देवाचिया भेटी (श्री रेणुका माता मंदिरं -माहूरगड, जि नांदेड )भाग -१२

देवाचिया भेटी
(श्री.रेणुकामाता मंदिरं-माहूरगड,जि. नांदेड)
             भाग-१२
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
******************************
...नानाभाऊ माळी 


देव हृदयी घेऊन
जगात हिंडतो आहे
देव देता घेता रोज
देवाशी भांडतो आहे!🌹

हक्क असे तिथे का
माणूस भांडतो आहे
देवामृत घेऊनि माझं 
हृदय सांडतो आहे!🌹

सदविचार घेऊन हिंडताना
सकारात्मकाशी एकरूप होऊन जीवनानंद घेत जगण्यातील सुख वेगळंच असतं!सुखाचं मुख उघडले की परमात्मा भेट होते!त्याच्या भेटीची व्याकुळता हृदयाला लागून राहिलेली असतें!... मग मीही व्याकुळ होऊन सद्विचार मोती शोधत फिरतो आहे.....

              ईश्वरहृदयी संस्कार करणारी व्यक्ती आई असतें!स्वतः झिजत झिजत, इतरांचं आयुष्य फुलविणारी आईचं असतें!अंगी दूध महादात्री आईचं असतें!हाडामांसात ममताहृदयी आई असतें!कोमलहृदयी अश्रू गाळणारी आई असतें!निःस्वार्थ झिजणे कैवल्यधाम आईचं असतें!कनवाळू मनात कठोर मर्दीनी आईचं असतें!हाती भाला असुरमर्दीनी आईचं असतें!शरण जाता प्रसन्न होई,देवी आई असतें!भक्त आम्ही नमन करतो,देवी शक्ती असतें!शक्तिपीठास शरण जावे ती ,'श्री.रेणुका देवी' असतें!🚩

            आम्ही ०२ एप्रिल२०२४ रोजी,हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथांचं दर्शन घेऊन,जेवन करून रात्रीचं साडे आकरा वाजता निघालो होतो!बस भरधावं पळत होती!खिडक्या उघड्या असल्याने रात्रीची थंडगार हवा आल्हाददायक वाटत होती!दिवसा कडक उन होतं!रात्री ऊबदार हवा धावत्या बसमध्ये घुस्कोरी करीत होती!आम्ही माहूरगड स्वामींनी श्री.रेणुका माता दर्शनासाठी निघालो होतो!महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यातील साडेतीन पिठापैकी पूर्ण पीठ असलेल्या देवीमातेच्या दर्शनासाठी आम्ही भक्तजन निघालो होतो!आम्ही सर्व दर्शनाभिलाषी धावत्या बसमधून येणाऱ्या थंडगार हवेमुळे काही क्षणात बसल्या बसल्या निद्राधीन झालो होतो!बस अंधार कापित पळत होती!आम्ही भगवत चिंतनात मग्न असतांना बसल्या बसल्या झोपेच्या अधीन झालो होतो!बस भक्तीधामाकडे निघाली होती!परम साध्याकडे निघाली होती!दिव्यत्वाच्या दर्शनासं निघाली होती!परम
आराध्याकडे निघाली होती!निसर्गाचा अविष्कार असलेल्या पैनगंगा नदी खोरे,उंच उंच सह्याद्रीच्यां डोंगर दऱ्यातील शक्तिपीठाच्या दर्शनाला निघाली होती!आम्ही बसमध्ये होतो!

आम्ही झोपेअधीन असतांना अचानक कानावर आवाज आला होता,'उठा उठा!' बस थांबलेली होती!घड्याळात पाहिले असता रात्रीचे ०२ वाजले होते!यात्रा आयोजकांचा आवाज कानी पडला होता,' माहूरगड आलेलं आहे!रात्रीच्या मुक्कामासाठी हॉटेल बुक केलेलं आहे!खोल्यांच्या चाव्या घेऊन आता आपापल्या रूममध्ये जाऊन झोपा!पहाटे ठिक ०५ वाजता उठा!अंघोळ वैगरे आटोपून,आपली बस बरोबर सकाळी ०६ वाजता माहूर गडावर जायला निघेल!' सूचना देऊन तेही झोपायला निघून गेले होते!अवघे तीन तास आमच्या हाती होते!पुन्हा पहाटे ०५ वाजता उठायचं होतं!सर्वजन आपापल्या खोलीत गेलो!बेडवर झोपलो होतो!झोप कसली येतेयं हो!अंथरुणात इकडून तिकडे कूस बदलत पडून होतो!झोप येईना!अंधारात डोळ्यासमोर शक्तिपीठ श्री.रेणुका माता दिसतं होती!दर्शनाभिलाषी आम्हास रेणुका माता बोलावीत असावी!🚩

     हृदयी देव घेण्याआधी अंतःकरण धुवून घ्यावे लागते!स्वच्छ शुद्ध श्रद्धा    हृदयात ओतून घ्यावे लागते!श्रद्धा ठायी रुजली असेल तर दिव्यत्वाचां साक्षात्कार होतो!स्वअर्पणातून देवत्वाचं दर्शन होत असतं!अपूर्व भक्तीतून दैवीशक्तीची अनुभूती येत असते!आम्ही ०३ एप्रिलच्या ब्रम्हपहाटे झोपेस पिटाळून लावलें होते!पहाटे लवकर उठलो होतो!अंतरी वसलेल्या,श्रद्धागडावर विराजमान असलेल्या श्री.रेणुकामातेच्या दर्शनासाठी व्याकुळ झालो होतो!सकाळचें ०६ वाजले होते!लक्ख प्रकाशाकडे वाटचालीस सुरुवात झाली होती!🚩

               आयोजकांनी दिलेला  गरमागरम चहा घेत बसमध्ये जाऊन बसलो!बस अंधाराकडून प्रकाशाकडे निघाली होती!रस्त्याची घाट वळणं करीत तीन किलोमीटर अंतर पार केले होते!माहूर निवासिनी श्री.रेणुका मातेच्या गडपायथ्याशी येऊन पोहचलो होतो!चिरेदार पहिल्या दगडी पायरीवर पोहचलो होतो!ओटीची परडी बांगडी, हळदी, कुंकू, तांबूलविडा नारळ घेतलं होतं!भाविक भक्त नवस फेडण्यासाठी पायरीवर कुंकू वाहत होते!पायरीवर नतमस्तक होत दर्शन घेतलं!हळूहळू एक एक पायरी चढत ,एकूण २५० दगडी पायऱ्या चढून माहूर गडावरील श्री. रेणुकामातेच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो होतो!

दर्शन रांगेत उभे राहून हळूहळू मातेच्या सभामंडपात आलो होतो!तेथून गर्भगृहातील मातेच्या मूर्तीवर ध्यान केंद्रित झालं होतं!अत्यंत सुंदर,सुबक,अप्रतिम,नयन मनोहरी रूपास डोळे भरून पाहात होतो!साक्षात्कारी रूपास जवळून पाहात होतो!मातेच्या भव्यदिव्य रूपास डोळे भरून पाहात होतो!मातेच्या सुंदर रूपास पाहात होतो!ज्यांना संतती होत नाही असेही कित्येक जोडपी येथे नवस मानायला व फेडायला आले होते!श्री.रेणुका माऊली,कल्पवृक्षांची सावली आहे!आदिमायेचे हे मूळ पीठ आहे!साक्षात भगवान विष्णुरूप परशुरामाची माता आहे!श्री.रेणुका देवी माता पती जमदग्नीसह अग्नी तत्वात विलीन झाली ते हे ठिकाण माहूरगड आहे!🚩

माहूरगड क्षेत्र भक्तांना सकारात्मक ऊर्जा प्रदान करीत असतं!महाराष्ट्र, कर्नाटक,आंध्रप्रदेश, तेलंगना येथील कित्येक भक्तांची आराध्य दैवत, कुलदैवत असलेली देवीमाता आहे!आम्ही मातेचं श्रद्धारूप हृदयात वसवीत होतो!सर्व भक्तांना पावणाऱ्या श्री.रेणुका मातेचं दर्शन घेत होतो!

    माहूरगड घनदाट जंगलानें वेढलेलं आहे!उंच उंच डोंगर आहेत!निसर्गानें प्रसन्न होऊन हिरवाईच अच्छादन केलेलं दिसतं!हिरवाईच्या उंच सह्याद्री रांगेतील एका डोंगरावर श्री.रेणुका मातेचं मंदिर आहे!पाठीमागे सुपुत्र भगवान विष्णू अवतार परशुरामचं मंदिर आहे!समोरील दुसऱ्या डोंगरावर 'राम किल्ला' आहे!अन्य एका डोंगरावर श्री.दत्तात्रय भगवानांचं अतिभव्य मंदिर आहे!दत्त शिखर आहे!अजून दुसऱ्या उंच डोंगरावर सतीमाता अनुसयाचं अतिविशाल मंदिरं आहे!सती माता साक्षात श्री.दत्तात्रयांची माता आहे!एकमेकांशेजारी जवळपास सहा-सात किलोमीटर परिसरातील नयनमनोहरी पर्वतरांगावर साक्षात श्री.दत्त शिखर भगवान,श्री रेणुका माता अन सतीमाता अनुसयांचं वास्तव्य होतं!ही ईश्वरी देण असलेलं पावन पवित्र स्थळ हृदयाला भावतं!ही देवांची किमया असावी!चमत्कारी महिमा असावी!

माहूरगड पायथ्याशी 'मातृतीर्थ' शेवाळ तलाव आहे!भगवान परशुरामाने वरुण देवाची आराधना करून जमिनीवर एका बाणात हे पवित्र मातृतीर्थ निर्माण केलं होतं अशी अख्यायिका आहे!तेथे विशाल वटवृक्ष असून त्याचाही प्राचीन इतिहास आहे!प्राचीन काळापासून माणसाचा सर्वात जवळचा मित्र अन सखा निसर्ग आहे!निसर्गात अशी अति विस्मयकारक  प्राचीन मंदिरं आहेत!हा वास्तुकला शिल्पाचां अजब नमुना आहे!येथील सर्व मंदिरं यादव कालीन हेमाडपंथी दिसतात!श्री.रेणुका माता मंदिरातील उभे अखंड दगडी खांब पाहून आश्चर्य व्हायला होतं!🚩

देवी श्री.रेणुका माता पार्वती अन कालीमातेच एकत्रित रूप आहे असं मानतात!भगवान परशुराम पिता जमदग्नी ऋषींचं निधन होत!भगवान परशुराम माता श्री.रेणुका अन पिता देहास कावडीत बसवून काशी करून आणतात अन गडाच्या पायथ्याशी असलेल्या मातृतीर्थावंरं ऋषी जमदग्नीच्यां चितेवर श्री.रेणुका माता सती जातात त्यांचं पौरात्य स्वतः श्री.दत्तात्रय भगवानांनी केलं होतं अशी आख्यायिका आहे!श्री.परशुराम माता-पितांच्या पवित्र अस्थी,मातृतीर्थ तलावात विसर्जित करतात!तेथे भव्य असं शिवलिंग देखील आहे!हिचं ती कोरी भूमी असावी!माहूरगड संपूर्ण जंगलांनी वेढलेल्या,घाट माथ्यावरील उंच पर्वतावर आहे!विहंगम, मनमोहक, मन प्रसन्न करणारं हे शक्तिपीठ साऱ्या भक्तजनांचं श्रद्धास्थान आहे!🚩

      अश्विन नवरात्र महोत्सवात देवीची घटस्थापना होते!खूप मोठी यात्रा भरते!विड्यांची तांबूल पानं प्रसाद म्हणून हाती ठेवतात!नवमी नंतर दशमीला भगवान परशुरामांची भव्य मिरवणूक निघते!ज्या दिवशी चंद्रदर्शन होतं त्या कोजागिरी पौर्णिमेची अनुभूती वेगळीच असतें!भगवान परशुराम आईच्या कुशीत झोपलेले असतात!श्री रेणुकामाता मंदिर नियमानुसार रात्री बंद होत असल्यामुळे भक्तांजनानां या साक्षात्कारी चंद्रसाक्षीचा अनुभव घेता येत नाही!आम्ही श्री.रेणुका मातेचं दर्शन घेतल होतं!

सतीमाता देवी अनुसया!दत्त शिखर! श्री.रेणुका माता!भगवान परशुराम अशा देव देवतांच दर्शन झालं होतं!आम्ही भक्ती रसात डुबकी मारत होतो!माहूरगड देव देवतांची पावन पवित्र भूमी!निसर्गाने भरभरून दिलेलं शांत स्थळ!अशा ठिकाणी हृदय अर्पित करून भावविभोर होतं जन्माचं पुण्य गाठी बांधलं होतं!गडाखाली उतरत होतो!नागमोडी वळणदार घाट उतरत होतो!मागे काहीतरी राहून गेलं होतं!आम्ही पूर्ण अपूर्णतेच्या भाव बंधनातून बाहेर पडत होतो!सीमा पार होतांना काळीज ठेवून देह घेऊन निघालो होतो!साडेतीन शक्तिपीठा पैकी एका पूर्ण पिठाचं दर्शन घेऊन पुढील प्रवासाला निघालो होतो!आम्ही श्री.गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला निघालो होतो!🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
***************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
         ७५८८२२९५४६
दिनांक-०९ मे २०२४
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)