चारधाम यात्रेच्या वाटेवर (भाग-११)

चारधाम यात्रेच्या वाटेवर
       (भाग-११)
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*********************
... नानाभाऊ माळी

दर्शन दृष्टी देत असतं!अनुभवाची दृष्टी विशाल असतें!विशालतेचा संसार खूप मोठा असतो!संसार कुणाचा विशाल असेल बर?तर करता करविता साक्षात श्री विष्णू भगवान!श्री नारायण भगवान!श्री बद्रीनाथ भगवान!चिरंतन विश्वस्वामी बद्रीनाथ भगवान अशा विश्व पुरुषोत्तमाच्या चरणावर माथा टेकण्यासाठी,दर्शन घेण्यासाठी 
बद्रीनाथ धामाला काल दिनांक २७ मे रोजी पोहचलो होतो!प्रवास थक्क करणारा होता!कोणा अनाकलनीय विधात्याने सृष्टीसौंदर्याची,डोंगर दऱ्याचीं एक हाती उधळण केली असेल बर?सर्व विशाल!अतिविशाल!गूढ सौंदर्य कधी भीती दाखवीत असतं!कधी विलोभनीय वाटतं!मनमोहक वाटतं!निसर्ग चमत्काराचा साक्षात्कार प्रत्यक्षात अनुभव घेतल्याशिवाय होतं नसतो असं माझं मत आहे!सर्वचं अचाट!बुद्धी पलीकडचं!उंच उंच पर्वत रांग अक्षरशः भीती दाखवतं असतें!तर कधी तेचं पर्वत एकमेकांशी उंचीसाठी स्पर्धा करतांना दिसत असतात! सगळं अद्भुत वाटत असतं!असा सृष्टीचमत्कार शंकटाशी तोंडं देण्याचं शिकवीतं असतात!आपली क्षुलकता, हतबलता,परावलंबन पदोपदी जाणवत असतें!तरीही निसर्ग सानिद्याशी तडजोड चालूच असतें!

मी शुल्लक जीव आहे
 मज गर्वाची झाली घायी
स्वतःसं मापतांना मी 
हिमालय मोजला नाही!🌹

हिमालय विशाल उंची
डोळ्यासं दिसली नाही?
कधी मोजलीचं नाही 
गंगा यमुना वहात राही!🌹

मंदाकिनी अलकनंदा
धामात मूळ पाही....
केदारनाथ श्री बद्रीनाथा
दर्शन उंचावरी देई..!🌹

दिनांक २६मे २०२३रोजी केदारनाथ धाम दर्शन झालं होतं!तृप्तीचा अलौकिक आनंद हृदयात घेऊन निघालो होतो!परतीच्या प्रवासात केदारनाथ धाम पर्वत शिखरावर पावसाने हजेरी लावली होती!सकाळी केदारनाथ धामला पोहचलो तेंव्हा ४डिग्री तापमान होतं!खाली येतांना झिमझिम पाऊस होता!घोडा खाली उतरतांना पावसामुळे पायऱ्यांवरून घसरण्याची भीती होती!दगडी रस्त्यात चालून चालून घोड्यांच्या टापांमुळे खड्डे पडलेले होते!घोडा खाली येत होता!उतार असल्यामुळे घोड्यावर बसतांना खोगीरचां वरचा भाग मांड्यांना घासत होता!घोड्याचें कष्ट पाहून आपल्याला सहन होतं नव्हतं  त्रास होतं होता!कधी गौरीकुंड येईल असं झालं होतं!तरीही ही कठीण परीक्षा देणं सुरु होतं!🌹

गौरीकुंडहून सोनप्रयागला येण्यासाठी,जिभगाडीच्या बुकिंगसाठी लोकांची खुपचं मोठी रांग होती!साधारण दोन तासानंतर जिभगाडी भेटली!तेथून सोप्रयागच्या सीतापूर पार्किंगपर्यंत पुन्हा अडीच किलोमीटर चालतं आलो होतो!अन आमच्या ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये बसलो!पण ट्रॅफिक जॅममुळे गाड्या पुढे सरकत नव्हत्या!रात्री नऊ वाजता बस पुढी सरकली!अन रात्री एक वाजता गुप्त काशीला पोहचलो!
धावपळ,दगदग कष्ट यातून स्वतः संयम काय असतो तें शिकत होतो!

दिनांक २७ मे च्यां सकाळी सात वाजता पुन्हा बद्रीनाथ धाम दर्शनासाठी आमची बस
गुप्तकांशीहून रुद्रप्रयागमार्गे पुढे मार्गस्त झाली होती!सोनप्रयाग तें बद्रीनाथ धाम २६०किलोमीटर अंतरावर आहे!बस पळत होती!एकेक गावं मागे जात होती!अखंड घाटाचा रस्ता एक पर्वताच्या पोटातून, दरींतून दुसऱ्या पर्वताच्या शिखराकडे बस धावत होती!जीवघेणा घाट रस्ता खरोखर एकसारखी परीक्षा घेत होता!🌹

एका पर्वतावरून दुसऱ्या पर्वताच्या पोटात शिरतांना बस खेळण्यातल्या 
आगकाडी पटी एवढी दिसतं होती जणू!बद्रीनाथला जातांना कर्णप्रयाग येथे पिंडर आणि अलकनंदा नद्यांचा संगम होता!दोन नद्यांचा संगम पाहून दोन जीव एक होतं आहेत असं दिसतं होतं!पुढे नंदप्रयाग येथे नंदाकिनी आणि अलकनंदा नदीचा संगम दिसला!देवभूमीतल्या पवित्र स्थळी निसर्गाच वरदान पाहून मन प्रफुल्लित होतांना दिसतं होतं!पुढे जोशीमठ,चामोली मार्गे गगणाला भिडणाऱ्या हिमालयाच्या उंच शिखराकडे बस पळत होती!हृदयाचा ठोका वाढत होता!बर्फकाळात हिवाळ्यात श्री बद्रीनाथ भगवान यांची पालखी जोशीमठ येथे येत असतें!.... तर घाटावरून अतिशय कुशलतेने बस चालवणारा ड्रायवर त्या क्षणी आम्हाला देवस्वरूप वाटत होता!🌷

बद्रीनाथ धाम मार्ग मोठा असला तरी या भागात ट्रॅफिक जॅमचां प्रसंग सतत येत असतो!या समस्यांना सामोरे जात बस दरीच्या अगदी टोकावर येऊन पुन्हा रस्त्यावरून धावत होती!तेव्हा मात्र छातीची धडकी वाढत होती!खोल खोल दरीच्या तळाशी वाहणारी अलकनदीचां आकार इंग्रजी 'V'सारखा वाटत होता!गगनाला भिडणारे प्रचंड उंच
पर्वतरांग अखंडपणे पुढे पुढे सरकत होती!उभटकडा घाट पाहून क्षणोक्षणी हृदयातं धस्स झाल्यासारखे वाटत होतं!पुढे विष्णू प्रयाग येथे अलकंनंदा आणि धवल गंगेच्यां संगमाकडे पाहिले असता दोन भिन्न रंगाचं पाणी एकरूप होतांना दिसतं होतं!निसर्गानें अतिशय सुंदर ताट वाढून ठेवलेलं डोळयांतून हृदयात गोळा करीत होतो!🌹

सूर्य देवाने डोळे मिटले होते!त्यात थंडीचं प्रमाण वाढलं होतं!पावसाची रिपरिप सुरु झाली होती!घन अंधारी काहीही दिसतं नव्हतं!बसच्या काचवर बाष्प जमा झालेलं दिसतं होतं!बस ध्येयाकडे पळत होती!थंडीचा प्रचंड कडाका जाणवू लागला होता!त्यात ट्रॅफिक जॅममुळे सर्व काही ठप्प झाल्यासारखं वाटू लागलं होतं!बसमधले प्रवाशी निद्राधीन झाले होते!अन हिमालय पर्वताच्या उंच शिखरावर दोन पर्वतांमध्ये अर्थात नर आणि नारायण पर्वताच्या कुशीत वसलेलं चामोलीतील प्रसिद्ध धाम श्री.बद्रीनाथ धाम हे श्रद्धा-पवित्र स्थळ आलं होतं!रात्रीचे ०९-३०वाजले होते!हॉटेल जवळ बसमधून खाली उतरलो तेंव्हा झिमझिम पाऊस येत होता!अंगाला थंडी झोबंत होती!जास्त वेळ झाल्यामुळे मंदिर बंद झाले होतें!रात्री दर्शनाची अभिलाषा पूर्ण होऊ शकली नाही!रात्री ०८वाजता मंदिराचा मुख्य दरवाजा बंद होतो!आम्ही हॉटेलवर जेवण करून झोपलो!🌹

दिनांक २८तारखेच्या ब्रम्हमुहर्तावर ०३-३०वाजता आम्ही सरळ श्री बद्रीनाथ मंदिराजवळ असलेल्या गरम पाण्याच्या कुंडात जाऊन अंघोळ केली!पाणी खुपचं गरम होतं!पाय कुंडात बुडवला,पाणी खुपचं गरम होतं!नंतर त्याचं गरम पाण्याने आम्हाला स्वीकारलं होतं!मनसोक्त डुबकी लावली!अंग भाजून निघालं होतं!तरतरी आली होती!कपडे घालून पहाटे पाच वाजता दर्शन रांगेत उभे राहिलो!तापमान -२ डिग्री होतं!थंडीचा कडाका होता!लांबचीं लांब रांग पुढे सरकत होती!श्री.बद्रीनाथ भगवानचं विशाल रूप पाहण्यासाठी मन व्याकुळ झालं होतं!🌷

रांग मोठी होती!दोन किलोमीटरचीं असावी!भगवान बद्रीनाथ भगवान यांचा जयघोष सुरु होता!दोन्ही पर्वतं दिसतं होतें!गगनाला भिडले होतें!उंच ठिकाणी सूर्यदर्शन लवकर होतं असतं!साडेपाच वाजता उगवणाऱ्या सूर्यसाक्षीतं,थंडीच्या कडाक्यात,पर्वतावरील बर्फ सोनेरी रंगानीं चमकत होतं!जणू आम्ही स्वर्गात आहोत असं वाटतं होतं! बर्फाच्छादित पर्वतं शुभ्र रंगात उजळून निघाले होतें!खाली अलकनंदा सरीता खळखळून वहात होती!अति उंचावरील गिरीशिखरावर एकांत ठिकाणी बर्फ अंथरुणावर श्री. बद्रीनाथ भगवान!श्री.नारायण  तपश्चर्साठी येऊन राहिले होतें!हे ठिकाण इतकं अलौकिक होतं की मन मोहित झालं होतं!साक्षात विष्णू भगवान यांनी हे ठिकाण कसं निवडलं असेल बरं?येथे देवादी देवं महादेव आणि देवी पार्वती राहात होतें!हे ठिकाण श्री विष्णू भगवान यांना आवडल्यामुळे तें येथे येऊ इच्छित होतें पण शंकर भगवान हे ठिकाण सोडणार कसे? मग श्री. विष्णू भगवानांनी महादेवाच्या कुटीसमोर बालरूप धारण करून रडत होतें!माता पार्वतीचं आई, कोमल हृदय हे पाहू शकले नाही!मातेने बाळास कुशीत घेतले अन महादेवास आपल्या कुटीत घेण्यासाठी सांगितले!महादेवांनी नकार दिला!पण माता पार्वतीच्या हट्टापुढे महादेवांनी माघार घेतली!

बाळाला कुटीत ठेवून!भगवान शंकर आणि माता पार्वती तप साधणेसाठी गिरी शिखरावर गेलेत!परत माघारी आल्यावर आपली कुटी उघडू लागले!कुटीचं दार उघडतं नव्हतं!दोघांनी प्रयत्न करूनही उघडले नाही!महादेव मनातल्या मनात हसत होतें!त्यांना कळलें होतें!दार उघडतं नाही म्हणून भगवान महादेव मग हे ठिकाण सोडून जवळच असलेल्या दुसऱ्या पर्वतावर निघून गेले!जेथे मंदाकिनी नदीचा उगम आहे त्या ठिकाणास केदारनाथ धाम म्हणून ओळखले जाते!🌹

....तर भगवान श्री विष्णूनीं अति अलौकिक ठिकाणी आपलं तप साधनेचं ठिकाण निवडलं होतं!तप साधनेत कुठलेही अडचण येऊ नये म्हणून देवी पार्वतीनें बद्रीचं अर्थात बोर वृक्षाचं रूप धारण केलं होतं!बर्फ बोरावर पडलं तरी वितळून खाली येत होतं!भगवान विष्णुचीं तप साधना सुरु राहिली!म्हणून हे  पवित्र ठिकाण 'बद्रीनाथ धाम'म्हणून
श्रद्धास्थान झाले!🌷

... शरीर गोठवणाऱ्या थंडीत आमची रांग पुढे सरकत होती!समुद्रसपाटी पासून ३५८२मिटर उंचीवर असलेल्या ठिकाणी आम्ही भगवान बद्रीनाथांच्या नाम घोषातं तल्लीन होतो!!सकाळी सात वाजले होतें तरी तापमान ० अंश सेलसियस दाखवत होतं!बद्रीनाथ नामरूपात थंडीला न जुमानता श्रद्धाळू पुढे सरकत होता!..अन विशाल बद्रीनाथ प्रवेश द्वारात मंदिरात भक्तजनांचा अलोट सागर प्रवेशित होतं होता!आम्ही देखील त्या प्रचंड जनसागरासोबत जात होतो!मंदिराच्या डाव्या
विष्णूभक्त, वाहक गरुडाचीं मूर्ती दिसली!श्रद्धेनें मूर्तीवर डोकं ठेवलं! जनसागर पूढे सरकत होता!भगवान बद्रीनाथांच्या दर्शनासाठी मन आतुर 
आणि अधीर झालं होतं!विरह संपण्याच्या समीप आलो होतो!मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळाला!अन साक्षात हृदयात ठेवलेल्या दिव्य स्वरूपास डोळ्यातून पाहात होतो!हात जोडून नतमस्तक होतं आशीर्वाद घेत होतो!जगणं, जीवन सारं सारं एकचित्त झालं होतं!स्वप्नातल्या देवास साक्षात श्रद्धेनें शरण गेलो होतो!जगण्याला अर्थ आला होता!भावाविभोर होतं श्री विशाल बद्रीनाथ भगवानचं दर्शन घेत होतो!मनाची तृष्णा तृप्तीतं रूपांतर झाली होती!💐

मी देवं पाहिला होता!देवाला हृदयात बसवून बाहेर पडलो होतो!भूत-भविष्य अन वर्तमान घेऊन अनुभूतीच्या सागरात डुबकी मारत होतो!जणू अमृतात डुबकी मारत होतो!तीव्र यातनेतून,कष्टातून देव भेटला होता!माझ्या हृदयातलं धाम अनुभवत होतो!मी माझा नव्हतो!जगणं माझं नव्हतं!मनाची व्याकुळता फळाला आली होती!माझं चौथ धाम झालं होतं!डोळ्यातल्या तलावला कोण जाणे जाग आली होती!भावभावनेच्या तरंगात मग अश्रू हसत होती!या जन्माच सार्थक डोळ्यातून बाहेर येत होतं!गरम उष्ण थेंब अश्रूचें आनंद देत होतें!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*********************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे
(आता ऋषिकेश दर्शनासाठी प्रवासात)
मो.न-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-२९ मे २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol