कानिफनाथ ट्रेक कष्टाचा देव (भाग -०४)

कानिफनाथ ट्रेक कष्टाचा देव
           भाग-०४ 
🚩🚩🚩🚩🚩🚩
********************
... नानाभाऊ माळी 

ठेच लागता रक्त सांडते
तेथे परचित असे घडते
पायी चालता वाजे चौघडे
गड इंच इंच हो लढते    !🚩

हार मानूनी रस्ता संपतो
जिद्दीने असे का हो घडते?
 खेळ नसे हा साप सीडीचा
हार पायाखाली हो पडते!🚩

चढ म्हणता लढ म्हणतो
रस्ता पायाखाली कुढतो
किती वळणे अवघड येती
ट्रेकर जवान होऊनि लढतो!🚩

दगड गोटे घाम काढुनी 
अंगावरी उंच कडा येतो
तमा न केली सरशी झाली 
माणूस रोज धडा घेतो.. 🚩

                  दगड धोंडे धरतीचे अंश असतात!माणूस चालतांना ताठ झाला तर  ठेचकाळणार!दगडं दंश करणार! ताठपणाला शिक्षा करणारं!दगडाचा देव हृदयाला जखम करीत असतो!कधी जखमेला फुंकर घालीत असतो!दगडात देव पाहिल्यावर देवपण प्राप्त होतं असतं!दगडमातीची पृथ्वी देवत्वाची जननी आहे!नद्या,सागर, उंच डोंगर मानवी मनाला भुरळ घालणारी असतात!कधी आव्हान देत असतात तर कधी आवाहन करीत असतात!आव्हानातलं आवाहन मानवाला पेलवणार असतं!आवाहन बोलवीत असतं!आमंत्रण देत असतं!आवाहनातं आपलेपणा असतो!ओलेपण असतं!तेथे मन आश्रयाला जात असतं!आश्रयात सुरक्षितता जाणवत असतें!आस्था बोलवीत असतें,तेथे माथा टेकवत असतो!आश्रयाच्यां श्रद्धेला देवपण प्राप्त होतं!श्रद्धा श्वास होऊन बसते!ती प्राप्त करण्यासाठी घाम काढीत असतें!घाम निघाल्यावर होणारा आनंद स्वर्गीय असतो!🚩

आम्ही 'कानिफनाथ ट्रेकिंग अँड हेल्थ क्लब', हडपसर,पुणेचें अध्यक्ष आदरणीय श्री.शाम कुंभार सरांच्या प्रेरणेने, सोबतीने दर रविवारी कानिफनाथ गडावर जात असतो!फुकटची स्वास्थआरोग्य जीवन जडीबुटी घेण्यासाठी जात असतो!हृदयाला ठणठणीत ठेवण्यासाठी जात असतो!घामातून,थकन्यातून तंदुरुस्तीचं उत्तम ट्रेकऔषधं घेण्यासाठी जात असतो!आठवडाभर प्रसन्नतेची हमी घेण्यासाठी कानिफनाथला जात असतो!माणसांना अनेक व्यसनं असतात! व्यसनं जडतात!जडलेली व्यसनं आतून वाळवी सारखे पोखरत असतात!शरीराचा पिंजरा घेऊन हिंडणारी कित्येक माणसं आपण पाहात असतो!आम्ही मात्र पिंजऱ्यात हृदय अन फुफूसाला संजीवनी घुटी घेण्यासाठी कानिफनाथ गडावर जात असतो!🚩

आज दिनांक २१ एप्रिल २०२४ रोजी नेहमीप्रमाणे पहाटे ५-२० ला कानिफनाथ गडाच्या पायथ्याशी पोहचलो होतो!अंधारशाल पांघरलेला चढरस्ता आमची वाट पाहात थांबलेला होता!रविवार पहाट होण्याची वाट पाहात होता!रस्ता आमच्या स्वागतास तयार होता!आम्ही नतमस्तक होतं भूमीला वंदन केलं!रस्त्याला वंदन केलं!हळूहळू चढाईला सुरुवात झाली होती!हलकीशी थंडगार झूळूक अंगाला स्पर्श करीत आली,हळूच आशीर्वाद देत निघूनही गेली!आम्ही दगडगोटे टाळीत पावलांगणिक पुढे सरकत होतो!अंगावर येणारा चढ रस्ता चालत होतो!चालण्याच्या सुरवातीस गप्पा मारीत निघालो!चढ लागल्या बरोबर दम घेत पुढे चालत होतो!गप्पा गप्प होतं दमदार श्वास घेत श्री.कानिफनाथ गडाकडे वाटचाल सुरु होती!🚩

      पाय अथकपणे चालत होते! घुडघे,मशीनसारखे खाली वर होतं होते!आपला जीवंत देह साध्याचं मशीन असतं!मशीन तंदुरुस्त तर साध्य निकट येत असतं!कानिफनाथ गड आमचं साध्य होतं!आमचे पाय  सरावलेल्या सारखे पळत होते!चढ रस्ता ओळखीचाच होता!कडेकडेने दिसणार सुष्क गवत अन रस्ता खोदलेल्या दगडातून वाट काढीत पाय साध्याकडे निघाले होते!अंधार पळत निघून गेला!ढगाळल्या,उगवत्या सूर्य नारायणासमक्ष मंदिराचां कळस दुरून दिसू लागला होता!आम्ही कानिफनाथ गडाकडे निघालो होतो!🚩

    श्वास फुफुसाचा भाता चालवीत होते!हृदयाचे ठोके संयमी पण जलद सुरु होते!ट्रेकर एकमेकांच्या संगतीने चालत होते!साध्याकडे निघाले होते!च साध्य स्पष्ट दिसतं होतं!आज नवीन मार्गानें, कानिफनाथ मंदिरा पाठीमागून निघालो खडतर रस्त्याने पोहचत होतो!चालत्या पायांनी नेमके ओळखले!श्री.कानिफनाथ मंदिरं आलं होतं!श्वासभात्याचा वेग मंदावला होता!पहिल्या पायरीवर डोकं ठेवलं!मंदिरातील चौकोनी कमानितून सरपटी करीत गाभाऱ्यात गेलो!गाभारा शांत, एकांत वाटतं होता!बाहेर घंटानाद ऐकू येत होता!मन निश्चिलं, एकचित्त झालं होतं!समाधी दर्शन घेऊन गाभाऱ्या बाहेर आलो!

       मनातल्या अनंत विचारांचं काहूर शांत झालं होतं!परिश्रम,घाम एक झाला होता!साध्यापर्यंत पोहचून मन शांत झालं होतं!अनुभूतीचा हा अनमोल खजिना आनंददायी होता!साक्षात्कारी होता!अंग मेहनत घेत स्वकमाईचा हा खजिना किमान आठवडाभर तरी टिकणारा होता!डॉक्टर मित्रांना दूर ठेवणार होता!गड जिंकता जिंकता!स्वतःसं जिंकीत होतो!कानिफनाथ मंदिरं एक होतं!आजचा अनुभव नवा होता!समाधान उतू जात होतं!🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२१ एप्रिल २०२४
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)