कानिफनाथ ट्रेक कष्टाचा देव (भाग -०३)
कानिफनाथ ट्रेक कष्टाचा देव
(भाग-०३)
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
**********************
... नानाभाऊ माळी
झाडाला फुलं येतात!सुगंध देऊन गळून जातात!दिवस येतात ते ही पळून जातात!सृष्टी फुलते!हसते!हसवते!पुन्हा सुष्कतेकडे प्रवास सुरु होतो!पाऊस होतो!चौफेर हिरवायी गजबजून जाते!सृष्टी हसरी दिसली की सर्वांना हवी हवीशी वाटते!पावसाळा अन हिवाळा हवाहवासा वाटतो!भरलेपण हवे हवेसे वाटते!रिते पण नकोसं वाटतं!उन्हाळा नकोसा वाटतो!ऋतू बदल होत असतो!परिवर्तन सृष्टीचा नियम आहे!उन्हाळा नकोसा असला तरी त्यात उद्याचं गर्भारपण लपून बसलेलं असतं!
उन्हाळ्यात समुद्राचं बाष्प वर ओढलं जातं!बाष्पाचें ढग होतात!वादळासोबत ढगाला गळती लागते!विजा कडाडतात!वादळी पाऊस धरणीमातेस चिंब भिजवू लागतो!धरणी व्यायला लागते!हळूहळू पांढरे-हिरवे अनंत तृनपानं जन्म घेऊ लागतात!हिरवीगार सृष्टी जणू हिरवा शालू नेसून अखंड सौभाग्यवती दिसू लागते!.... पण उन्हाळा??नकोसा असतो का?💐
सध्या एप्रिल महिना सुरु आहे!कडक उन्हाने आम्हास परीक्षेला बसविले आहे!उन्हाळा परीक्षक बनून आमची चाचपनी करतो आहे!गम्मत बघतो आहे!एखाद्या लहानसा कापसाएवढा ढगाचा तुकडा निळ्याभोर आकाशात घुसखोरी करतांना दिसतो आहे!रागवलेला सूर्यनारायण चटक्याच्यां फटक्यात बंदिस्त आकाशातील कुंपणातून कापसाच्या तुकड्याला पिटाळून लावतांना दिसतो आहे!धरणी तापून तापून तप्त होतांना दिसते आहे!जंगलात,शेताच्या बांधावरील एखादे चिंच-लिंबाचं झाड तप्त उन्हातही हिरवाई पांघरून ताठ मानेने उभं असलेलं दिसतं आहे!गेल्या पावसाळ्यातलं कोरडेखट्ट सुकलेलं, छोटं-मोठं खूरटं गवत,उगाचचं धरणीला भार असूनही इवल्याशा मुळ्यांनी जमिनीचा आधार घेत उभं दिसतं आहे!अशाचं कोरडेपणाच्या सोबतीला काल दिनांक १४ एप्रिलच्या पहाटे आम्ही पुणे जिल्ह्यातील उंचावर असलेल्या 'कानिफनाथ गड'ट्रेकिंगला गेलो होतो!🚩
पहाटेचा अंधार गारव्याशी खेळत-हसत होता!छानशी-हलकीशी झूळूक अंगास झोबुंनं जात होती!अशा प्रसन्नतेच्या समयी गावं-खेडी गारव्यात झोपलेली दिसत होती! आल्हाददायक-उत्साही वातावरणात अंधारलेल्या पहाटेच्या साक्षीने आम्ही ०५-२० वाजता कानिफनाथ पर्वत चढायला सुरुवात केली होती!
होळकरवाडी गाव पायथ्यापासून चढाईला सुरुवात केली होती!रस्ता दगड धोंड्यांचा होता!तरीही चढण्यास अवघड नव्हता!चढतांना मध्ये मध्ये मातीचे आडवे बांध टाकलेले होते!वळसा घेऊन मोहीम सुरु होती!मोबाईल टॉर्चच्या उजेडात!शांत पण भक्कम पायांच्या आवाजात चढायी सुरु होती!मोबाईलवर भावगीतं, भक्तीगीतं, मंगल भूपाळी ऐकायला येतं होती!वळणदार पण अंगावर येणाऱ्या डोंगराच्या कडेकडेने रस्ता खोदलेला दिसतं होता!रस्त्यात छोटेमोठे दगड धोंडे ठेचकाळण्या स्वागतास आवर्जून उपस्थित होते!मनसोक्तपणे इतस्था पडलेलें दिसत होते!आमचीं पाऊलेही सराईत गुन्हेगारासारखी सरावलेली होती!दगडांवर भरभक्कम पाय ठेवून पुढे जात होतो!कुठेतरी थोडाफार सपाट रस्ता आनंद देत होता!तर कुठे तीव्र चढ होता!नाकाची नळकांड लोहाराच्या भात्यागत श्वास घेत होती!अंगावर येणाऱ्या चढाशी दोन हात करीत,दम भरीत, दम घेत आमचीं श्री कानिफनाथ गडाकडे (मंदिराकडे) आगेकूच सुरूच होती!🚩
गार पाण्याने अंघोळ करणे आनंद देत असतं!घामाने चिंब भिजण्यातील आत्मिक आनंद वेगळाच असतो!चढतांना घाम येणें नैसर्गिक आहे!पण चढ चढून मोहीम फत्ते करण्यातील सुख अवर्णनीय असतं!वळणा वळणाचां चढ अंगावर घेत पोहचणे म्हणजे खरचं यशस्वीतेकडे वाटचाल असतें!आम्ही त्या अवर्णनीय सुखाजवळी पोहचत होतो!घाम येतं होता!दम घेत होतो!मोहिम अंतिम टप्यात आली होती!डोंगरावरील कानिफनाथ मंदिराचां कळस आम्हास जवळ येणासाठी खूणावीत होता!आमचा चढण्याचा वेग वाढत होता!अंगात उत्साह होता!सोबतीला प्रसन्न सकाळ होती!आतील जोशनें हातभार लावला होता!
पूर्वेचं पिवळे तांबूस उजेडाचीं खबरबात देण्यास उत्सुक होतं!श्वास घामाला सांगत असावा,'अरे थोडंच अंतर आहे!वर गेल्यावर तू कुठला कुठे पळून जाशील!' दोघांचां सूर संवाद जुळलेला असतांना समोर आनंदाची पहिली पायरी भेटली!श्री कानिफनाथांचीं पहिली पायरी आली होती!पायरीवर डोकं ठेवत,नतमस्तक होतं भक्तीभावाची अनुभूती घेतली!भक्त श्रद्धेजवळ पोहचला होता!
फळ भेटण्यासाठी कष्ट-श्रम गरजेचं असतं!कष्ट शरीर तंदुरुस्तीचं उत्तम साधन असतं!साधन साध्याशी एकरूप झाल्यावर ईश्वर प्राप्ती होतें!आम्ही ट्रेकच्या माध्यमातून ईश्वरानंद घेत होतो!गड जिंकल्याचा आनंद ट्रेकर मावळ्यांना झाला होता!आनंद ओरबाडून मिळत नसतो!कष्ट,यातना, श्रमाचीं पूजा केल्याशिवाय ईश्वर प्राप्ती नसतें!आम्ही घाम गाळत आनंद ईश्वरा जवळ पोचलो होतो!साक्षात कानिफनाथ दर्शन झालं होतं!निष्ठेतं ईश्वर भेटतो!कष्टात ईश्वर भेटतो!ट्रेकिंगमधून ईश्वर भेट होत असतें!आम्ही सर्व ट्रेकर घामात चिंब भिजत ईश्वरापाशी पोहचलो होतो!हिचं तर ईश्वर प्राप्तीची खरी ओळख असतें!सुदृढ आरोग्यातून सर्वोच्च आनंदापाशी पोहचत असतो!आम्ही दिनांक १४ एप्रिल रविवारी, उगवत्या सूर्य नारायणाच्या साक्षीने कष्टाचा देव अनुभवला होता!श्री.कानिफनाथ ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केला होता!ट्रेक तोचं होता!अनुभव वेगळा होता!🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
***************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१५ एप्रिल २०२४
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment