चास कमानचा श्रावण(भाग-०३)
चासकमानचां श्रावण
(भाग-०३)
🌧️💦🌧️💦🌧️💦
******************
... नानाभाऊ माळी
असा कसा हा श्रावण
थेट मातीत मुरलेला
मूळ्या पिकातं शिरूनी
खोल पाण्यानें भरलेलां!🌧️
वर ढगासं कळ येता
सरसर खोड्या करीत येतो
झोबंतोय तनासं वारा
चिंब मनासं घेऊनी जातो!💦
शेतात राबणारांही
मातीत एकजीव होतो
पिकं चिखल तुडवीत
हा सरसर श्रावण येतो!🌧️
सरसर बरसंत श्रावण
शेताचे तलाव करतो
सडणाऱ्या पिकांच्यां
वाफ्यातही पाणी भरतो!🌧️
खट्याळ कृष्ण श्रावण
खोड्या करीत येतो
शेत बांध फोडूनि दूर
हसत निघूनी जातो!🌧️
श्रावण कणकणात भिजला आहे!भिजवतो आहे!धरतीस अंघोळीला बसवून भरभर पाणी ओतीतो आहे!पाणी तुडवत,चिखल तुडवत,
गवताला तुडवतं खट्याळ श्रावण बरसतो आहे!अशाच झूळझूळ पावसात आमची बस चासकमान धरणपोटाशी,जंगलातील शंभूमहादेव देवळाच्या पायथ्याशी येऊन थांबली होती!पाऊस छत्रीस उघडीत होता!उघडीप कधीतरी देतं होता!डोंगराच्या पोटावरती अनंत झाडें श्रावण आंघोळ करीत उभी होती!छोटी मोठी पानं असलेली वनसंपदा मनाला मोहवीत होती!श्रावण संतत धारेला पानांवरं आडवीत झाडं श्रावणाशीचं खेळत उभी होती!डोंगर हिरवाईने नटलेला दिसतं होता!सुंदर वन वेलींचा शृंगार लेवून झाडं सजलेली होती!💦🌧️
डोंगर उतार जमिनीवर तृनपाते दाटीवाटीने वाऱ्याच्या संगीतावर ताल धरून नाचतं होती!श्रावणचं तो... नटलेला,नटखट कृष्णासारखा खोड्या करीत संतत तुषार उडवीत होता!आम्ही शंभू महादेवाकडे जाणारी पायावाट पाहिली!आजूबाजूला झाडांची दाटीवाटी उभी दिसली!जणू हमरस्त्यावरून जाणाऱ्या,शृंगार केलेल्या नवरदेवाचं स्वागतासाठी उभी असलेली वऱ्हाड असावं!इतकं सुंदर आणि मनभावन निसर्गाचं दृश्य होतं!काही पायऱ्या आम्ही चढून गेलो!वेळेचं भान ठेवून त्याचं पायऱ्यांवरून माघारी फिरलो!नयनात सारं दृश्य टिपून घेत होतो!
भिज पावसात छत्री उघडली होती!पुन्हा छत्रीचे पंख मिटले गेलेत!बसमध्ये बसलो,रिमझिम सरीसंगे बस पळत होती!अन अवघ्या १५-२०मिनिटात "चासकमान" धारणावर आलो!धरणाच्या साठवण क्षेत्राकडे पाहिल्यावर दिसलं,तिन्ही बाजूनीं डोंगर दिसतं होतें!खाली पाणी,कडेला डोंगर,वरती श्रावणसरी सुरु होत्या!मन अन तन दोन्ही चिंब भिजवीत होतो!मध्येच उघडलेल्या छत्रीचा अडसर होता!श्रावण हट्टी होता!खट्याळ होता!नाठाळ होता!छत्रीत घुसखोरी करीत होता!धरणाचं अथांग समुद्रासारखं पाणी डोळ्यात मावत नव्हतं!💦🌧️
बराच वेळ आम्ही श्रावणाशी एकरूप झालो होतो!बाळकृष्णचं जणू!आम्ही मोहित झालो होतो!निसर्गाचीं मोहिनी काही वेगळीच असतें!आपण सोबत आणलेलं दुःखाचं आपल्यकडून हळूच काढून घेत असतो!लीलया अशी मोहिनी टाकतो की आपण आनंदतरंगावर नाचू लागतो!निसर्ग किमयागार असतो!त्याचं सानिध्य प्रसन्नतेचा समृद्ध खजिना देऊन जात असतो!अथांग पाणी, डोंगर, झाडी, बसणारा पाऊस सर्वं कसं आपण त्यात तादात्म होऊन जातो!आम्ही चासकमान धारणावर बराच वेळ होतो!मोहित होतो!आम्ही आमचे नव्हतो!नाविन्यातं नखशिकांत बुडालो होतो!माणूस आनंदाच्या शोधात असतो!निसर्ग हाच सखा असतो!तो आनंद घेऊन फिरत असतो!आनंदप्रसाद खाऊन आपण निसर्गात समरस होतं असतो!आम्ही श्रावणाच्या कुशीत होतो!आम्ही खुशीत होतो!हाच आनंद वाटायचा असतो!आम्ही श्रावणसृष्टीने दान दिलेला आनंद मनसोक्त वाटीत होतो!तन मन तृप्त होऊन आम्ही पुन्हा बसमध्ये येऊन बसलो!🌷🌧️
बस चास गावाजवळ आली होती!भीमा नदी वाहात होती!श्रावणानें दिलेले पाणीरुपी मोफत दान घेऊन भीमा नदी वाहात होती!भीमाशंकरचं पावित्र्य घेऊन भीमा नदी डोंगरा डोंगराच्या पायथ्याशी वेडीवाकडी वळणे घेऊन श्रावणसार घेऊन वाहात होती!🌹💦🌧️
भीमाशंकर येथे उगम पावणारी भीमा नदी जलाभिषेक करण्यासाठी निघाली होती!वाहत्या पाण्याच्या निळसरपणाला घेऊन वाहात होती!वरती श्रावण सरींचा जलाभिषेक होत होता!तिच्याच काठावर प्राचीन सोमेश्वर मंदिर होतं!हेमाड पंथी महादेवाचं पुरातन मंदिर होतं!नवीन स्वरूपात,रंग रंगोटीतून अतिशय आखीव-रेखीव,भव्य शिवसुंदर सोमेश्वर महादेव मंदिर श्रद्धेच्या गाभाऱ्यातील पवित्र ॐशिव झालं होतं!भीमा नदीच्या शांत,शितल निर्मळतेंत माणूस शिवतत्वात शिवमय होऊन जात होतो!आम्ही सोमेश्वर महादेव मंदिरातील शिवपिंडासं भावभक्तीने लीन झालो होतो!नतमस्तक झालो होतो!शिवतत्वाशी एकरूप झालो!भीमा नदी शिवामृत घेऊन वाहात होती!कडेने हिरवाईचां अनमोल खजिना ठेवून भीमा नदी वाहात होती!🌧️
आम्ही सोमेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं!त्रिनेत्रधारी,नीलकंठ,त्रिशूलधारी अनादी अनंताचं दर्शन घेतलं!तेथेच व्हरांड्यातील विस्तृत जागेत सर्वं कविजन जेवायला बसलो!सर्वांनी आपल्या घरून आणलेला डबा
उघडंला!मोठी पंगत बसली होती!आम्ही जवळपास ५०जन होतो!सर्वांचे डबे जेवणास बसलेल्या पंगतीत फिरत राहिले!पंच पकवानाचा स्वाद एक झाला होता!भिन्न तें अभिन्न झाले होतें!विविधतेतून एकतेची अनुभूती येत होती!🌷💦🌧️
अन्नपूर्णा प्रसन्न झाली असावी!जेवनाचा आस्वाद घेत सर्वचं कविजन बाहेर बरसणाऱ्या श्रावणसरी नेत्रामृत डोळ्यांनी पीत होती!जेवना नंतर तेथेच साहित्यिक श्रावण सहलीचं रूपांतर कविसंमेलनातं झालं!कवी संमेलनास अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध कवयित्री संध्या गोळे अन प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचें गझलकार म भा चव्हाण लाभले होतें!जेवणाची आणि कवितांची मेजवानी तन आणि मनाच्या तृप्तीकडे नेत राहिली!एक एक कवी आपल्या विशेष शैलीत कविता सादर करीत राहिला!बाहेर श्रावण बरसत होता!व्हरांडयात कविता बरसत राहिल्या!दिवस मावळला होता!अंधार चादरीची तयारी सुरु होती!अंधारची चादर पांघरून तृप्तीचा ढेकर देतं साहित्य सम्राटची ही श्रावण सहल संपन्न होतं असतांना गझलकार म भा चव्हाण यांच्या घरी श्रावण चिखल तुडवत पोहचलो!घन अंधारी आनंदाचं शिखर मनात साठवीत रात्री साडे नऊ वाजता परतीच्या प्रवासाला सुरवात झाली!बस पुण्याकडे,आपल्या घरी पळत होती!रात्री साडेबारा वाजता हडपसर येथे सहलीची भुरभर
सरींनी सांगता झाली!अशी अविस्मरणीय साहित्यिक श्रावण सहल अनमोल ठेवा आहे!रात्री सरसर,भुरभूर,शिडीशीडं अधिक श्रावण आठवणीतलं ऐतिहासिक पान झालं होतं!🌧️💦
तारुण्य घेऊनी नाचतो श्रावण
संगती मंजुळ वाऱ्याचं गाणं
शब्द श्रावण समीप आला
प्यायलो हिरव्या सृष्टीचं लेणं💦
सृष्टीचा हा अजब नजारा
फुलातं दडला पराग कण
फुलपाखरे वाटती हो वाण
श्रावण फुले हसती पानोपान🌧️
****************************
☔💦🌧️☔🌷💦🌧️☔💦
****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-२९जुलै २०२३
(अधिक श्रावण)
Comments
Post a Comment