह मंदिरात जाऊन विष्णू अवतारचं दर्शन घेतलं!श्रद्धा असेल तर देवदर्शन विश्वात्मक होतं!आम्ही देव दर्शनाने संतुष्टीचा प्रसाद घेऊन निघालो होतो!🚩
वाई येथीन नाना फडणवीस वाडाही कृष्णा नदी काठी आहे!त्यात अनेक ऐतिहासिक संदर्भ भेटतात!पेशवाईत साडेतीन शहाणे होतें!आम्ही बुद्धीने तल्लक शहाणे नानासाहेब फडणवीस वाडा पाहिला अन ऐतिहासिक ऊर्जेचा स्रोत डोळ्यातून हृदयात घेत होतो!🚩
वाई!शहर कृष्णाकाठी वसलेलं प्राचीन शहर आहे!पुढे वाईहून महाबळेश्वरला जाता येतं!अशा वाईच्या कृष्णाकाठी महा गणपतीचं दर्शन घेतलं होतं!श्रद्धा पवित्र मंत्र आहे!मंत्र अंतःकरणात जन्म घेतो!फुलतो!त्यातून सुंदरशी श्रद्धा फुले जन्म घेत असतात!आम्ही श्रद्धाफुलं उधळीत होतो!आनंद दर्शनाचं सुंदर गुंफण हृदयाला शिवून घेत होतो!अमुचा जन्म सिद्ध करून घेत होतो!
🚩🚩🚩👏🏼🚩🚩🚩🚩
*************************
.... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-१४ जून २०२४
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment