कानिफनाथ ट्रेक कष्टाचा देव

कानिफनाथ ट्रेक कष्टाचा देव
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
**********************
... नानाभाऊ माळी 
         रात्र कात टाकत असतांना पहाटेच्या कुशीत प्रवेश करणारा पूर्वेचा अंधुक प्रकाश मोहवीत होता!पहाटे साडेपाच वाजता पुणे-सासवड रोडला दिवे घाटाच्या अलीकडी उजव्या बाजूने एक रस्ता जातो!वडकी गाव इलेक्ट्रिक दिव्यांच्या प्रकाशात शांत पहुडलं होतं!वडकी गावाच्या आधी डांबरी रस्ता नंतर कच्च्या रस्त्यावरून बोपदेव गावाचं प्रसिद्ध देवस्थान कानिफनाथ डोंगरावर जायला निघालो होतो!

कानिफनाथ पायथ्यापासून चालायला सुरुवात केली होती!अंगावर येणारा डोंगर!वेडावाकडी कच्ची पायवाट!दगड धोंडे अन लहान मोठे दगडं आमची वाट अडवून बसले होते!डोंगरावर खुरटी, काटेरी झाडं खडकात मूळ्या खुपसून हिरवाई देण्याचा प्रयत्न करीत होती!उंच उंच दगडी पायवाटेवर चढतांना समोर येणाऱ्या खडकाचा आधार घ्यावा लागत होता!नाहीतर एखाद्या काटेरी फांदीला हलकेसे धरून, आधार घेत उंच खडकाव पाय ठेवून चढत होतो!विशेष म्हणजे सुरुवातीला चौफेर अंधाराची चादर पांघरलेली धरणी उजळू लागली होती!पूर्वेला तांबूस फुटू लागलं होतं!दूर दूर सासवड रोडचा दिवे घाटही उजळू लागला असावा!

खडक-दगडावर पाय ठेवतांना एखादी काटेरी फांदी डोक्याला नाहीतर हातांना हळूच विंचू्वागत डंक मारीत होत्या!जिद्द चढाईची होती!वेळ लढाईची होती!काट्याशी कोण वाद घालणार होतं!आधीच कमी पावसात खडकात मूळ्या गाडून उभे असलेली काटेरी झाडं म्हणजे!पक्की काटक असल्याची ग्वाही देत होते!काही
सहकऱ्यांच्या हाती मोबाईल टॉर्च असल्याने अंधार फाकत होता!जस जसा कानिफनाथ गडावर वर चढत होतॊ तसतसा आमचा आत्मविश्वास वाढत होता!🚩

एकेक अवघड खडक चढून जातांना घाम अन दम दोघांना मोकळं सोडलं होतं!वेडेवाकडे,  अंगावर येणारा चढ
चढल्या शिवाय दम लागत नसतो!दम लागल्याशिवाय घामही येत नसतो!या दोघांच्या परीक्षेत बसल्या शिवाय ट्रेकिंग अन Rock climbing चां अर्थ समजत नसतो!अवघड गड -किल्ले अन डोंगर चढणे आव्हान असतं!जीवन आव्हान आहे!शरीर, बुद्धी अन मनाचा कस लागल्याशिवाय जगण्याची मजा नाही!आव्हान स्वीकारत वाटचाल करीत राहण्या सारखा आनंद नाही!🚩

'आधी हाताला चटके मग मिळे भाकर' हे जस आहे तसंच कष्टातून उभं राहणे!स्वतःस सिद्ध करणे!अनुभवातून पुढे वाटचाल करणे यातून दृष्टी येत जाते!अशी दृष्टी घ्यायला आज  दिनांक ०७ एप्रिल २०२४ रोजी पहाटे कानिफनाथ गडावर चढून वर गेलो!कानिफनाथ गडावर जायला तीन मार्ग आहेत त्यातील सर्वात अवघड मार्ग हा वडकी नाल्याकडून आहे!चढतांना श्वासाचं इंजिन सतत पळत होतं!वेग कमी जास्त करीत होतं!दम लागत होता!लढाईत माघार घ्यायची नसते!आम्ही अवघ्या पाऊण तासात अवघड वाटेने कानिफनाथ गडावर चढलो!कानिफनाथांचं दर्शन घेतलं!तो क्षण ईश्वर सानिध्यातील सर्वात आनंदी अन तृप्तीचा होता!🚩

काही वेळाने त्याचं वाटेने माघारी खाली आलो!पायथ्याशी आलो तेव्हा सकाळचे ७-४५ वाजले होते!घरी ८-१० ला पोहचलो!आज रविवार आहे!रविवारी विश्रांतीचा दिवस असतो!कित्येक नोकरदार सकाळी नऊ वाजे शिवाय उठतही नसतील!आम्ही पहाटे घरून पाच वाजता निघालो!साधारण आठ वाजता घरी पोहचलो!प्रत्येक क्षणांचां सदुपयोग करता येतो!आपलं स्वास्थ्य टिकवीत,फुकट आनंद मिळवता  येतो!संधीच सोनं करीत डॉक्टर मित्राला दूर ठेवण्यातली मज्जाच निराळी असतें!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०७ एप्रिल २०२४
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)