देवाचीया भेटी (शिखर शिंगणापूर )भाग-३

देवाचीया भेटी
(शिखर शिंगणापूर)
     भाग-०३
🚩🚩🚩🚩🚩
****************
... नानाभाऊ माळी

सुष्क कातळ पाषाणी
देव डोंगरावरी आला
पर्वत नतमस्तक होई
महादेव भुवरी  गेला..!🚩

कैलासावर सत्ता त्याची
ठेऊनी येथवर आला
कातळ सुष्क पाषानी
भक्त आनंदीत झाला...!🚩

         शिव चरचरात आहेत!भारतात राज्या राज्यात शिव मंदिरं आहेत!शिव मंदिर पाहिलं की आत्मिक सुखाची अनुभूती होत असतें!शिवलिंग खोल खोल दगडी गाभाऱ्यात असतं!बाहेर श्री.गणेश भगवान महाद्वारावर द्वारपाल सारखे उभे तर नंदी महाद्वाराबाहेर एकनिष्ठ वाहक-सेवक म्हणून उभे दिसतात!प्राचीन
हेमाडपंथी शिव मंदिरं भारतीय श्रद्धेचां आत्मा आहेत!शिवलिंगाचं दर्शन घेतांना आपणास आत्मिक शांतीचीं अनुभूती होत असतें!🚩

     आम्ही फलटणचं श्रीराम मंदिर दर्शन घेऊन पुढे लहान मोठ्या घाट माथ्या वरील उंच डोंगरावर शिखर शिंगणापूरला गेलो होतो!सातारा जिल्ह्यातील फलटण अवर्षणग्रस्त, पर्जन्य छायेचा तालूका आहे!पावसाचं प्रमाण कमीचं असतं!वनसंपदा मोजकीचं दिसते!त्यात काही खुरटी जंगलं आहेत!निसर्गानें दुर्लक्ष केलेल्या खडकाळ कठीण पाषानी उंच डोंगरावर अखंड दगडात महादेवाचं मंदिर असणं म्हणजे मानवी बुद्धी पलीकडे वाटतं!चमत्कार आणि अलौकिक वाटतं!परवा ०१ एप्रिल होता!उन्हाळा आपला रंग दाखवतो आहे!या वर्षी तापमान दर वर्षाहून अधिक आहे!घाम अन चटका देणाऱ्या उन्हात शरीराचं तापमान वाढवतो आहे!आम्ही शिखर शिंगणापूरच्या महादेवाचं दर्शनासाठी गेलो होतो!🚩

कैलासातं महादेव आणि पार्वती माता सारीपाटचां खेळ खेळत होते!त्या खेळात साक्षात शंभु महादेव पराभूत झाले होते!शंभू महादेव अतिशय निराश झाले होते!निराशेत ते ब्रह्मांडत गुप्त झाले होते!पार्वतीने ही बाब श्री विष्णू यांना सांगितले!श्री हरी विष्णूनी महादेवाचा शोध घेऊन माता पार्वती अन महादेवात समेट घडवून आणला होता!दोघांनाही कोथलगिरी पर्वतावर बोलाविले होते!तो दिवस होता शुद्ध अष्टमीचां!दोघांचं मनोमिलन होऊन विवाह संपन्न होतो!दर वर्षी शुद्ध आष्टमीला यात्रा संपन्न होते!गुढीपाडव्याच्या जवळपास ही यात्रा भरते!असा प्रसंग म्हणून शिखर शिंगणापूरचं महत्व अधोरेखित होतं¡


मंदिराची उंची १५० फुट असावी!वरती कळस पहातांना आपली मान पूर्णतः ९० अंशातं वाकवावी लागते!त्या काळी महादेव मंदिराचं बांधकाम कसं झालं असावं बरं?मोठमोठे काळेशार पाषाण योग्य त्या मापात घडवून, कोरून कदाचित शिसे ओतून,एकमेकांवर घडीव दगडं रचून शिखर शिंगणापूर महादेव मंदिर बांधलं असावं!कळसाखाली दगडातील घडीव कलाकृतीचां सुरेख संगम साधलेला दिसला!उत्तम शिल्पातील नजरेला देवापर्यंत पोहचवणारं!बारीक सारीक कोरीव कलाकृतीच हृदयी वसवणारे योग्य मापात कोरलेलं सुंदर नक्षीशिल्प देवत्वाची आठवण करून देणारं होतं!

उंच डोंगरावर जाऊन बसलेल्या महादेवाचं दर्शन घेतलं!सोमवार असल्यामुळे मंदिराबाहेर मोठी रांग होती!पायांना चटके बसत होते!दुपारची साधारण एक वाजेची वेळ असावी!रांगेत पुढे जाता जाता हर हर महादेव मुखातून बाहेर पडत होते!ओंकार स्वरूप श्वासातून ये जा करीत होते!महादेव रूप अंतरी वसत होते!

गर्भगृहात जातांना चित्त ओंकार स्वरूपाशी एकरूप होत होते!बाहेरील चटका गर्भगृहात जाऊन थांडावा प्रदान करीत होतं!मस्तीष्क अन
मनचक्षु पिंडीवर एकचित्त झाले होते!महादेव अंतरी घेत होतो!महादेवाच्या अनादी अनंत,विशाल रूपात,शिखर शिंगणापूरीतं विरघळले जात होतो!
तप्त उन्हातही शांत शीतल वाटतं होतं!

यात्रा म्हणजे अनंत माणसांची गर्दी असते!गर्दी भक्तीचं विशाल रूप असतं!महाभक्ती विशाल महादेवात एकरूप होत गेली!यात्रा श्रद्धा साध्याकडे कूच करीत होती!सफलतेकडे यात्रा होती!काळजी घेणारा भगवंत सोबतीला होता!
दर्शन घेऊन ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणावर माथा टेकण्यास निघालो होतो!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*********************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)