चला जाऊया गड किल्ल्यांवर(कर्नाळा किल्ला)

चला जाऊया गड किल्ल्यांवर
     (कर्नाळा किल्ला)
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
**********************
... नानाभाऊ माळी 

अवघड किल्ला तो उभा
अंगी घाम निघाला खरा
मराठे शूर वीर लढलें 
बोललें ,'जिंका किंवा मरा'🚩

 कातळ अंगावरी उभा 
वहातो रक्ताचा सडा
तलवारी शत्रूशी लढण्या 
जिंकण्या चालला लढा.. 🚩

किल्ले शूर विरांची छाती
त्यांनी जोडीले होतें नाते
अंगी घाम गाळती सारे
तळपले तलवारीचे पाते.. 🚩

         छातीत धड धड होते!अंगाला दरदरून घाम फुटतो!एक एक पाऊलें पुढे पडतात!चढ अंगावर येत असतो!त्याच्या छातडावर दमदार पावलं पुढे पडतं असतात!चढ असा जेथे पाय ठेवायला देखील सपाट जागा मिळू नये!उतारावरून खाली घरंगळून आलेलें,झाडांच्या प्रचंड मूळ्यात थांबलेल्या छोट्या मोठ्या दगडांवर कुठेतरी पाय ठेऊन पुढे वर वर चढत राहणे!काही ठिकाणी झाडांच्या लांबसडक मुळ्यांचां आधार घेऊन दमदार पावले टाकत राहणे!अंगावर येणाऱ्या चढाच्या कुठल्यातरी कोपऱ्यावर थांबून,बाटलीच्या पाण्याने आपली तृष्णा भागवत चढत राहणे याला किल्ला सर करणे म्हणावे का? का किल्ल्याच्या पोटाशी वाढलेल्या प्रचंड झाडांच्या वेड्या वाकड्या उभट वाटेवरून वर वर चढणे याला किल्ला म्हणावा?🚩

किल्ला.....!!नावातच धाडस आहे!किल्ला नावातच मर्दानंगी आहे!किल्ला नावातच दहशत अन वीरश्री देखील आहे!किल्ला शौर्याचा इतिहास उघडत असतो!किल्ला गत पिढीचा हयात वारसदार असतो!किल्ले तत्कालीन राज्यकर्त्यांची ओळख म्हणून आजही उभे आहेत!किल्ले आपल्या अंगा खांद्यावर कित्येक लढायांचीं पडझडं वाचीत उभे आहेत!
अंगावर ढासळलेलें कवच कुंडले घेऊन उभे आहेत!आजही एक एक संत श्वास घेत लोकशाहीत ही किल्ले उभे आहेत!🚩

शौर्य!धैर्य!धाडस!धाक!दुही!कुटनीती अन डावपेचांनीं राज्य करणारे शासक किल्ल्यातून आपल्या मन पटलावर जाऊन बसलेले आहेत!त्यांच्या कारकिर्दीचा ठेवा म्हणून आजही जीर्ण अवस्थेत किल्ले आपलं अस्तित्व ठेऊन उभे आहेत!शुरांची यशोगाथा गात आजही आपण किल्यांवर येतं असतो!प्राचीन भारतीय संस्कृती रक्षक महान राजांची गाथा गात असतो!इतिहास नजरेत उभा करून आपण देश प्रेमी होत असतो!आपले पाऊले किल्ल्यांकडे धाव घेत असतात!त्यांची मर्दानी तलवार आजही हातात घ्यावीशी वाटते अन शत्रूशी दोन हात करावेसें वाटतात!अंगातलं प्रचंड देशप्रेमी रक्त सळसळायला लागतं!🚩

आपल्या अंगात त्राण शिल्लक नसला तरी प्राचीन शौर्याची!!शूरवीरांची पताका अन भगवा झेंडा हाती घेऊन अवघड वाटणाऱ्या किल्ल्यांवर शक्ती एकवटून चढावसं वाटत असतं!राष्ट्रभक्ती,देशप्रेम.. मनात,तनात संचारत असते!विरांची शौर्य गाथा अंगात संचारत असते!अन किल्ल्यावरील माती माथी लावावीशी वाटते!....होय आम्ही देखील अशाच वैभवशाली किल्ल्यावर गेलो होतो!रविवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे ५-०० वाजता बसने 
चंदन नगर पुण्याहून निघालो होतो!'चला जाऊया गडकिल्ल्यांवर' या आदरणीय श्री. वसंतराव बागूल साहेब यांनी काढलेल्या मोहिमेअंतर्गत कोकणातील "कर्नाळा" किल्ल्यावर गेलो होतो!🚩

आमची बस चंदन नगर, तळेगाव, लोणावळा, खंडाळा घाट पार करून खोपोली,पनवेल मार्गे पळत होती!पनवेल पासून अवघ्या पाऊण तासाच्या अंतरावर कर्नाळा संरक्षित पक्षी अभयारण्य दिसलें!पक्षी, प्राण्यांची सुरक्षित पिंजरे दिसलें!फुलांची सुंदर बाग दिसली!ते पार करून डाव्या बाजूने गर्द झाडांच्या खडकाळ पायवाटेने कर्नाळा किल्ल्याचा रस्ता होता!कोकणातलं वातावरण दमट असतं!किल्ल्याचा मार्ग कच्चा,खडकाळ,दगड धोंड्याचा, गर्द झाडांचा होता!हिरवाईच्या चादरीचा होता!मध्येच लाल तोंडी माकडं उड्या मारतांना दिसत होती!

    माती,झाडांच्या वेली,दगड गोट्यांची घाम काढणारी,झाडांच्या गर्दीतून वेडीवाकडी जाणारी वाट म्हणजे कर्नाळा किल्ल्यावर जाणारा अरुंद रस्ता होता!चढतांना घामाची अंघोळ झाली होती!दमट वातावरणातील,घाट कोकणातील कर्नाळा किल्ला चढतांना दम लागतं होता!मध्येच एखादा विंचू वळवळ करीत आपल्या पायाजवळून जात होता!मध्येच अरुंद-उभट अन अंगावर येणाऱ्या दगडी पायवाट शरीराची परीक्षा घेत होती!साधारण तासभर चालू गेल्यावर घाम गळत असतांना समोर अंगठ्यासारखा उभा सुळका दिसला!किल्ल्याचं शिखर म्हणजे सुळका होता!🚩

    आजूबाजूला निसर्गानें वेढलेल्या या किल्ल्याचा उपयोग कदाचित
टेहळणीसाठी केला जात असावा!दुरून येणाऱ्या शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी खासकरून या किल्ल्याचा उपयोग होत असावा!समुद्र सपाटी पासून ४५०मिटर उंचावर असलेल्या किल्ल्याच बांधकाम यादव कालीन १२व्या शतकातलं असावं!आजूबाजूला भक्कम तटबंदी,बुरुज,खोल दरीपाहून डोळे विस्फारतात!अंगाला घाम फुटतो, अंगाचा थरकाप उडतो!अतिशय उंचावर कोठार,भक्कम तटबंदी,सुळक्याखाली पाण्याच्या टाक्या पाहून आश्चर्य वाटल्या शिवाय राहात नाही!इतक्या अवघड ठिकाणी, उंचावर पाणी असणं!दगडातलं उत्तम बांधकाम असणं हे कर्नाळा किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे!🚩

यादव,निजाम,मराठा,मोघल,पोर्तुगीज, पेशवाई अन इंग्रजांचं राज्य पाहिलेल्या कर्नाळा किल्ल्याचे बांधकाम अजूनही प्राचीनतेची उत्तम ओळख आहे!कर्नाळा किल्ला उत्तर पूर्व दिशेने चढता येतो!साहस असेल तर सर्व शक्य होतं असतं!साहसाशिवाय गत्यतंर नसतं!साहसी ट्रेकिंगमुळे गड किल्ल्यांची ओळख होतं असते!कर्नाळा किल्ल्यामुळे निसर्गाशी मैत्री साधंतांना धाडसी पर्यटन साध्य झालं याचं समाधान वेगळाच आनंद देऊन गेला!घाम गाळत आव्हान स्वीकारण्या सारख समाधान लाभण भाग्याच असतं! 🚩

गड-किल्ले उत्सुकता वाढवीत असतात!माणसांचे घाम काढत असतात!किल्ले नव्या पिढीचे श्वास झाले पाहिजेतं!शारीरिक तंदुरुस्तीसाठी,उत्तम आरोग्यासाठी निसर्गाच्या सानिध्यातील अवघड वाट पार करीत कर्नाळा किल्ला सर केल्याचं समाधान वेगळेचं होतं!साहसी आनंद मनाला समाधान देत असंतो!निसर्गाच्या सानिध्यात आव्हान पेलत धाडसाचा जन्म  होतं असततो!कर्नाळा किल्ल्याच्या हिरव्यागर्द वनराईतं श्वास रोखून चढाई करून खाली आलो!सफर सफल झाली!धाडस असलं की असाध्य ही साध्य होत असतं!किल्ला सफर घडवून आणणाऱ्या टिमचे प्रमुख श्री.वसंतराव बागूल सरांचे मनस्वी आभार मानतो!कर्नाळा किल्ल्याचा घाम आत्मिक आनंद देत होता!पोलादी छातीचीं ढाल सोबतीला होती
     🌹🌹🚩🚩🚩🌹🌹
     **********************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-२९ नोव्हेंबर २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)