माझी आई अशीच(भाग -२०)

माझी आई अशीच आहे
       (भाग-२०)
💐💐💐💐💐💐💐
*********************
... नानाभाऊ माळी 

...अंगणात धो धो पाऊस पडत असतो !लहान बाळ पावसात खेळण्यासाठी उत्साही आणि उतावीळ असतं!आईची नजर चुकवीत,हळूच दरवाजा उघडून पावसात उड्या मारायला लागतं!बाळ आईच्या नजरेस पडतं!आई हातातलं काम तसंच अर्धवट सोडून त्याच्याकडे पळत सुटते!बाळ पुढे पळत असतं!भिजत असतं!भिजणाऱ्या बाळासोबत आई देखील भिजते!सर्दी होईल म्हणून त्याला ओढत घरात घेत असतें!अंग पुसून कुशीत घेत असतें!आई अशीच असतें!बालपणी आम्ही असचं करायचो!आईला पळवायचो!बालसुलभ खोड्यांनी आईला भिजवत राहायचो!आपल्याला सर्दी होऊ नये म्हणून आई आमच्या मागे मागे पळत राहायची!सर्वांची आई अशीच असतें!आमची आई देखील अशीच आहे!

आई मुलांसाठी मृदूहृदयी आवरण असतं!येणारं संकट स्वतः सहन करून मुलांना सुरक्षित ठेवीत असतें!आई सुखाचं,आनंदाचं दर्शन असतं!आई विशाल सावली असतें!आपण सावलीत असतो!आई चटका घेत असतें!आई कोमलतेचा झरा असतें!निखळ झऱ्या सारखी खळखळ वाहात असतें!आनंद देतं असतें!आई स्वतः खाचखळग्यातून  वाट काढत वाहत असतें!ठेचकाळत वाहात असतें!रक्ताचं पाणी करत असतें!पाणी होऊन वाहात असतें!आई मुलांसाठी जीवन असतें!आईचा सर्वस्व त्याग साहित्यात अजूनही खोलवर लिहिला गेलेला दिसत नाहीयें!सहनशक्तीची ही दिव्य मूर्ती,मातृत्वखाण,अश्रूतळासाठी लेखणी अपुरी पडते!तळ रिते दिसतं आहे,असं सतत वाटत असतं!आईच्यां त्यागाचं मोल लेखणीतून झरझर झिरपतांना दिसतं नाहीये!खरं म्हणजे आई लेखणीत देखील शाई रूपात बसणारी नाहीये!निळसर आभाळाहून आई विशाल आहे!माझी आई अशीच आहे!💐

आई संतांची असतें!आई श्रीमंतांची असतें!आई राजाची असतें!आई गरीबाची देखील असतें!प्रत्येकाला आई-वडील असल्यावर सर्वात श्रीमंत असल्यासारखे वाटतं असतं!आई  मुलांसाठी हक्क गाजवणार ठिकाण वाटतं असतं!अशी माऊली,माय डोळ्यासमोर दिसली नाही तर मुलं 'आई आई'असा हंबरडा फोडत असतात!आई घराची अभ्यद्य भिंत असतें!आई समुद्राची भरती-ओहोटी असतें!जगणं आणि जगवणं शिकवीत असतें!सांसारिक चढ-उतार सहन करीत कधी ओहोटीतून तर कधी भरतीतून आपलं अस्तित्व दाखवीत असतें!अस्तित्वाची ओलसर ओढ काळजाला भिडत असतें तेथे आईचं कारुण्यरूप दिसतं असतं!घरोघरी आई अशीच असतें!माझी आई अशीच आहे!🌹

आपण खूप लहान असतांना आईचं कष्ट आणि तिचं महत्व पटत नसतं!जाणवतही नसतं!सतत सोबतच असतें!आपण वयाने वाढतो!मोठं होतो!आई देखील वयाने वाढते!तरुणपणातलं तिचं कष्ट तेंव्हा जाणवत नसतं!दिसतं ही नसतं!आपल्याला समजही नसते!पण आई वृद्ध होतें, आपण तरुण होतो!आईच्या कष्टाच्या खाणाखुणा तिच्या चेहऱ्यावरं दिसतं असतात!वयाने वाकलेली,थकलेली,अनुभवांनी श्रीमंत माय प्रेरणा असतें!नकोशा घटनांपासून लांब ठेवायचा प्रयत्न करीत असतें!आई काळजाचा
धडधडणारा भाता असतें!💐

आई वात्सल्यमूर्ती असतें!तिच्यात ममतेचा झरा वाहात असतो!सुखाच्या गालिच्यात आपण लोळण घेत असतो!आई अंथरुण होत असतें!कधी पांघरून होत असतें!ऊबदार कुशीत तिच्या आपण झोपी गेलेलो असतो!ती जागत असतें!आपण झोपत असतो!पुढे आपण जगत असतो!आईच्या संस्कार आठवणीतं फिरत असतो!आई नावाचीं सन्मान कहाणी उभी हयात सोबत असतें!आई नावाच्या देव्हारा सोबत घेऊन आपण हिंडत असतो!आई नावाची 'वाणी'आपल्या जन्मासोबत कानी चिकटते!गोड, कर्णमधुर,सुंदर,आवाज आपलं आयुष्य सुरेल करीत असतो!कान अन मन तृप्त होत असतात!आईच्या आवाजातून संस्कार धून कानी पडतं असतें!आपण घडत असतो!आई नावाची वीणा वाजत असतें!आपलं आयुष्य संत्संगाच्यां ईश्वराकडे नेत असतें!आईच्या वाणीतून जगण्याचा साक्षात ईश्वर दिसतं असतो!कान अन मन तृप्त होत राहात!माझी आई अशीच आहे!सूर्यकिरण आहे!💐

आईच्या डोळ्यांची दुर्बीन अन कॅमेरा सतत आपल्या मागावर असतो!हालचाली टिपत असतो!सदगुणांच्या मार्गाकडे नेत असतो!माय ममतेची गोडी लावत असतो!दूरदृष्टी देतं असतो!सुसंगतीकडे नेत असतो!कनवाळू आणि मातृहृदयी बनवीत असतो!आई नावाच्या पवित्र शाळेत नेत असतो!आई आपल्या संपूर्ण आयुष्याचं दान देऊन टाकत असतें!आई जगातील सर्वात महानदाता असतें!श्रीमंत दाता असतें!न मागता ही मुलांना देतं असतें!सदगुणांची श्रीमंती देणारी आई आपल्या हृदयी जाऊन बसत असतें!आपण श्रीमंत होऊन जातो!ज्ञानवंत होऊन जातो!प्रज्ञावंत होऊन जातो!शिलवंत होऊन जातो!अशा श्रीमंतीकडे नेणारीं आई घरोघरी असतें!माझी आई अशीच आहे!💐

आई आपल्या आयुष्याचा प्रारंभ असतें!जन्मल्या बरोबर दिसते!आई नावाचं नातं घट्ट होतं जातं!तिच्या रक्त मांसाचा गोळा आपण 'आई'नावाचा पुकारा सुरु राहतो!आई त्यात विरघळत राहते!आई मधुर होऊन जाते!आई श्वास होऊन जाते!आई प्रारंभ असतें!आपण रोपटे असतो!ती निगा राखीत आपल्याला वाढवीत असतें!आई संस्कार गाणी आणि वाणी असतें!विठूचं रूप असतें!आई प्रसन्नतेचा गुरु असतें!आई पहिला गुरु असतें!घरघरात हा गुरु मुलांना घडवीत असतो!माझी आई माझा पहिला गुरु आहे!तिच्या संस्काराच्या श्रीमंतीतं मी वाढलो, घडलो!अशा आईस शत शत नमन!
💐💐💐💐💐💐💐💐💐
***************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-०६ जुलै २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)