मन मंदिरी, प्रति पंढरपूरी(श्री क्षेत्र दुधिवरे)

मन मंदिरी,प्रति पंढरपूरी
   (श्री.क्षेत्र दुधिवरे)
🚩👏🏼🚩👏🏼🚩
**************
... नानाभाऊ माळी 

न भेटला पिंजरा 
कुठे कुठे मी शोधू
मन चंचल झाले 
त्यासं कुठे कुठे बांधू!🚩

कुठे भेटेना तवा
भाकरी मी रांधु
 तृष्णा मनीची रें 
 मी देवाघरी नांदू...!🚩

शोध शोधीले रें तूला 
मन नाही रें हे छंदू
मन व्याकुळं झाले 
देव मंदिरी मी वंदू...!🚩

अस्थिर अन चंचल
पळून जाईल हे भोंदू 
देव भेटला गाभारी
मन भक्तीला रें बांधू..!🚩

चंचल मनास मी,देवनाड्याने बांधित असतो!निसटून जाईल म्हणुनी वाड्यात कोंडीत असतो!मन वाचाळ विरासारखे,माझ्याशी भांडीत असतं!नानाभाऊ सोडून नानासं उगाचं घोळीत असतं!मग दोघेही टुक्कार  होतात!अगदीचं मोक्कार होतात!'मन' अन 'मी' च्या मध्ये सोकावून उधळत असतात!चंचल मनास माझ्या श्रद्धानाड्याने बांधित असतो!पळणार नाही दूर दूर,करकंचून बांधित असतो!मन उधळतं वाऱ्यावर, हे नसतंच थाऱ्यावर!उथळ,उनाड,अस्थिर मनास व्यसणं बांधित असतो!मी मनास बांधित असतो!🚩

          मन ओढून कोंडीत असतो!तरी आवरलं जात नसतं!बोट धरून चालायला मनचं सांगत असतं!हळूच भक्तीचा बोट धरून चालायला लावतं असतं!मन वेड्यावाकडया वेलींवर चढूनी नाचत असतं!पोकळ फुग्याला हवेत सोडून स्वतः नाचत असतं!आनंद शिखराचा अनुभव घेता धमाल उडवीत असतं!!शिखरावर सर्वांग सुंदर,स्वर्गानुभूती होत असतें!चंचलतेला ध्यानपिंजऱ्यात कोंडलं जातं असतं!मन शांत स्थिर होतं असतं!

मन विहिरीतल्या पाण्यासारखं शांत, स्थिर होऊ लागतं!वाहतें खळखळतं नदीतलं पाणी सागराला येऊन मिळतं असतं!एकजीव व्हायला लागतं!उथळपणा गळू लागतो!मन भावनेच्या पलीकडे जाऊ लागतं!एकचित्त होऊ पाहातं!शांत होऊ लागतं!स्थिर होऊ लागतं!डोंगर कुशीत,घनदाट जंगलात,ईश्वर सानिध्यात मन एकाग्र होऊ लागतं!मन शांत होऊ लागतं!....होय,आम्ही मनशांतीच्या ठिकाणी गेलो होतो!ईश्वर सानिध्यात गेलो होतो!साक्षात्कार अनुभवण्यास गेलो होतो!आम्ही दिनांक ०२ जून २०२४ रोजी पुणे जिह्यातल्या मावळातं 'प्रति पंढरपूरी' गेलो होतो!'श्री.क्षेत्र दुधिवरे' येथे गेलो होतो!श्रद्धेवर डोक ठेवायला गेलो होतो!भक्तीतं चिंब भिजण्यासाठी गेलो होतो!!🚩

श्री.क्षेत्र दुधिवरे डोंगराच्या कुशीत विसावलेलं भक्तीस्थळ आहे,ध्यानकेंद्र आहे!घनदाट जंगलात,एकांतात विसावलेलं श्रद्धास्थळ आहे!'जे'... आयुष्यभर हृदयात, हातात भक्ती पताका घेऊन जगले!हरीच्या ध्यानी रंगले!विठ्ठल नामाचा जय जयकार करीत सगुण दर्शनाचीं ओळख करून देत राहिले!भक्तीसंत परंपरा जनमनात रुजवत राहिले!अमृतानुभव पाजित राहिले.. अशा महान संतांची ही वैकुंठभूमी आहे!कर्मभूमी आहे!... ह.भ.प. बाबामहाराज सातारकरांचीं स्वप्न निर्मिती आहे!ही भक्तीभूमी आहे!तपोभूमी आहे!पवित्र ध्यानभूमी आहे!वैकुंठभूमी आहे!शांती औषधं भूमी आहे!🚩

आम्ही 'चला जाऊया गड-किल्ल्यांवर'  च्या मोहिमेवर होतो!लोहगड किल्ला पाहून मन तृप्त झाल होत!परतीच्या प्रवासात,घनदाट जंगलाच्या शुद्ध प्राणवायु सोबत,डोंगर कुशीतून आमचा प्रवास सुरु होता!जंगल सानिध्यात मन प्रसन्नतेवर आरूढ झालं होतं!झाडांच्या दाटीवाटीतून, लहान-मोठ्या वळणावरून रस्ता मागे जात होता!हळूहळू उंच इंग्रजी उलटा 'v'आकाराच्या डोंगर पायथ्याशी पोहचलो होतो!या पवित्र ठिकाणाचं नाव होतं....'श्री क्षेत्र दुधिवरे!'
हे ध्यानमंदिरं प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं!

आम्ही डोंगराच्या पायथ्याशी अतिशय सुंदर, आखीव, रेखीव,...वास्तूकलेचा गौरव होईल अशा ध्यान मंदिरात जाऊन पोहचलो होतो!मंदिरं झाडांच्या कुशीत विसावलं होतं!एकांती परिसरात शांती भंग करणाऱ्या लहान मोठया पक्षांचा आवाज कानी पडत होता!राजस्थानी मार्बलमध्ये बांधलेल्या ध्यान मंदिरात श्री.विठ्ठल रखुमाईचीं मूर्ती सात्विक श्रद्धेला कुशीत घेत होती!दोन मजली ध्यानमंदिरात संत नामदेव, संत ज्ञानेश्वरादी संतांच्या मुर्त्या बसविलेल्या दिसल्या!भक्तीतं न्हाऊन निघाल्या सारखं वाटत होतं!हलकीशी खेळती हवा मंदिरातून यें जा करीत होती!पिन ड्रॉप सायलेंस वातावरण होतं!मन अन नेत्र विठ्ठलचरणी अर्पित केले होतें!खरोखर ध्यान मंदिरात एकचित्त होऊन बसलो होतो!मन शांत शीतल एकचित्त झालं होतं!🚩

आमचे गुरुवर्य श्री.वसंतराव बागुल सर आणि श्री.नंदकुमार गुरव सरांनी भक्ती गीतं सादर केली!भजन सादर केली!दोन्ही जेष्ठानी आपल्या भजनातून भक्तीअमृताचा प्रसाद वाटला होता!आम्ही भक्तजन,मनतृप्तीचा अनुभव घेत होतो!आम्ही ध्यान मंदिरातून मनशांतीचं औषधं घेऊन निघालो होतो!प्रति पंढरपूरात ज्ञानवंत ह.भ.प. बाबामहाराज सातारकरांच्या भक्तीकर्मातून अतिशय सुंदर मंदिरं बांधलेलं अनुभलं!अजूनही संत तुकाराम महाराज सहदेह वैकुंठ गमन बांधकाम सुरुचं आहे!याचं वर्षी गेल्या काही महिन्यापूर्वी ज्ञानगुरु ह.भ.प.बाबामहाराज सातारकर महाराज आपला पुण्यदेह ठेवून पवित्र वैकुंठी प्रवासाला निघून गेलेत!भक्तिमार्गाची विशाल पताका जगाच्या हाती देऊन गेलेत!विठ्ठल भक्तीचा अमृतानुभव मागे ठेवून गेलेत!

दूर दूर जंगलाच्या एकांतात श्री क्षेत्र दुधिवरे तीर्थस्थळ मन शांतीचा मंत्र देत सुगंधी चंदन झाले आहे!ध्यान मंदिरं झालं आहे!मन शांतीचा गाभारा झाला आहे!प्रति पंढरपूर दुःख दूर करून मनःशांतीचं, अध्यात्मिक केंद्र आहे! ह. भ.प.बाबामहाराज सातारकर यांची श्री.क्षेत्र दुधिवरे येथील 'श्री चैतन्य आध्यत्मिक ज्ञान प्रसार संस्था' अध्यात्मिक श्वास झाली आहे!मी गुरुचरणी मनोभावे नतमस्तक होतो
🚩🚩🚩👏🏼🚩🚩🚩
************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक- ०८ जून २०२४
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊ गडकिल्ल्यांवर(नारायणगड)