चला जाऊया गड किल्ल्यांवर(भोरगिरी किल्ला भाग -०२)
चला जाऊया गड-किल्ल्यांवर
(भोरगिरी किल्ला भाग-०२)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
***********************
... नानाभाऊ माळी
किल्ला डोळ्यासमोर आला की शौर्य आणि वीररस अंगात संचार करीत असतो!हळूहळू गतइतिहास नजरे समोरयेत असतो!पराक्रमाची ग्वाही देत उभा राहू असतो!आम्ही देखील किल्ला इतिहासाची विजयगाथा हृदयात ठेऊन पुण्यातल्या चंदननगरहुन निघालो होतो!दोन बसेसमध्ये ८१ मावळे निघाले होते!त्यात महिलांचा ६० टक्के समावेश होता!महिला राज इतिहास साक्षी आहेत!महिलांनीं आपल्या अंगी असणाऱ्या शौर्य-चातुर्याने अनेक राज्य चालविली!गदगदा हलविली आहेतं!अनेक वीरांगनांनी राजगाद्यावरं आपला ठसा उमटवीला आहे!....तर अशाचं वीरांगनां किल्ला सर करण्यासाठी निघाल्या होत्या!
अंगी असलेली जिद्ध युद्धात लडण्यासाठी पूर्व तयारी असतें!मन ताब्यात असेल तर सर्व काही जिंकता येत असतं!महिला भगिनी गड जिंकण्यासाठी निघाल्या होत्या!'भोरगिरी' किल्ला सर करण्यासाठी निघाल्या होत्या!अर्थात सोबत वीर लढवय्ये देखील होते!मावळे होते!आदरणीय वसंतराव बागूल सर सेनेचं नियंत्रण करीत होते!
राजगुरू नगर(खेड)हुन भीमाशंकरला जाण्यासाठी डाव्या बाजूने रस्ता वळण घेत वाडा,चासकमान धरणाकडे शूर सेना घेऊन दोन्ही बसेस पळत होत्या!मार्गक्रमण करीत होत्या!उद्देश होता, 'भोरगिरी किल्ला सर करणे,जिंकणे!' एक एक गावं मागे टाकीत,निसर्ग सौंदर्याची,हिरवाईची उधळण डोळ्यांनी टिपत साहसी लढवय्ये मावळे चासकमान धरणापाशी येऊन थांबले!🌹
आक्रमणापूर्वी सैन्यास विश्रांती हवी असतें!पोटाला अन्न हवे असतं!डोळे,मन, बुद्धी अन हृदयाला आनंद हवा असतो!चासकमान धरण विशाल,अथांग सागरा सारखे जाणवलं!तीन डोंगराच्यामध्ये आडवा बांध बांधला होता!खळखळून वाहणाऱ्या नदीला थांबवलं होतं!नदी फुगून सागर झाली होती!उंच उंच डोंगराच्या घनदाट अरण्याच्यां पायथ्याशी आम्हाला जलसागर मोहवीत होता!🌹
सकाळी थंडी-गारठ्यात पूर्वेचा सूर्यदेव दर्शन देत होता!नतमस्तक होतं दोन्ही हात जोडीत नमन केले!हॉटेलमध्ये नास्ता-चहा घेऊन चासकमान धरणाच्या पोटाशी खडकावरून पाण्याचं अथांग रूप नजरेस पडतं होतं!डिसेंबर थंडीत धरणाच्या पाण्यात पाय बुडवलें!थंडगार पाण्याने मेंदूला संवेदना पाठविल्या होत्या!आव्हान दिलं होतं ,'येतोस का अंघोळीला?'🌹
अर्ध्या तासात चासकमान धरणाचं मन मोहक रूप डोळ्यांनी पिऊन घेतलं!डोंगराच्या वेड्यावाकड्या रांगेत छोटी छोटी गावं विसावलेली दिसत होती!निसर्ग नजारा टिपणारे आमचे डोळे लहान होते!दृश्य विशाल होतं जे टिपता आलं तें हृदयात साठवीत आम्ही भोरगिरी किल्ला जिंकण्यास निघालो होतो!कडेकडेने छोटी छोटी शेत खाचरे दिसत होती!भात कापणी झालेली दिसत होती!ज्वारी उभी दिसत होती!कांदा शेतात डोके घुसवून वरती पात ताट उभी दिसत होती!बऱ्याच शेतात काळा वाटाणा दिसत होता!थंडीच्या दवातं अंघोळीला बसलेली पिकं सुंदर हिरवी साडी नेसावी तशी उभी होती!🌹
बसेस आपल्या ध्येयाकडे पळत होत्या!रस्त्याच्या डाव्या-उजव्या बाजूने भीमाशंकर अभयारण्य डोंगर-माथा हिरवाईचं दर्शन करून देत होतं!चासकमान धरणापासून अनंत वेडीवाकडी वळण घेत,भीमा नदीच्या तटा तटानें 'भोरगिरी' गावात येऊन पोहचलो होतो!भोरगिरी गावं एक टूमदार छोटंसं गावं!सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगराच्या कुशीत अन भीमा नदीच्या काठावर वसलेलं कौलारू घरांचं गाव होतं!पर्वतराईच्यां कुशीत,झाडांनी वेढलेल्या घनदाट संरक्षित अभयारण्यातून नदी वाहतांना दिसत होती!डिसेंबरच्या थंडीत भीमा नदी छोट्या-मोठ्या झुळझूळणाऱ्या झऱ्यातून,धबधब्यातून निळसर शुभ्र पाण्याचा प्रवाह घेऊन निष्ठेने वहात होती!दृश्य मनमोहक होतं!पाणी आणि प्राणी,त्यात आम्ही मनुष्य प्राणी होतो!निसर्गाचा अविस्मरणीय विस्मयकारक अविष्कार पाहून चकित झालो होतो!आम्ही शेवटी दुर्गप्रेमी माणसं होतो!भीमा नदीच्या थंड पाण्यातून मार्ग काढीत निघालो होतो!नदी उताराकडे वहात होती!आम्ही भोरगिरी गावातून भोरगिरी किल्ल्याकडे कूच करायला सुरुवात केली होती!🌹
भीमा नदीनें आमचा मार्ग अडवला होता!थांबला तो शूर सैनिक कसला?सर्व सैनिक नदी पात्रातून पलीकडच्या काठावर जाऊ लागली!भोरगिरी किल्ल्याच्या पायथ्यापासूनच अवघड वाट सुरु होते!चढ-उतारांनी, वेड्यावाकड्या अंगावर येणाऱ्या अरुंद कच्च्या पाय वाटेने भोरगिरी किल्ला वर चढत होतो!अवघ्या २० मिनिटात डोंगराचं कातळ पोखरून एक कोरीव दगडात गुफा दिसली!गुहेत गुडघाभर थंडगार पाणी होतं!त्यात मासे पोहताना दिसत होती!कदाचित ती गुफा ९ व्या शतकातील प्राचीन असावी!आत अंधाऱ्या पण भव्य गुहेत श्री.वैभव लक्ष्मी देवीची मूर्ती दिसली!मनोभावे नतमस्तक होत हात जोडले गेले!दर्शन घेऊन बाहेर पडलो!पुन्हा अवघ्या पाच मिनिटावर डोंगर कडेकडेने पूढे गेलो!पुन्हा दुसऱ्या गुहेत शंकराची पिंड दिसली!आजूबाजूला किल्ल्याचे बुरुज ढासळ लेल्या अवस्थेत दिसलें!नमस्कार करून त्या प्राचीन गुहेतून बाहेर आलो!🌹
भोरगिरी किल्ल्याच्या पोटावर दगड गोट्यानी खच्च असलेली कच्ची अवघड पायवाट होती!अलीकडे काही अंतरापर्यंत चढण्यासाठी सिमेंटचां कठडा बांधला आहे!पुढे मात्र कठडा नव्हता!उभट अंगावर येणारी अवघड पाय वाटेने चढतांना भीती देखील वाटते!आम्ही भोरगिरी किल्ला चढत होतो!चढायला कठीण होता!डोंगर उभट होता!खाली भीमा नदीच उभट खोलगट पात्र दिसत होत!अंगावर शहारे येत होते!वर जसतसा चढत धैर्याने अवघड गड सर केला होता!
वरती डोंगर कडेला काळ्या पाषानी कापरीत पून्हा गुहा दिसली!ती मारुती गुफा होती!वर चढून झाल्यावर एक भलं मोठ्ठ पाण्याचं टाकं दिसलं!टाकं मोठं होत!त्यात पाणी होत!उंच डोंगरावर,किल्ल्यावर पाण्याचा स्रोत पाहून आश्चर्य वाटतं होतं!इतक्या उंचावर पाण्याचे नैसर्गिक टाके होते!किल्ल्यावर झाडांची प्रचंड दाटीवाटी दिसत होती!आम्ही झाडांच्या आतून चालत होतो!दिवस असूनही झाडांमुळे अंधार असल्यागत जाणवत होतं!थोडी भीती देखील वाटतं होती!भीती वाघ-बिबट्याची होती!आम्ही भोरगिरी किल्ल्याच्या शिखरावर फिरत असतांना एका ठिकाणी विरगळ दिसलें!दगडाच्या तुटलेल्या-फुटलेल्या प्राचीन मूर्ती दिसल्या होत्या!पून्हा शिखरावर मार्गक्रमण करीत सर्वात उंचावर समुद्र समुद्र सपाटीपासून ६८६ मिटर उंचावर असलेलं भोरगिरी किल्ल्यावर एका टेहळणी स्थानावर येऊन पोहचलो होतो!गिरीदुर्ग ठिकाणावर आलो होतो!भीमाशंकर डोंगर रांगेतील भोरगिरी किल्ल्यावर आलो होतो!🌹
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्यां उत्तरेला भीमा नदीच्या काठावरील भोरगीरी किल्ला होता!शिवाजी महाराजांच्या काळात मोघलांची सत्ता भीमा नदीच्या उगमा पर्यंत होती असं मानलं जातं होतं!अलीकडे सिमेंटच बांधकाम करून टेहळणी छत्री बांधलेली दिसली!तिथे जाऊन काही वेळ बसलो!पण झाडांच्या वेढ्यात एकांत ठिकाणी भीतीही वाटत होती!पुढे जावून पाहता एक तटबंदी दिसली!कदाचित या किल्ल्याचा उद्देश टेहळणीसाठी असावा!शत्रूवर नजर ठेवता येईल असं ठिकाण त्या काळी सत्ताधाऱ्यानी निवडलं असावं!भीमा नदीचां उगम भीमाशंकर जवळ,१२ जोतिर्लिंगापैकी एक असलेल्या ठिकाणी झाला आहे!राजगुरूनगर पासून ५६ किलोमीटर अंतरावर असलेल्या भोरगिरी गावाला किल्ला आहे! पुण्याहून साधारण ९० तें ९५ किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला निसर्गाचा अवीट ठेवा आहे!'भोरगिरी' किल्ला पाहून मनाची तृष्णा शांत झाली होती!मोहीम फत्ते झाली होती!आम्ही अवघड किल्ला सहासाने सर केला होता!🌹
भोरगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी भोरगिरी गावात भीमा नदी किनारी कोटेश्वर महादेवाचं मंदिर आहे!नदी आपलं अस्सल निळसर पाणी स्वतःच्या पोटात घेऊन वहात होती!कोटेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं!
निसर्गाच्या कुशीत साहसी आनंद घेत भोरगिरी किल्ला जिंकून सर्व मावळे परतीच्या प्रवासाला निघाली होती!आत्मिक सुखाचां अमृत कलश घेऊन आम्ही पुण्यात आलो होतो!साहसी आनंद परिश्रमातून मिळत असतो!आम्ही तृप्तीचां सर्वांग सुंदर आनंद घेत घरी आलो होतो, कारण भोरगिरी किल्ला सर केला होता!👏🏼
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२६ डिसेंबर २०२३
(श्री. गुरुदत्तजयंती)
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment