शिक्षक सेवानिवृत्त होतो शिक्षकांतील गुरु नाही!🌹🌹🌹
शिक्षक सेवानिवृत्त होतो
शिक्षकातील "गुरु" नाही
💐💐💐💐💐💐💐💐
*************************
... नानाभाऊ माळी
गुरु अभिमान माझा
गुरु सत्वगुणी वाजा!
गुरु सागर अथांग
गुरु पहाटेची बांग!
गुरुमाय माऊली
गुरु असतांत सावली!
गुरु विशाल आभाळ
ज्ञान वाटुनिया काळ!
गुरु जीवनाची वाट
गुरु विसाव्याची खाट!
गुरु औषधं मनाचे
चटका सोशती उन्हाचे!
गुरु ज्ञानींरुपी धन
रोज तेजळाते मन!
गुरु हृदयातील जागा
अज्ञानी होतंसे जागा!
गुरु ज्ञानियाचा कुंभ
ज्ञान भरुनिया नभ!
गुरु ज्ञानियाचा डोळा
गुरु पीकविती मळा!
गुरु हिरवळीचं शेत
गुरु अंतःकरणी साथ!
गुरु ऊबदार उशी
हृदयी देतसे खुशी!
गुरु असती देवपुष्प
दुःख हलकेसे बाष्प!
गुरु अमृतासमान
गुरु ज्ञानी कमान!
गुरु असती ज्ञानश्वास
रोज बसतो विश्वास!
गुरु ज्ञानियाचा सागर
गुरु सत्कर्मी आगर!
गुरु असती विचारसिंधू
कसे जोडती ज्ञानबिंदू!
गुरु असती ज्ञान डोळा
ज्ञानी फुलविती मळा!
गुरु असती विद्यादाता
जग टेकविती माथा!
गुरु जीवनाचा भाता
ज्ञानपरीसही होता!
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात मुख्य तीन स्थानकं भेटत असतात!तिघंही अतिशय महत्वपूर्ण असतात!तिघेही नजर अन डोळे देत असतात!जीवन गाडीचा वेग वाढत असतो!व्यक्ती पळत असतो!अनेक छोटी मोठी स्टेशनं येत राहतात!खूप काहीतरी शिकवून जातात!जीवन चल चित्रपट आहे!दिवस मागे निघून जातात!आपण रुटीन समजतो!मागील स्टेशनं सर्व काही विसरून गेलेलो असतो!कोरून कोरून उत्तम शिल्प करावीशी वाटणारी 'ती' तीन अढळ स्थानकं आपल्या मन पटलावरून कधीही पुसली जात नसतात!ती तीन प्रमुख स्टेशनं असतात ...आई!!वडील!!गुरुजन!
आपण जन्म घेतो आई जन्मोजन्मीचें ऋण करून ठेवते!ममता, सहनशीलता, कनवाळू असे गूण देते!कित्येक युगं गेले असतील,ऋण कोणाकडून फेडलं गेलं असेल बरं ? साक्षात साक्षात्कारी ईश्वरही आई चरणांचा दास असतो!आई चारणांचा दास होण्यातलं सुख अनमोल असतं!आशीर्वादाचीं अनंत फुले आपल्या डोक्यावरून अंगावर खाली पडतं राहतात!आईचे हात फुलांसारखी असतात!आशीर्वादाची सर्व फुलं आपल्या हृदयी जपून ठेवण्यासाठी असतात! जन्मापासून परावलंबी असणारे आपण आईच्या अनंत उपकारांचें शिखरऋण घेऊन जगत असतो!आईच्या जन्मजात कनवाळू, सहनशीलतेतुन आपली जडणं घडणं होत असतें!आई आपला पहिला गुरु असतें!कधी तिचं बोट धरून कधी आपलं बोट धरून आई आपल्याला दुडूदुडू चालायला शिकविते!बोबड्या बोलातून 'आई' शब्द शिकविते!आपणासं घडविते!उभं करते!आई देवस्वरूप असतें!💐
आपल्या मुठीत हळूहळू वडिलांचं बोट येऊ लागतं!बोट मोठं असतं!मूठ लहान असतें!मूठ घट्ट होत जाते!धरलेलं बोटं घराबाहेरचीं ओळख करून देतं असतं!वडील नावाच्या बोटात आदरयुक्त भीती जाणवू लागते!लढ म्हणून सांगत हळूच मुठीतलं बोट सोडवून घेतलं जातं!पुढे घरातून गल्लीत,गल्लीतून गावात!बाहेरच जग कळू लागतं!मन ओढ घेत वळू लागतं!बाप कळायला लागतो!बाप वाघासारखा भासू लागतो!संकट अंगावर घेणारा बाप दिसू लागतो!अन जून महिन्यातल्या एके दिवशी,शाळेचं दप्तर हाती पडतं!गल्लीतील मुलांसोबत शाळेकडे पाय पळू लागतात!🌹
वर्गात खूप खूप मुलं दिसू लागतात! हक्काचे आई-वडील,भाऊ-बहिणी मात्र डोळ्याला दिसत नाहीत!शाळेच्या वर्गात आई-वडिलांच्या जागी गुरुजी-सर समोर दिसायला लागतात!सगळंच अनोळखी असतं!वर्ग अनोळखी असतो!वर्गातील मुलं अनोळखी असतात!गुरुजी अनोळखी असतात!रडता रडता,अश्रू गाळता गुरुजी आपले वाटू लागतात!वर्ग मित्र होतो,इथेचं गुरुजींचं पहिलं दर्शन होतं!🌹
