माझी आई अशीच आहे (भाग -०६वा)

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
माझी आई अशीच आहे
        (भाग-०६)
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*********************
...नानाभाऊ माळी

बंधू-भगिनींनो!
मुलांसाठी,कुटुंबासाठी आपलं आयुष्य वेचणारी आई स्वतः फक्त देत असतें!बाप घराचा खांब असतो आई घराची भिंत असतें!घराला भिंती आड सावरणारी आई गंगा मातेचं पवित्र रूप असतं!म्हणून आई घराचं मांगल्य असतें!घर सौभाग्याने नांदत असतं!आई पणतीचा टीमटीमणारा दिवा असतें,अंधारात सतत उजेड देत जागत असतें!तिच्या कुडीतील धडधडणारं हृदय थांबा घेई पर्यंत जागत असतें!आईचे आशीर्वाद आणि गोड मधुर मायेचा हात आधार होत असतात!विश्वासाचा धर्म जागत श्रद्धे जवळ नेत असतो!उन्हातील सावली होणारी आई मायेची शीतलता प्रदान करीत असतें!... अशीच माझी आई आहे!💐


"फोडीते पान्हा कुशीत धरुनी
काढीते डोळ्यातून पाणी..!

बालरूपात कधी येतो ईश्वर
तुझी ऐकण्या मधुर वाणी..!

वाहते शुद्ध निर्मळ प्रेम
तुझे फेडील ऋण कोणी...!

प्रेमळ भक्ती कृतज्ञतेची
सदैव झोळी करिते खाली..!

देण्या काळीज ममतेच
आई पृथ्वी तलावर आली..!

पहिला गुरु या जगाचा
आई कल्पतरू झाली....!"

बंधू-भगिनींनो!
जी सर्व काही सतत सहन करीत असतें!संकटातून मार्ग काढीत तडजोड करायला शिकवीत असतें तिला आई म्हणतात!जीवनात संयमाची शिकवण देणारी आई या धर्तीवर ईश्वरानें पाठविलेला त्याचा हृदयाचा तुकडा असतो!डोळा असतो!श्वास असतो!..ती आपल्याला संस्कारक्षम बनवीत असतें!निःस्वार्थ,निर्मळ,समर्पणाची शिकवण देत असतें!आई त्यागमूर्ती असतें!अशा आईच्या चरणावर श्रद्धा आणि भक्तीभावाने आपला माथा टेकवावा!अशा आईला कोणी देवदूत म्हणतो!संत ही म्हणतो!बंधूनो.... अशीच माझी आई आहे!🌹

आई जन्म देते,जन्मोजन्मीचें अतूट नातं जोडून जात असतें!शीतलतेची सावली होणारी माता अमृतपान करीत,माय ममतेची शक्ती आणि भक्तीची ओळख करून देत असतें!उन्हातानातून,काट्याकूट्यातून चालणारी आई स्वतः संकटें सहन करीत सन्मार्गाची ओळख करून देत असतें!अशा आनंदात्म्यास ईश्वराचं हृदय म्हणतात!कुटुंबावर हृदय अर्पित करून, युगंयुगांचे उपकार मागे ठेवून जाणारी आई अशीच असतें!माझीही आई अशीच आहे!दुःख डोळ्यात भिजवित आनंद मुखी वाटते...अशी माझी आई आहे!🌷

 
"पवित्र झालीत महाकाव्य ही
तुझ्याचं नावामुळे......

फुटती मधुर शब्द ओठांवर
मनातले अहंकार होती खुळे

मुखात येता नाम तुझे
तृप्तीने आकाश होते निळे!"

बंधू-भगिनींनो!
बालपणीचं चांगलंचं आठवतंय! भल्या पहाटे आई जात्यावर दळण दळत होती!जात्याचा घर्र घर्रर्र आवाज येत होता!बाहेर काळाकुट्ट अंधार होता!जात्याभोवती गरमागरम ताजे पीठ घरंगळतं होतं!पहाटेची वेळ होती!आईच्या मुखातून एखादी ओवी बाहेर येत होती!दिव्याच्या उजेडात पहाटेच्या शांत समयी मुखातील ओवी आणि जात्याचे संगीत एकजीव झाले होते!त्यावेळेस खेडेगावात लाईट पोहचली नव्हती!टीमटीमणाऱ्या घासलेट दिव्याच्या उजेडात फिरत्या जात्याभोंवती पीठ तृप्तीने विसावंत होतं!🌹

आमच्या घराच्या भिंती मातीच्या होत्या!आई भिंतीकडे पाठ करून बसली होती!दळण दळणात दंग होती!जात्याच्या घर घर आवाजात बाहेरचं काहीही ऐकायला येत नव्हतं!...चोरांनी हळूहळू पाठीमागील भिंत फोडून बोगदा बनवला!त्यातून हळूहळू जुनी मोठाली पितळी भांडी उचलून  पोबारा केला होता!आई मन लावून ओवी म्हणत होती!जातं स्वतः भोवती पळत होतं!आईचे हात जात्याची मूठ धरून दळणात दंग होती!दळण संपायला आलं,उजेडाची चाहूल लागली होती!जर्मनच्यां घमेल्यातील पायलीभर बाजरी संपली होती!पीठ गोळा करतांना आई उठली!.. मागे वळून पाहिल्यावर भिंतीचं भले मोठ भगदाड पडले होते!आई घाबरली तसा जोरात हंबरडा फोडला! तळमळून जिवाच्या आकांतानें रडू लागली!आईच्या आवाजाने घरातील सर्वजन जागे झाले!घरातील सर्व पितळी भांडे चोरीला गेले होते!आई हतबल होऊन असाह्यतेंने रडत होती!दरिद्री अन गरिबीतं पिचलेल्या संसारावर असा घाला पडला होता!आई सभोवती बसून आम्ही तिचे अश्रू पुशीत बसलो होतो!हतबल झालेल्या आईचं दुःख कितीही हलके केलं तरी होणारें नव्हते!हानीची भरपायी होणार नव्हती!....छातीवर दगड ठेवून पुन्हा नव्या उमेदीने उभी राहायली होती!अशी माझी माय आहे!अशी माझी आई आहे!

"लिहितो तुजवर आसवांनी
घेऊनि चैतन्याची शाई

घन अंधारी चंद्र आकाशी
आम्हा तू शीतलता देई

ठेविते पवित्र देव्हारा मनाचा
सुगंधी कस्तुरी तू आई 

बंधूनो!आपली आसवं उगाचंचं डोळ्यातून घरंगळत असतात!हृदय मनाला सांगत असतं,"वाहू दे ती अश्रू फुले!आईच्या उपकाराची आहेत रें ती!तिच्या त्यागाची आहेत!फक्त तिच्या कष्टाची जन्मभर जाण ठेवं!आयुष्य खूप लहान आहे!त्याग अन उपकार महान आहेत!".... अशी आहे माझी आई!..मी तिच्या कुशीत बसतो!उशीजवळ बसतो!पायांजवळ बसतो!नतमस्तक होतो!डोळ्यांच्या खोबनीत तलाव साचतो!मनसोक्तपणे बांध फुटत असतो!मी ही अडवत नाही!सर्व काही देऊनही भरल्या हाती डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत असतें!अशी माझी आई!🌹

"पेहरीत आली बीज शुद्ध
मनाच्या निर्मळ मातीवारी!

अढळ ग्रह-तारेही फिरताहेत
आपुल्याचं मार्गावरी!

परी ताऱ्यांचा तारा राहते आई
या भुतलावारी.........!"
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
***********************
💐💐💐💐💐💐💐💐
***********************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
         ९९२३०७६५००
दिनांक-०५ जानेवारी २०२३
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)