चारधाम यात्रेच्या वाटेवर (भाग-०५)
चारधाम यात्रेच्या वाटेवर
(भाग-०५)
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*********************
... नानाभाऊ माळी
काय काय लिहू मी? माझ्या नजरेत मावत नाहीये इतकं विशाल आहे!सर्व नजरेच्या बाहेरचं आहे!जे मी पाहिले त्याची विशालता कोण बरं लिहू शकेलं?कोण बरं मांडू शकेल? सृष्टी निर्माता ब्रम्हदेवचं आपल्या निर्मितीच रहस्य उत्तमरित्या मांडू शकतील!सर्वच विशाल,अनाकलनीय,अथांग, अफाट,गूढ, रहस्यमयी,अगाध आहे!
.. धाम हा शब्द ऐकून होतो!आध्यत्मिक प्राचीन परंपरेतील हा शब्द कानावर येत राहिला होता!पण आता वयाच्या ६१व्या वर्षांपर्यंत 'धाम'शब्दाचा अर्थ कळला नव्हता!धाम म्हणजे फुकट दान नसतं!धाम शारीरिक अन मानसिक संस्कार असतात!अतिशय कष्ट असतात!सहनशक्ती असतें!मन अन शरीर थकतं असतांनाचीं दिव्य अनुभूती म्हणजे 'धाम' म्हणावा का?आपल्या बुद्धी पलीकडचं काहीतरी गूढ असतं बरं!!जे परीक्षा घेत असतं!परीक्षा मनाची,बुद्धीची अन शरीराची घेत असतं!अशा प्रचंड अनाकलनीय पण अध्यात्मिक बाजूने,कलेंने माणसांची परीक्षा घेऊन मगच उत्तीर्ण करणारे ठिकाण धाम असतं!यमनोत्री धाम त्यातील एक होतं!🌷
....काल सकाळी ०४-००वाजता खरादी गावं सोडलं अन "यमनोत्री धाम" दर्शनासाठी निघालो होतो!चारधाम यात्रेपैकी यमनोत्री एक आहे!उत्तराखंड राज्याच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील बडकोट तालुक्यातील यमुना नदी किनारी जानकी चट्टी हे छोटसं गावं आहे!गावं हिमालय पर्वत रांगेत वसलेलं आहे!गावाला कदाचित सकाळी ११वाजेपासून तें दुपारी ०४-००वाजेपर्यंतचं सूर्यदेवाचं दर्शन होतं असावं!आभाळाशी स्पर्धा करणारे उंचचं उंच महाकाय पर्वत रांग गावासभोवती प्रचंड भिंतीसारखी उभी आहे!यमुना नदी किनारी वसलेलं हे छोटंसं गावं!तेथून पुढे यमुना मैया उगमस्थांनाकडे निघालो होतो!जानकी चट्टी हे ठिकाण आम्ही मुक्कामी असलेल्या खरादी गावापासून ३५ किलोमीटर लांब होतं हनुमान चट्टी नंतर लहान लहान खेडी पर्वत रांगेत आपलं अस्तित्व ठेवून आहेत!🌷
स्वच्छ,सुंदर धो धो वाहणारे थंडगार जीवंत धबधबे मन मोहून घेत असतात!उत्तरकाशी जिल्ह्यातील बडकोट तालुक्यातील यमुना नदी किनारी जानकी चट्टी नावाचं छोटसं गावं आहे!गावं हिमालय पर्वत रांगेत वसलेलं आहे!जानकी चट्टी गावाला कदाचित सकाळी १० वाजेपासून तें दुपारी ०४-०० वाजेपर्यंतचं सूर्यदेवाचं दर्शन होतं असावं!चौहुंबाजूनी आभाळाशी स्पर्धा करणारीं उंचचं उंच महाकाय पर्वत रांग!हिम शिखरावर दररोज पडणारे बर्फ!त्यामुळे स्वच्छ,सुंदर धो धो वाहणारे थंडगार जीवंत धबधबे मन मोहून घेत असतात!शिखरावरील बर्फ सतत वितळत असत तेचं पाणी खोल धबधबा बनून खोल नदी
पात्रात कोसळत असतं!हा निसर्गाचा चमत्कार होता!🌷
खरादी या मुक्कामाच्या ठिकाणाहून निघालेलो आम्ही श्रद्धाळू बसने अवघड,जीवघेण्या घाटातून वेडीवाकडी वळण घेत जानकी चट्टी या गावात येऊन पोहचलो!फक्त ३५किलोमीटर अंतर होतं!पहाटे ०४-००वाजता निघालो होतो ०७-०० तेथे पोहचलो!रस्त्याच्या खोल गेलेल्या दरीकडे ढासळलेलें पर्वत दिसतं होते!केंव्हाही एखादा कडा निखळून खाली कोसळत असतात!येथे लँडस्लायडींग प्रकार नित्याचाच आहे!निसर्गाचं आव्हान आहे!त्यावर उपाय शोधत,अरुंद रस्त्यावरील कोसळलेल्या दगडं मातीचा प्रचंड ढिगारा उपसला जातो!पुन्हा अरुंद रस्त्यावर मुंग्यासारखी वाहणं पळू लागतात!डोळ्यात न मावणार निसर्गाचं अतिविशाल रूप सतत आव्हान देत असतं!वाहणं चालवीणारी ड्रायवर ड्रायविंग अतिशय तरबेज असतात!भन्नाट गाड्या पळवत असतांना समोर एखादे वाहणं आलं तर तो रस्त्याच्या इतक्या कड्याकडे वाहन नेतो की एखाद्या फूटावर प्रचंड खोल दरी आ वासून दिसते!दरीकडे पाहिल्यावर प्रचंड थंड वातावरणात देखील अंगाला दरदरून घाम आल्याशिवाय राहात नाही!हृदयाचे ठोके वाढवणारे आव्हान पार करीत जानकी चट्टी येथे काल दिनांक २१मे रोजी सकाळी पोहचलो!🌹
जानकी चट्टीहून 'यमनोत्री धाम'०६-३०किलोमीटर आहे!लागलची जानकी चट्टीहून कोणी पायी,कोणी घोड्यावर,कोणी डोली(पालखी)वर, तर कोणी पिटू(कंडी)वर निघाले!अवघड पर्वत कोरून वाट तयार केलेली आहे!केवळ सात-आठ फुटाच्या या अवघड घाट रस्त्यावर वेडीवाकडी वळण घेत श्रद्धाळू जात येत असतात!येणारे अन जाणारे एकमेकांना वाटकरून पुढे सरकत असतात!आमच्या ५०जणांच्या टिम मधून आम्ही निवडक ९-१० जणांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला त्यात मी, माझी पत्नी अश्विनी, डॉक्टर संजयजी देसले,अशोक मोरे,अनिल वाणी,किशोर जोशी,उदय वानखेडे,सौं सुजाता वानखेडे वहिनी,दिलीप माळी,सौं.सविता माळी वहिनी,दिपक फिरके अशी मंडळी हातात काठी घेऊन निघालो!
यमनोत्री दर्शन घेण्यासाठी आतुर असलेलो आम्ही कधी पालखीचा धक्का सहन करीत, कधी घोड्याचा(खेचरचां) स्पर्श सहन करीत हळूहळू यमुनोत्री धामाकडे चाललो होतो!कधी प्रचंड धाप लागतं होती तर कधी दम लागतं होता!अंगावर येणारा चढ दम आणि घाम काढीत होता!मध्येमध्ये लोखंडी रेलिंगला धरून उभे राहात
थकव्यावर मात करीत पुढे चाललो होतो!मध्येच पालखीवाला धक्का मारून पूढे निघून जात होता!तर कधी "हटो, हटो "म्हणतं घोडी पळवणारी ओरडत,धक्का देत जात होती, येत होती!त्यांचं जीवन देखील अतिशय खडतर आणि कष्टाचं आहे!पोट साठ-सत्तर किलो वजनाच्या माणसाचं वजन कुंडीत घेऊन वर चढणारा तो स्थानिक माणूस जगण्यासाठी ओझी वहात मरतो आहे!...सात-फुटच्या रस्त्यावर हा कसरतीचा खेळ चालू होता!आपण सरळ रस्ता असेल तर २०-२२ किलोमीटर सहज चालतं असतो!पण अंगावर येणारी अवघड वाट फक्त ०६-३०किलोमीटरची होती!हातातली काठी आधार देत होती!मध्येमध्ये चहा,बिस्कीट,नास्ता कोड्रिंक विकणाऱ्या विक्रेत्यांनी दुकानं थाटली होती!छोट्याशा रस्त्यावर प्रचंड गर्दी भक्तीच्या विरहाने व्याकुळ झाली होती!
यमनोत्री मैयानें दूर दूर उंचचं उंच हिमालयाच्या कुशीत आपलं स्थान मांडलं होतं!एखादी खोल दरी ओलांडण्यासाठी लोखंडी पुल बांधलेला होता!त्यावरून सर्वचं चालतं होती,पळत होती श्रद्धेची, भक्तीची महिमा वेगळीच असतें प्रत्येकजन दर्शन ओढीने व्याकुळ होतं पळत होता!दम लागूनही पून्हा दम घेत आम्ही देखील साक्षात्कारीं यमनोत्री धामाजवळ पोहचलो!उंच शिखरावर बर्फ चादर होऊन चमकत होता!उभट कड्यातून बर्फ वितळून पाण्याचा प्रचंड लोंढा पर्वतावरून घरंगळतं होता!धबधब्या सारखा आवाज कानी येत होता!🌹
आम्ही ०६-३०किलोमीटर अंतर चालून ०५-००तासात 'यमनोत्री धामा' जवळ पोहचलो!श्रद्धाळुंची अलोट गर्दी पाहून वाटलं कितीही संकट आली तरी मनाची तयारी अन इच्छा असेल तर साध्याजवळ पोहचता येत!आव्हान खूप असतात!त्यांनां समोरे जात राहिलं पाहिजे!आम्ही भारताची विशाल नदी यमुना
माताच्या उगमस्थांनी पोहचलो होतो!आमचं साध्य यमनोत्री धाम दर्शन होतं!साधना अवघड होती!वाट बिकट होती!अवघड वळणे अनेक होती,संकटे अनेक होती प्रचंड मेहनत,कष्टातून,सकारात्मक मानसिकता ठेवून खरी साधना फळाला आली होती!गेल्या गेल्या प्रथमतः पवित्र तप्त कुंडात डुबकी लावली!गरम पाण्याच्या त्या डुबकीत साक्षात यमपुत्री यमुनोत्री मातेस डोळे भरून पाहत होतो!तप्त कुंडात तीन-चार वेळा डुबकी लावली अन त्या गरम पाण्याच्या अंघोळीने अंग शेकलं जात होतं!थकवा पार पार निघून गेला होता!तप्त कुंडात येवढ गरम पाणी कसं येत असेल बरं?? हा निसर्गाचा चमत्कार भक्तीच्या वाटेवरील विशाल दर्शन होतं!समुद्र सपाटीपासून ३३२३मिटर उंचावर असलेलं इतकं अवघड ठिकाण भक्तीचं केंद्रबिंदू पवित्र स्थान... धाम म्हणून जगात प्रसिद्ध आहे!अंघोळी नंतर सर्वचं श्रद्धाळू भक्तजणांनी मनोभावे यमुनोत्री मातेचं दर्शन घेऊन सार्थ जीवन सारं आपल्या पदरात पाडून घेत परतीच्या मार्गांवर निघालो!परतीच्या प्रवासात तशाच अलोट गर्दीतून वाट काढीत जानकी चट्टीला येऊन पोहचलो!तेव्हा संध्याकाळचें ०६-००वाजले होते!बसमध्ये बसलो!चार धाम पैकी एक धाम पूर्ण झालं होतं!मनाला समाधान वाटत होतं!डोळयांतल्या आनंदाश्रुनां वाट करून दिली!जीवनातलं अवघड सत्य...'धाम'या विशाल शब्दाचा अर्थ काल दिनांक २१मे २०२३ला कळला होता!समाधानची अनुभूती अश्रू रूपातून बाहेर येत होती!मनाची व्याकुळता,विरह दर्शनानें तृप्त झाली होती!खुशाल अश्रूतून व्यक्त होतं होती!येताना अधून मधून पावसाच्या तुरळक सरी पाठलाग करू लागल्या होत्या!बरसत होत्या!त्यात डोळ्यांच्या तलावातून धाम तृप्तीचे आनंदाश्रुंना देखील वाट करून दिली!मी ही वाहणाऱ्या त्या गरम थेंबानां थांबविले नाही!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पूणे.
(हल्ली ठिकाण यमनोत्री धाम
उत्तराखंड)
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-२२मे २०२३
Comments
Post a Comment