घर-दाराच्या बाहेर शाळा आपलं विश्व वाटू लागतं!हात लिहू लागतो!डोळे वाचू लागतात!कान ऐकू लागतात!अक्षर ओळख होता होता अनेक विषयांचं ज्ञान आत्मसात होऊ लागतं!ज्ञान देणारे गुरुजन श्रद्धेचं ठिकाण वाटू लागतं!गुरुजी पूजनीय वाटू लागतात!एक एक वर्ग उत्तीर्ण होता होता!अध्ययन सुरूच राहतं!बुद्धीची खाली झोळी भरतं राहते!आपण ज्ञानी होऊ लागतो!💐
ज्ञानदान देणारे गुरुजन आपल्या जीवनाचे शिल्पकार वाटू लागतात!आपल्या अल्प बुद्धीत विशाल ज्ञान भांडार येऊन पडू लागतं!शिक्षक वडाची विशाल सावली वाटू लागतात!ज्ञानवृक्ष वाटू लागतात!ज्ञानमंदिरं वाटू लागतात!पूजनीय गुरुजनांचे गगनाहून विशाल ऋण घेऊन आपण जगात हिंडत असतो!फिरत असतो!🌹
दर वर्षी नवीन वर्ग सुरु होतं असतो!एक एक वर्ग पूढे जाणारा विध्यार्थी काही वर्षानंतर शाळेचा निरोप घेऊन बाहेरही पडतो!त्याला आकाश निरभ्र,मोकळं मोकळं वाटतं असतं!शाळेत आपलं आयुष्य ज्ञानदानात घालविणारे शिक्षक शिकवीत शिकवीत, स्वतः शिकत एक दिवस तीस-पस्तीस वर्षं नोकरी करून सेवानिवृत्त होतात!कित्येक विध्यार्थी शिक्षकांच्या हातून शिकून बाहेर पडलेले असतात!विध्यार्थी विविध ठिकाणी विविध पदावर कार्यरत असतात!शिक्षक विसरूनही गेलेले असतात!विध्यार्थी शाळा अन शिक्षकास कधीही विसरत नसतांत!
शिक्षक रस्त्यावर-गावात कुठेही भेटू द्यातं आपण आपोआप नतमस्तक होतं शिक्षकांच्या पवित्र पायांवर डोकं ठेवून आशीर्वाद घेत ओळख सांगत असतो!शिक्षक ज्ञानपंढरी वाटू लागतात!विध्यार्थीप्रिय शिक्षक सदविचारांचे दर्शनकार असतात! समृद्ध ज्ञानओघ वाटून आयुष्य घडविणारे शिक्षक ज्ञान-देव वाटू लागतात!देव कोणी पहिलायं हो ? प्रत्यक्षात विध्यार्थी घडविणारे गुरुजनचं देवचं असंतात!आपण आईला ईश्वराचं प्रतिरूप मानतो!गुरु देखील ईश्वररूपचं असतं!गुर-शिक्षक आपल्या हृदयावर राज्य करीत असतातं!आपण सतत गुरुजनांचा अनुभव संपन्न ज्ञान साक्षात्कार घेत असतो!
"विद्या हे पुरुषास रूप बरवे की झाकले द्रव्य ही!"... "विद्या विनयेनं शोभते!"... "विद्या धनम: सर्व धनम: प्रधानम:!"...असे ज्ञानपवित्र सुविचार हृदयात निवास करू लागतात!तेव्हा तेव्हा ... आमचे कवी मित्र,आदर्श शिक्षक आदरणीय श्री.व्यंकटेश देशमुख सर डोळ्यासमोर दिसू लागतात!ज्ञानदान देतं देतं दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत!ज्ञानज्योत लावीत श्री.देशमुख सर कुशल गुणात्मक ज्ञानामृत पाजित राहिलें!विध्यार्थी घडवत राहिले!विध्यार्थी घडत राहिले!शिक्षणासारखे पवित्र व्रत अंगीकरलेलें देशमुख सर हाडाचे शिक्षक आहेत!शिक्षक त्यागीवृत्तीचें द्योत्तक असतात!ज्ञानदान ज्ञानवृत्ती असतें!ज्ञान प्रवास असतो!शिक्षक सुसंस्कार करीत असतात!उगवत्या नव सूर्याचें दर्शन करून देतं असतात!श्री.देशमुख सर आपण सत्वशील सत्यदर्शन करून देत राहिलात!ज्ञानफळ वाटीत राहिलात!विध्यार्थ्यांना भक्कम ज्ञानश्वास देत राहिले!विध्यार्थी छाती फुगवत आपलं नाव घेत राहिले!आपण कवी आहात!शिक्षक आहात!साहित्यिक आहात!सर्वात महत्वाचं म्हणजे आपण उत्तम माणूस आहात!देशाचे भावी पिढी घडवत ज्ञानदानाचा होम पेटवीत,दीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहात!वयोमानाप्रमाणे आपण सेवानिवृत्त होत आहात!आपल्यातील शिक्षकी गुरु कधीही निवृत्त होणारं नाही!आपणास दीर्घायुष्यासाठी, पुढील वाटचालीस अनेक हार्दिक शुभेच्छा!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
****************************
.... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२४ एप्रिल २०२४
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment